आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठ्ठावीस वर्षांत 80 दर्जेदार नाटके देणारा रंगकर्मी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुधीर भट व गोपाळ अलगेरी यांनी सुयोग नाट्यसंस्थेची 1 जानेवारी 1985 रोजी स्थापना केली. त्यानंतरच्या 28 वर्षांत सुयोग नाट्यसंस्थेने 80 नाटकांची निर्मिती केली. नाट्यवेड्या मराठी माणसाला नेहमी उत्तम नाटके बघायला मिळाली पाहिजेत, या ध्यासाने भट यांना झपाटले होते. नाट्यनिर्मितीत कलेचा ख-या अर्थाने कस लागतो, असे त्यांचे मत होते. सुयोग नाट्यसंस्थेच्या नाटकांच्या निर्मितीचा दर्जा हा नेहमीच उच्च असावा, यावर त्यांचा कायम कटाक्ष होता. मराठी नाटकांकडे प्रेक्षक फारसे वळत नाहीत, अशी ओरड पंधरा वर्षांपूर्वी होत होती; त्या काळात सुधीर भट यांनी आपली काही नाटके अमेरिका व त्यानंतर युरोपला नेऊन तेथे त्यांचे प्रयोग केले होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मराठी नाटकांचे क्षितिज विस्तारायला मदत झाली होती. प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभावा यासाठी आपल्या नाटकांचे उत्तम मार्केटिंग करण्यावरही ते भर देत असत. नाट्यनिर्मितीबरोबरच नाट्य व्यवसायातील घडामोडींबाबत ते अतिशय दक्ष होते. मराठी नाट्यव्यवसायाला हानी पोहोचविणा-या कोणत्याही गोष्टीचा जाहीरपणे तीव्र धिक्कार करणा-या काही मोजक्या नाट्यनिर्मात्यांमध्ये सुधीर भट हे अग्रेसर असत. सुयोग नाट्यसंस्थेच्या नाटकांतून काम करणा-यांपैकी प्रशांत दामले, विजय चव्हाण या गुणी कलाकारांनी पुढे नाट्यसृष्टीत स्वत:चे स्थान निर्माण केले. कलाकारांना कायम प्रोत्साहन देणारा निर्माता, अशी
भट यांची ख्याती होती.
दिलदार भट
प्रारंभीच्या काळात पुनरुज्जीवित नाटकांच्या बळावर निर्माता म्हणून जम बसवणा-या सुधीर भटांनी एका टप्प्यानंतर समकालीन आशयघन नाटके रंगभूमीवर आणण्याचे धाडस दाखवले. नाट्यनिर्मिती हा भटांचा छंद होता. माझ्या ‘इंटिरिअर डिझायनिंग’मधून पुरेसा पैसा मिळतो, नाटक मी पैसा मिळवण्यासाठी करत नाही, असे ते अभिमानाने सांगायचे. दिलदार असलेल्या भटांचा स्नेह कलावंतांना चहा देणा-यापासून ते नट-नेत्यांपर्यंत सगळ्यांशी होता.
‘सुयोग’ची आणखी काही गाजलेली नाटके
संध्याछाया, भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, हसत खेळत, दिनूच्या सासूबाई राधाबाई, प्रेमा तुझा रंग कसा, सुंदर मी होणार, उडुनी जा पाखरा, जावई माझा भला, व्यक्ती आणि वल्ली, श्रीमंत, प्रीतिसंगम, श्री तशी सौ, कशात काय लफड्यात पाय, निष्पाप, अप्पा आणि बाप्पा, करायला गेलो एक, हीच तर प्रेमाची गंमत आहे, चार दिवस प्रेमाचे, कशी मी राहू अशी, हवास मज तू, झालं एकदाचं, एकदा पहावं करून.
जवळचा मित्र गमावला
प्रसिद्ध अभिनेत्री वंदना गुप्ते यांनी नाशिकहून प्रतिक्रिया देताना सांगितले, की सुधीर भट हे अत्यंत मोकळ्या मनाचे अन् मोकळ्या दिलाचे नाट्यनिर्माते होते. कलाकारांनी देशाटन करावे, वेगवेगळे अनुभव घ्यावेत, असा त्यांचा आग्रह असायचा.
- वंदना गुप्ते, अभिनेत्री.