आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्‍वातंत्र्य लढ्यातील 8 महत्‍त्‍वाचे टप्‍पे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिमला येथील ब्रिटिशांचे  व्हाइसरिगल लॉज बंद करण्यासाठी किल्ल्या आणि कुलूप घेऊन जाताना चौकीदार. - Divya Marathi
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिमला येथील ब्रिटिशांचे व्हाइसरिगल लॉज बंद करण्यासाठी किल्ल्या आणि कुलूप घेऊन जाताना चौकीदार.
१८५७ च्या पहिल्या उठावानंतर स्वातंत्र्यासाठी अनेक लढे झाले. चहूबाजूंनी नामोहरम झालेल्या इंग्रजांपुढे देश सोडण्याशिवाय पर्यायच नव्हता. १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्याची पहाट दाखवणाऱ्या ८ महत्त्वाच्या टप्प्यांबद्दल जाणून घेऊया.
 
1) बंगालची फाळणी (१९०५ )- संपूर्ण राष्ट्राची एकता दिसली  
नव्या शतकात १९०५ मध्ये लॉर्ड कर्झनने पूर्व आणि पश्चिम अशा दोन भागांत बंगालची फाळणी केल्याने देशभर संताप निर्माण झाला. परिणामी इंग्रजांविरोधात संघटित आंदोलन सुरू झाले. फाळणीमुळे समान भाषा, संस्कृती आणि आर्थिक संबंधांमुळे संपूर्ण बंगाल अस्वस्थ होता. आसाम व पूर्व बंगाल हा मुस्लिमबहुल भाग होता. फाळणीमुळे बंगाली मुस्लिम, बंगाली हिंदूंपासून विभक्त झालेे. इंग्रजी राजवट जनतेत दुफळी माजवून जातीयवाद पसरवू पाहत आहेत, हे लोकांच्या लक्षात आले. यातून देशातील पहिल्या मोठ्या आंदोलनाची मुहूर्तमेढ रोवली गेली.  

वंदे मातरम्...पहिला मंत्र  
- डिसेंबर १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना झाली होती. काँग्रेसने बंगालच्या फाळणीस प्रचंड विरोध केला. १८७० मध्ये बंकिमचंद्र चटोपाध्याय रचित ‘वंदे मातरम्’ गीत देशभर गायले जात होते. गांधीजींनी १९३९ मध्ये ‘हरिजन’मध्ये लिहिले की, ‘बंगालच्या फाळणीवेळी वंदे मातरम् हा हिंदू आणि मुस्लिमांतील सर्वांत बलाढ्य नारा म्हणून नावारूपास आला’. तथापि, यावरून अनेक वादही जोडले गेले. 
 
2) सत्याचा पहिला विजय झाला: चंपारण्य सत्याग्रह (१९१७) 
एप्रिल १९१७ मध्ये गांधीजी चंपारण्यला पोहोचले आणि पोहोचताच सरकारने चंपारण्य सोडण्याचा इशारा दिला. गांधीजींना अटक झाली. चंपारण्य सोडून पुन्हा येथे पाय ठेवू नये, असा न्यायालयात त्यांच्यापुढे प्रस्ताव ठेवण्यात आला. गांधीजींनी नकार दिला. न्यायालयाला आंदोलकांनी वेढले होते. घोषणाबाजी सुरू होती. न्यायाधीश घाबरले. त्यामुळे गांधीजींनी बाहेर जाऊन जमावास शांत केले. शेवटी तक्रार मागे घेण्यात आली व चंपारण्य सत्याग्रह शांततेच्या मार्गाने पुढे सुरू झाला.  

पहिले मोठे आंदोलन, पहिला विजय  
चंपारण्य सत्याग्रह हे  पहिले मोठे आंदोलन होते. स्वातंत्र्यासाठी देशाला सत्याग्रहाच्या रूपात अचूक शस्त्र सापडल्यामुळे याचे महत्त्वही तेवढेच होते.
 
3) अन् इंग्रज घृणेस पात्र ठरले:  जालियनवाला हत्याकांड (१९१९)
रविवार, १३ एप्रिल १९१९ रोजी वैशाख पौर्णिमेच्या मुहूर्तावर अमृतसरातील जालियनवाला बागेत सुमारे १५ ते २० हजार लोक एकत्रित जमले होते. तितक्यात जनरल रेजिनाल्ड डायरने कोणताही इशारा न देता नि:शस्त्र पुरुष, महिला आणि मुलांवर बेछूट गोळीबार सुरू केला. सुमारे १६५० गोळ्यंच्या फैरी झाडण्यात आल्या.  यावेळी प्रचंड गोंधळ उडाला. चेंगराचेंगरी व गोळीबारात १२० जण मृत्युमुखी पडले तर काहींनी विहिरीत उड्या मारल्या. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने यात हजारापेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेल्याचा आरोप केला. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या हंटर आयोगापुढे डायर म्हणाला की, ‘जमाव पांगल्यानंतरही आम्ही गोळीबार थांबवला नाही. कारण, गोळीबार करणे हेच माझे कर्तव्य होते. मी जखमींच्या देखभालीचेही प्रयत्न केले नाहीत. कारण, ते माझे काम नव्हते.’ हंटर आयोगाने डायरला शिक्षा सुनावणे तर दूरच, साध्या कारवाईचीही शिफारस केली नाही.   

डायरची हत्या करून वचपा  
क्रांतिकारक उधम सिंह यांनी  जालियानवाला हत्याकांड उघड्या डोळ्यांनी पाहिले होते. ओ डायर हा पंजाबचा माजी लेफ्टनंट गव्हर्नरनेच गोळीबारास परवानगी दिली होती. यामुळे  संतप्त झालेल्या उधम सिंह यांनी लंडनच्या काक्सटन हॉलमध्ये ओ डायरची गोळ्या घालून हत्या केली.
 
4) संपूर्ण देश विरोधात उतरला:   बापूंची असहकार चळवळ (१९२०)  
१९२० मध्ये महात्मा गांधी यांनी असहकार चळवळ सुरू केली. ही चळवळ १९२२ पर्यंत चालली. विद्यार्थ्यांनी शाळेत, वकिलांनी न्यायालयावर बहिष्कार टाकला. प्रत्येक गाव-खेड्यातील कष्टकरी संपावर गेले. १९२१ मध्ये शेकडो संप झाले आणि त्यात लाखो श्रमिक व कर्मचारी सहभागी झाले. याने स्वातंत्र्यसंग्रामास नवी दिशा दिली. इंग्रजांच्या हातून आपल्याला कधीच न्याय मिळू शकणार नाही, अशी गांधीजींची भावना झाली. त्यातून हे आंदोलन सुरू झाले.  

असहकार चळवळ मागे
४ फेब्रुवारी १९२२ मध्ये चौरीचौरामध्ये जमावाने एका पोलिस ठाण्याला आग लावली. त्यात २३ पोलिस होरपळले. या घटनेमुळे व्यथित होऊन म. गांधीजींनी असहकार चळवळ मागे घेतली.
 
5) लाला लजपतराय यांची भविष्यवाणी...१९२८मध्‍ये लाला लजपतराय यांचा लाठीचार्जमध्ये मृत्यू  
३ फेब्रुवारी १९२८ रोजी सायमन कमिशन मुंबईत आले. देशभरात ‘सायमन कमिशन, गो बॅक’चा नारा सुरू झाला. लाहोरमध्ये लाला लजपतराय यांच्या नेतृत्वातील मोर्चावर सँडर्स या पोलिसाने केलेल्या लाठीमारात लालाजींचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी लालाजींनी भविष्यवाणी केली की, ‘मेरी हर एक चोट ब्रिटिश राज्य के ताबूत की कील साबित होगी.’  

एका फाशीने अवघा देश एकवटला  
लालाजींंच्या हत्येस जबाबदार असलेल्या सँडर्सची पंजाबमध्ये भगतसिंग व राजगुरू यांनी हत्या केली. पंजाब असेंबलीमध्ये बॉम्ब फेकल्याच्या आरोपातून १९३१ मध्ये भगतसिंग,सुखदेव व राजगुरू फाशी देण्यात आली. या फाशीमुळे संपूर्ण देश एकवटला.
 
6) संपूर्ण स्वराज्याची घोषणा: दांडी यात्रेने देशजागृती (१९३०
२६ जानेवारी १९३० रोजी देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा झाला. त्याच वर्षी गांधीजींनी मिठाच्या कायद्याविरोधात दांडी यात्रा काढली. ११ व १२ मार्च १९३० च्या रात्री संपूर्ण साबरमती आश्रम ऊर्जामय झाला होता. सर्व गावकरी एकत्र जमले होते. गांधीजींना केव्हाही अटक होणार, अशी परिस्थिती होती. पण गांधीजी व त्यांच्या सोबतच्या आंदोलकांना त्याची पर्वा नव्हती.
   
९५,००० आंदोलकांना कैद  
गांधीजी, नेहरूंसह काँग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांना अटक करण्यात आली. अनेक शहरांत हिंसाचार माजला. दोन महिन्यांत देशभरातून सुमारे ९५ हजार आंदोलकांना पोलिसांनी  तुरुंगात डांबले.
 
7) अन‌् इंग्रज ढेपाळले: आझाद हिंद सेना आणि देशाचा ध्वज फडकला (१९४२ )
दुसऱ्या महायुद्धावेळी १९४२ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेना स्थापली. आझाद हिंदच्या सदस्यांनी १४ एप्रिल १९४४ रोजी देशात पहिल्यांदा ध्वज फडकवला. कर्नल शौकत मलिक यांनी काही मणिपुरी आणि आझाद हिंद सेनेच्या सहकाऱ्यांच्या मदतीने मौरांगमध्ये (मणिपूर) ध्वजारोहण केले. आझाद हिंद सेनेत ८५,००० सैनिक होते. आझाद हिंद रेडिओच्या माध्यमातून ही सेना देशवासियांना स्वातंत्र्य संग्रामात सहभागी होण्यासाठी प्रेरित करायची. या रेडिओवरून इंग्रजी, हिंदी, मराठी, बंगाली, पंजाबी, पश्तू आणि उर्दूतून वृत्त प्रसारित व्हायचे. पण, एका विमान अपघातात नेताजींचा दुर्दैवी मृत्यू झाला.  

तुम मुझे खून दो...या घोषणेने सारा देश जागरूक झाला  
रंगूनच्या ज्युबिली हॉलमध्ये नेताजींनी ऐतिहासिक मंत्र दिला.. ‘ऐसे नौजवानों की जरूरत है, जो अपना सिर काटकर स्वाधीनता की देवी को चढा सके। तुम मुझे खून दो, मै तुम्हे आझादी दूंगा’
 
8) देशाचा निश्चय- करा किंवा मरा: (१९४२) भारत छोडो आंदोलन 
 ८ ऑगस्ट १९४२ च्या मध्यरात्री गांधीजींनी जनतेला आवाहन केले की, ‘आता ब्रिटिशांनी आपल्याला एका स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून वागणूक देण्याची वेळ आली आहे. मी संपूर्ण भारतीयांच्या वतीने व्हॉइसरॉयची भेट घेऊन त्यांना काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारण्याची विनंती करणार आहे. आमची मागणी संपूर्ण स्वातंत्र्याची असून त्याबद्दल व्हॉइसरॉयशी कोणतीही तडजोड आम्ही करणार नाहीत. ते विषयांतर करतील.  आपल्यासमोर मीठावरील कर रद्द करण्याचा किंवा अन्य विषयासंबंधीचे प्रस्ताव ठेवतील. पण असा कोणताही प्रस्ताव आम्ही स्वीकारणार नाहीत. आमची अंतिम मागणी आणि ध्येय एकच राहील. ती म्हणजे संपूर्ण स्वातंत्र्य.

गांधीजींनी दिला स्वातंत्र्याचा मंत्र  
गांधीजी जनतेला म्हणाले होते, ‘एक मंत्र आपल्या हृदयात पक्का करा . तो मंत्र आहे ‘करा किंवा मरा’. एक तर स्वातंत्र्य मिळवून राहू किंवा या प्रयत्नात प्राण देऊ.’

 
बातम्या आणखी आहेत...