आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Wrong Policy Can Be Cancelled In Free Look Period

फ्री-लूक कालावधीत परत करू शकता चुकीने विकलेली पॉलिसी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयुर्विमा विवाहाप्रमाणे आहे. यात विमा कंपनीबरोबर दीर्घ कालावधीत प्रीमियम देण्याची हमी द्यावी लागते. विवाहात जीवनसाथीची निवड चुकली तर जीवन एक तडजोड होऊन जाते. मात्र, आयुर्विम्यात असे नाही. विमाधारकाला पॉलिसीची कागदपत्रे मिळाल्याच्या तारखेपासून 15 दिवसांचा फ्री-लूक अवधी मिळतो. ही कागदपत्रे वाचल्यानंतर आपल्या गरजेनुसार ही पॉलिसी नाही हे लक्षात आल्यास या काळात विमा कंपनीला ती पॉलिसी परत करता येते. कारण बर्‍याच वेळा ग्राहकाला माहिती देण्यात आलेलीच पॉलिसी देण्यात येते असे नाही, बर्‍याचदा चुकीची पॉलिसी ग्राहकांच्या माथी मारली जाते.

फ्री-लुक कालावधीत ही पॉलिसी परत केल्यास विमा कंपनी ती रद्द करून प्रीमियममधून पुढील खर्च वजा करून ती परत करते. : 1. पॉलिसीधारकाच्या वैद्यकीय तपासणीचा खर्च. 2.स्टॅम्प ड्यूटीसारखे प्रशासकीय व सेवा खर्च. 3. जितके दिवस पॉलिसी विमाधारकाच्या नावे राहिली त्याचे मार्टेलिटी शुल्क . युलिप (युनिट लिंक्ड पॉलिसी) पॉलिसींबाबत एनएव्हीमधील बदल विमाधारकाला सहन करावा लागतो.

कुठे कराल अर्ज : फ्री-लूक कालावधीत पॉलिसी परत करायची असेल तर विमा कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा. तेथील पद्धती जाणून घ्यावी. मूळ पॉलिसी करारपत्र आणि रद्द करण्याचा अर्ज भरून देण्याविषयी कंपनीकडून सांगण्यात येईल. विमा कंपनीच्या स्थानिक शाखेत जाऊन औपचारिकता पूर्ण करावी.
लक्षात ठेवण्याच्या बाबी : 1. काही विमा कंपन्या पॉलिसीची कागदपत्रे एजंटांकडे पाठवतात. फसवणूक प्रवृत्तीचे एजंट ही पॉलिसी ग्राहकाला 15 दिवसांनंतर मिळेल यासाठी प्रयत्न करतात. यासाठी सतत एजंटच्या संपर्कात राहावे. पॉलिसी वेळेवर मिळेल हे पाहावे.
2. पॉलिसी परत करण्याचा विचार एजंटाकडे बोलून दाखवल्यास तो समजावण्याचा प्रयन करील किंवा फ्री-लुक कालावधीपर्यंत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न करील. अशा स्थितीत हा कालावधी लक्षात घेऊन स्वत: विमा कंपनीच्या कार्यालयात जाऊन पॉलिसी परत करावी.
3. या सुविधेसाठी प्रत्येक विमा कंपनीची वेगवेगळी प्रक्रिया असते. काही कंपन्या याची सूचना कॉल सेंटरला देण्यावर जोर देतात, तर काही कंपन्यांचा यासाठी ठरावीक फॉरमॅट आहे. विमा कंपनीचे यासाठी काय नियम आहेत हे लक्षात घेऊन त्याची पूर्तता करावी.
4. टपाल मिळण्यास लागणारा कालावधी लक्षात घ्या. टपाल तसेच कुरिअर मिळण्यास विलंब होऊ शकतो. फ्री-लुक कालावधीचे पालन केले जात आहे का, हे लक्षात घ्या.
5. विमा कंपनीकडे पॉलिसी परत केल्यानंतर त्याची पोचपावती घेण्यास विसरूनका. कंपनीकडून यदाकदाचित फ्री-लुक कालावधीचा लाभ देण्यास नकार आला तर ही पावती उपयुक्त ठरते.

स्वत: सतत जागरूक राहणे हा सर्वात महत्त्वाचा मंत्र आहे. एजंटाला पहिल्याच भेटीत फ्री-लुक कालावधीची आपणास माहिती आहे याची जाणीव करून द्या. त्यामुळे एजंट चुकीचा सल्ला देणार नाही.
- लेखक सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत आणि द फायनान्शियल प्लॅनर्स गिल्ड इंडियाचे सदस्य आहेत.