आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 17 Instruments Run By Nilesh Kulkarni In Paithan

यूथ विंग: 17 वाद्ये वाजवणारा पैठणचा कलंदर नीलेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
Nilesh Kulkani, Paithan - Divya Marathi
Nilesh Kulkani, Paithan

तबला, ढोलकी, पखवाज अशा एक नव्हे तर तब्बल 17 तालवाद्यांवर नीलेश कुलकर्णी याची बोटे फिरल्यानंतर निर्माण होणारा ताल समोरच्या रसिकांच्या अंतरंगाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही. ढोलक, मृदंग, बगलबच्चा, हलगी, डाका, खड डमरू, खंजिरा, संबळ, कड, टमकी (दिमकी), कच्ची ढोल, ताशा, पट्टा, ढोल असे आजच्या तरुणांना माहिती नसणारे वाद्य नीलेश लीलया वाजवतो. पैठणसारख्या छोट्या गावात राहूनही आपल्या कलेला वाव देणार्‍या 26 वर्षांचा हा कलंदर कलाकर नीलेश याच्या ताला सुरांची दखलआघाडीचे संगीतकार अजय-अतुल यांनीही घेतली आहे. तुझ्या माझ्या संसाराला, दे धक्का, नटरंग या सिनेमांच्या म्युझिक अरेंजिगमध्ये नीलेशचा सक्रिय सहभाग होता.

वयाच्या दहाव्या वर्षांपासून त्याने तालवाद्य वाजवण्यास सुरुवात केली. घरी कुठल्या प्रकाराचे वातावरण नसताना त्याचा हा छंद अनेकांना तोंडात बोटे घालायला लावणारा ठरला. विशेष म्हणजे लहानपणीच पोलिओ झाल्यामुळे एक पाय अधू झाला. परिस्थितीवर मात करत त्याने आपली आवड तर जोपासलीच, सोबत डी फार्मसीचे शिक्षणही पूर्ण केले. त्यातही त्याचे मन रमले नाही. पैठणमध्ये त्याचा कॉम्प्युटर सेल्स आणि सर्व्हिसचा व्यवसाय आहे. पु.ल. नी सांगितल्याप्रमाणे ‘पोट भरण्यासाठी लागणारे शिक्षण जरूर घ्या. पण साहित्य, कला, संगीत, अभिनय अशा एखाद्या तरी कलेशी मैत्री जमवा. पोटासाठी केलेला उद्योग तुम्हाला जगवील, पण कलेशी केलेली मैत्री का जगायचे, ते शिकवील’. आनंदीपणे जगण्याचे हे सूत्र अंगी बाणवणारा नीलेश दिवसभर संगणकाच्या दुनियेत मश्गूल राहतो. तर सायंकाळी साधना करतो ती चर्म वाद्यांची! त्याने या वाद्याची भाषा शिकल्यानंतर हा संगीताचा प्रवास अजूनच आनंदमयी झाला आहे. नीलेश पाचवीत असताना पहिल्यांदाच त्याने तबल्यावर थाप मारली होती. त्यानंतर मात्र त्याने मागे वळून पाहिलेच नाही. नीलेशचा जन्म परभणी जिल्ह्यातील मानवत येथील. वडिलांच्या नोकरीच्या निमित्ताने जेथे बदली झाली तेथे नीलेशचे शिक्षण झाले. पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयात मानसशास्त्र विषयात त्याने पदवी घेतली. यानंतर त्याने उदरनिर्वाहासाठी कॉम्प्युटर कोर्स केला. आणि आपल्या कलेला व्यवसायाची जोड दिली. माजलगाव येथील प्राणेश पोरे, विजय चव्हाण (सुलोचना चव्हाण यांचे चिरंजीव, मुंबई) ,सत्यजित जामसंडेकर (मुंबई), कृष्णा मुसळे (मुंबई) तसेच अजय- अतुल यांच्याकडूनदेखील त्याने वाद्यांचे शिक्षण घेतले. सारेगमपसारख्या कार्यक्रमात ड्रमची साथ संगत करणार्‍या नीलेश परबसोबतही त्याने काम केले आहे.

कलाकाराने सहानुभूती घेऊ नये
रंगमंचावर राजा असलेला कलाकार हा खाली उतरला की सहनुभूतीची अपेक्षा करतो. त्यामुळेच त्याचा आत्मविश्वास कमी होतो. कलाकाराने स्वत:चा मान स्वत: राखायला हवा, असे नीलेशला वाटते. त्याने कलाकारांना एकत्र करून ‘कल्पक क्रिएशन’ हा ग्रुप सुरू केला आहे. हा ग्रुप महाराष्ट्रभर भारुडांचे आणि वाद्याच्या जुगलबंदीचे कार्यक्रम करत पैठणची परंपरा कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. नीलेशने ‘एके बाला’ या वाद्य प्रकाराचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. या कला प्रकारात केवळ टाळ्या आणि तोंडाच्या आवाजाने ताल दिला जातो. सलग अडीच तास ढोलकी वाजवण्याचा रेकॉर्डही त्याने केला आहे.