आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तरुण कर्मचार्‍यांचा भविष्य निर्वाह निधी सेबी म्युच्युअल फंडांत गुंतवणार ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील म्युच्युअल फंड व्यवसायाला गती देण्यासाठी भांडवल बाजार नियंत्रक व नियामक मंडळाची (सेबी) नजर आता तरुण कर्मचार्‍यांच्या जमा भविष्य निर्वाह निधीवर आहे. या कर्मचार्‍यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) खात्यातील जमा रक्कम म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांत गुंतवण्याचा प्रस्ताव सेबीने म्युच्युअल फंडासाठी तयार होत असलेल्या नव्या धोरणात केला आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडे (ईपीएफओ) सध्या सुमारे 5.5 लाख कोटी रुपयांचा निधी आहे. यातील काही रक्कम म्युच्युअल फंडांतील विविध योजनांत गुंतवावी, असे सेबीचे मत आहे. मात्र, म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांत असलेली जोखीम लक्षात घेतल्यास अशा गुंतवणुकीत होणारे संभाव्य नुकसान अडचणीचे ठरू शकते. हा मुद्दा लक्षात घेऊन ज्या तरुण कर्मचार्‍यांचे मासिक उत्पन्न 6500 रुपयांपेक्षा जास्त आहे, अशा कर्मचार्‍यांची जमा रक्कम म्युच्युअल फंडांत गुंतवण्याचा सेबीचा प्रस्ताव आहे.
सेवानिवृत्ती जवळ आलेल्या कर्मचार्‍यांची जमा रक्कम सुरक्षित ठेवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. तसेच कमी उत्पन्न असलेल्या कर्मचार्‍यांना या जोखमीपासून दूर ठेवण्यात येणार आहे. सेबीकडून म्युच्युअल फंड उद्योगासाठी दीर्घकालीन धोरण ठरवण्यात येत आहे. त्यात सेबीकडून सरकारला अशा आशयाचा प्रस्ताव देण्यात येणार आहे. त्यामुळे तरुण कर्मचार्‍यांची ईपीएफमधील काही रक्कम फंडांच्या योजनेत गुंतवण्याचा मार्ग मोकळा होईल. सेबीच्या मंडळाने या धोरणाला मंजुरी दिली आहे. आता यावर सर्व पक्षांची मते मागवण्यात आली आहेत. मते लक्षात घेऊन सेबी या धोरणाला अंतिम रूप देणार आहे.
वित्त मंत्रालयाने 2008 मध्येच ईपीएफओची 15 टक्के रक्कम म्युच्युअल फंडात जमा करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, भांडवली बाजारातील जोखीम लक्षात घेऊन ईपीएफओच्या विश्वस्तांनी मंजुरी नाकारली. त्यामुळे फंडांच्या इक्विटीशी निगडित योजनांत ईफीएफओकडून काहीच गुंतवणूक झालेली नाही. र्शम मंत्रालयानेही या निर्णयाला विरोध दर्शवत म्युच्युअल फंडात अशा स्वरूपाची गुंतवणूक नको, असे स्पष्ट केले होते. आता हा निर्णय बदलावा यासाठी सेबीकडून सरकारदरबारी प्रयत्न सुरू आहेत.