आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वधारणा-या येनची जपानला चिंता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगभरातल्या अर्थव्यवस्था वेगवेगळ्या कारणांनी कशा अडचणीत सापडल्या आहेत त्याचा वेध आपण घेतो आहोत. कारण या प्रत्येक घडामोडीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर बरा किंवा वाईट परिणाम होतो आहे आणि होत राहणार आहे.
युरोपियन समुदायातील राष्ट्रांत आलेली मंदीची लाट आणि त्यामुळे अडचणीत आलेले युरो चलन याची माहिती आपण घेतली. आता जपानच्या वधारणाºया येनमुळे जपानी अर्थव्यवस्था कोणत्या अडचणीत सापडली आहे हे आपण पाहणार आहोत.
डॉलरच्या तुलनेत जगभरातील इतर सर्व चलने धडाधड कोसळत असताना जपानचा येन मात्र डॉलरपेक्षा अधिक किमतीला विकला जातो आहे. गेले वर्षभर येन सतत वधारतोच आहे. जपान सरकारने तीन-चार वेळा हस्तक्षेप करूनही येनचे हे वधारणे कमी झालेले नाही. जपानी अधिका-नी गेल्या वर्षभरात 143 अब्ज येन विकले आहेत. यावरून येन खरेदीसाठी किती झुंबड उडाली आहे हे सहज लक्षात येईल. येनचे हे सतत वधारणे एका अर्थाने जपानसाठी आर्थिक सुनामीच आहे.
चलन कोसळत असताना तोटा होतो, आर्थिक प्रश्न निर्माण होतात हे आपण पटकन समजू शकतो. पण येनच्या वधारण्याने जपान अडचणीत का सापडला हे चटकन लक्षात येत नाही. चलनातील चढ-उतार नेहमीच होत असतात, पण त्याचे परिणाम मात्र त्या त्या देशाची अर्थव्यवस्था कोणत्या गोष्टींवर अवलंबून आहे यावर ठरत असतात. जपानची अर्थव्यवस्था मुख्यत: निर्यातीवर अवलंबून आहे. आर्थिकदृष्ट्या बलाढ्य असलेल्या अमेरिकेजवळ प्रचंड मोठा भूभाग आणि मोठी लोकसंख्या आहे. याचा अर्थ तेथे मोठे कंझ्युमर मार्केट आहे. याउलट जपान हा चिमुकला देश आहे. तोही शेकडो बेटांनी बनलेला आणि कमी लोकसंख्या असलेला. बुद्धिमत्ता, शिस्त, तंत्रज्ञान आणि अफाट ताकदीची राष्ट्रीय अस्मिता यांच्या जोरावर जपानने जागतिक पातळीवर दुसºया क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेचे स्थान मिळवले आहे. साहजिकच जपानची अर्थव्यवस्था अत्युच्च तंत्रज्ञान आणि निर्यातप्रधान आहे. अर्थव्यवस्थेचे हे स्वरूपच वधारणाºया येनमुळे अडचणीत आले आहे.
येनच्या सतत वधारण्यामुळे कामगारांच्या वेतनावर गंभीर परिणाम होत आहेत. येणाºया काळात येन असाच वधारत राहिला, तर सहा लाखांहून अधिक कामगार आपल्या कामाला मुकतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. येन महागल्यामुळे साहजिकच जपानी उत्पादने आंतरराष्टÑीय बाजारात महाग होत आहेत. निर्यातप्रधान व्यवसायांना आपली उत्पादने वाजवी आणि स्पर्धात्मक किमतीत ठेवावी लागतात. जपानने आजपर्यंत हे सूत्र कायम पाळले आहे. त्यामुळेच जपानी उत्पादनांचा बोलबाला जगभर आहे. डॉलर आणि येन, इतर चलनांच्या तुलनेत एकाच वेळी वाढत असल्याने खरेदीसाठी कोणतेही चलन वापरले, तरी जपानी वस्तू महागच ठरत आहेत. साहजिकच सर्व मोठ्या जपानी कंपन्यांना हजारो कोटींचा तोटा सहन करावा लागत आहे. कंपनी तोट्यात आली की, पहिली कु-हाड कामगारांवर येते.
संभाव्य कामगार कपातीचे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. ते म्हणजे जपानी उद्योग आपली उत्पादनाची युनिट्स जपानच्या बाहेर हलवीत आहेत. वर्षभरापूर्वी आलेल्या प्रचंड सुनामीमुळे जपानच्या काही भागांची वाताहत झाली. त्यामध्ये सर्वात मोठा फटका वाहन उद्योगाला बसला. निर्यातीसाठी तयार असलेली लाखो वाहने अक्षरश: पाण्यात गेली. जपानची भौगोलिक स्थिती पाहता प्रचंड मोठे भूकंप आणि सुनामी यांना वारंवार तोंड द्यावे लागेल असे सर्वच क्षेत्रातील तज्ज्ञांना वाटत आहे. त्यामुळे सुनामीनंतरच आपली उत्पादन केंद्रे जपानमधून इतर देशांत, विशेषत: भारतात, हलवण्यास यापूर्वीच सुरुवात झाली आहे. येनच्या सतत वधारण्यामुळे या प्रक्रियेने आणखी जोर धरला आहे. उत्पादन केंद्रेच देशाबाहेर गेली तर त्यामध्ये काम
करणारे हजारो कामगार स्वाभाविकच बेरोजगार होणार आहेत.
जपानमध्ये घडत असलेल्या या घडामोडींमुळे सुनामीच्या तडाख्यातून सावरू पाहणारा हा देश अधिकच अडचणीत आला आहे. आर्थिकदृष्ट्या प्रबळ असणाºया सर्वच देशांत आर्थिक विकासाचा दर अत्यंत कमी आहे. कारण विकासाचे नवे कार्यक्रम घेण्याची फार मोठी गरज तेथे भासत नाही. जपानने गेल्या जुलैमध्ये आपल्या विकासाचा दर 2.9 ठरवला होता. आता तो कमी करून त्यांना 2.2 वर आणावा लागणार आहे. याचा अर्थ विकासकामांसाठी खर्च होणारा सरकारी निधी आणखी कमी होईल आणि त्याचा परिणाम पुन्हा अर्थव्यवस्थेवर होईल. 1992 पासून जपानचे दरडोई उत्पन्न वाढलेले नाही हेही यासंदर्भात लक्षात घेतले पाहिजे. जपानी अर्थव्यवस्था आधीच अशा कुचंबलेल्या अवस्थेत असताना हा धक्का अर्थव्यवस्थेला दोलायमान करणारा ठरणार आहे.
जपानमधील या घडामोडींमुळे जपानी उद्योगांची उत्पादन केंद्रे मोठ्या प्रमाणात भारतात आली तर ते आपल्या फायद्याचेच ठरणार आहे. गेल्या काही वर्षांत जपानी वाहन उद्योग, इलेक्ट्रॉनिक उद्योग यांची उत्पादन केंद्रे भारतात सुरू झाली आहेतच. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाला आहे. शिवाय या कंपन्यांना भारतातील उत्पादने स्वस्त पडत असल्याने जपानी उद्योग भारतात येण्याचे प्रमाण वाढतच जाणार आहे. या संधीचा भारतीय अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी आपण किती उपयोग करून घेतो हे महत्त्वाचे ठरणार आहे.
(लेखक व्हिडिओकॉन समूहाचे अध्यक्ष आहेत)