आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शून्य टक्के व्याजदराच्या कर्जाला लगाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शून्य टक्के व्याजदरावर कर्ज’ म्हणत छुपे शुल्क आकारणा-या योजनांवर भारतीय रिझर्व्ह बँकेने बंदी आणली आहे. याशिवाय क्रेडिट व डेबिट कार्डद्वारे होणा-या खरेदीवर अतिरिक्त शुल्क आकारण्यासही मनाई करण्यात आली आहे.


मोबाइल, लॅपटॉप, टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन आदी उत्पादनांकडे ग्राहक आकर्षित व्हावे म्हणून बँका व रिटेलर कंपन्या ‘झीरो पर्सेंट फायनान्स स्कीम’ म्हणजेच बिनव्याजी कर्ज योजना चालवत आहेत. मात्र अतिरिक्त व छुपे शुल्क आकारून उत्पादनाच्या 10 ते 15 टक्के अधिक किंमत ग्राहकांकडून वसूल केली जाते. आरबीआयने म्हटले आहे की, अशा योजनांमुळे ग्राहकांत संभ्रमाचे वातावरण निर्माण होते. उत्पादनावर कोणत्या दराने किती कर्ज दिले जात आहे, हे ग्राहकांना स्पष्टपणे सांगितले गेले पाहिजे.


ग्राहकांनी डेबिट व क्रेडिट कार्डद्वारे ग्राहकोपयोगी वस्तूंची खरेदी केल्यास बिलामध्ये अतिरिक्त शुल्क आकारण्यासही बँका व रिटेलर कंपन्यांना बंदी आणण्यात आली आहे.


आरबीआयचे म्हणणे
० बँका/रिटेलर्स छुपे शुल्क आकारून किमतीपेक्षा अधिक पैसे वसूल करतात.
० एकाच प्रकारच्या कर्जासाठी व्याज व प्रोसेसिंग शुल्क वेगवेगळे आकारता येणार नाही.


असा आहे 0% व्याजाचा फंडा
समजा तुम्ही झीरो पर्संट स्कीमवर 30 हजार रुपयांचा मोबाइल खरेदी केला तर त्यावर तुम्हाला सहा महिन्यांपर्यंत 5 हजार रुपयांचा ईएमआय भरावा लागेल. येथे तुम्हाला आणखी किती पैसे द्यावे लागतील, हे सांगितले जात नाही. सुरुवातीलाच तुम्हाला 1 हजार रुपये प्रक्रिया शुल्क भरावे लागते. रोख खरेदीवर मिळू शकणारी 2 हजारांची सूट तुम्हाला स्कीममध्ये दिली जात नाही.म्हणजेच बिनव्याजी कर्जाच्या नावाखाली तुम्हाला अधिकचे 3 हजार रुपये मोजावे लागतील.


असे होते
नुकसान

०स्कीममधील छुप्या खर्चांचा पत्ता लागत नाही
०घेतलेल्या वस्तूंवर कॅश डिस्काउंट मिळत नाही
०यामुळे किमतीपेक्षा अधिक पैसे द्यावे लागतात
विक्रीवर विपरीत परिणाम होईल : कंपन्या व रिटेलर्सनी आरबीआयच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत यामुळे ग्राहकांचेच नुकसान होईल, असे म्हटले आहे. आधीच मंदी सुरू असताना ऐन सणासुदीत विक्रीवर विपरीत परिणाम होईल. द मोबाइल स्टोअरचे सीईओ हिमांशू चक्रवर्ती म्हणाले, आरबीआयचे पाऊल योग्य आहे, मात्र यामुळे सणासुदीत विक्रीत घट होईल.