आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

याहूला उतरली कळा : सह-संस्थापक जेरी यांग यांचा राजीनामा

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅन फ्रॅन्सिस्को - इंटरनेट विश्वात दबदबा निर्माण करणारी कंपनी 'याहु'चे सह-संस्थापक जेरी यांग यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
यांग यांनी कंपनीचे अध्यक्ष रॉय बोन्स्टॉक यांना एका लेखी पत्राद्वारे आपला राजीनामा कळविला असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, याहू कंपनीतील माझे योगदान संपले असून त्या व्यतिरिक्त काही विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या कंपनीच्या स्थापनेत माझा वाटा राहिला, त्यापासून आता मला वेगळे व्हावे लागत आहे. याहुचे कार्यकारी प्रमुखपदी स्कॉट थॉम्पसन यांची नियुक्ती योग्य असून त्यांच्या नेतृत्वाबद्दल आपण समाधानी आहे.
दरम्यान, यांग यांचे याहूच्या यशात मोठे योगदान असल्याचे बोन्स्टॉक यांनी म्हटले आहे.
यांग यांनी याहू इन्कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळावरील, जपानमधील याहूच्या संचालकपदाचा तसेच अलिबाबा ग्रुप ऑफ होल्डिंग लिमिटेड, याहू या उपकंपन्यांतील पदांचाही राजीनामा दिला आहे. यांग व डेव्हिड फिलो या दोघांनी १९९५ मध्ये याहूची स्थापना केली होती.
गेल्या तीन-चार वर्षापासून याहूच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे याहू इन्कॉर्पोरेशनमधील ६०० हून अधिक कर्मचा-यांना 'ले ऑफ' देण्यात आला होता. कंपनीची एकूण कर्मचारी संख्या सुमारे १४ हजाराच्या आसपास होती. ती आता साडेतेरा हजाराच्या घरात आली आहे. कंपनीचा महसूल वाढविण्यासाठी कंपनीने दोनदा नव्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली होती. मात्र, गूगल आणि फेसबुक यासारख्या बड्या कंपन्यांशी याहू टक्कर देऊ शकली नाही.
तर, दुसरीकडे जाहिरात उत्पन्न घटत असल्याने याहू कंपनीचे अध्यक्ष रॉय बोन्स्टॉक यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरोल बार्टझ यांची गच्छंती करीत दूरध्वनीवरूनच निरोप देऊन काढून टाकले होते. कंपनीचे घटलेले उत्पन्न व अलिबाबा या कंपनीबरोबर झालेला तणाव या दोन कारणांमुळे कॅरोल यांना काढून टाकण्यात आले होते.