आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी नव्हे \'नाजुका\'मुळे \'अच्छे दिन\', अनोख्या पद्धतीने साजरा केला म्हशीचा वाढदिवस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाच वर्षाच्या नाजुकाचा वाढदिवस नुकताच मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला. - Divya Marathi
पाच वर्षाच्या नाजुकाचा वाढदिवस नुकताच मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला.

संग्रामपूर- देशातील जनतेला केंद्रातील मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवले पण अद्याप आले नाहीत. बळीराजा तर आपल्याला कधी अच्छे दिन येणार याची वाट पाहत बसलेला आहे पण येणार नाहीत. मात्र, बुलढाण्यातील एका शेतक-याला मोदीमुळे नाही पण आपल्या एका म्हशीमुळे अच्छे दिन बघायला मिळाले आहेत. त्याचमुळे या शेतकरी कुटुंबाने आपल्या लाडक्या नाजुका या म्हशीचा नुकताच धुमधडाक्यात वाढदिवस साजरा केला. मात्र, आता या नाजुकाच्या वाढदिवसाची चर्चा पंचक्रोशीत होत आहे.

 

याबाबतची माहिती अशी की, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पलसोडा गावात महादेव दुब्बल हे शेतकरी राहतात. या शेतकरी कुटुंबाकडे एक म्हैस होती, जिला पाच वर्षापूर्वी एक पिल्लू झाले. ज्याचे नाव दुब्बल कुटुंबियांनी 'नाजुका' असे ठेवले. या नाजुकावर या कुटुंबाचा पहिल्या दिवसापासून जीव जडला. अतिशय देखणी व चणचणीत या म्हशीच्या पिलाला दुब्बल कुटुंबांने चांगलेच पालनपोषण करत जोपासले. शिवाय मार्च महिन्यात जन्म झाल्याने लहानपणी त्रास होऊ नये म्हणून कूलरच्या हवेत ठेवत योग्य काळजी घेतली.

 

लाडकी नाजुका हळू हळू मोठी होत गेली, दोन वर्षाने ती गाबण राहिली व व्याली. यानंतर तिने कमालच केली. नाजुका रोज 14 लिटर दूध देऊ लागली. त्यामुळे बघता बघता दुब्बल कुटुंबियांची आर्थिक स्थिती बदलून टाकली. या नाजुकाच्या दुधाच्या उत्पन्नातूनच दुब्बल यांनी दोन मुलीची लग्ने केली. दुब्बल यांना 5 मुली असून, नाजुकाच्या जीवावर त्यांनी दोघींची लग्ने केली तर उर्वरित तिघींचे शिक्षण सुरू आहे. नाजुका जन्माला आल्यापासून घराला अच्छे दिन आल्याचे दुब्बल यांचे म्हणणे आहे. कारण त्यापूर्वी हे आर्थिक विवंचनेतून जात होते. मात्र, आता हे शेतकरी कुटुंबिय सुखी व आनंदाने जीवन जगत आहे. 

 

नाजुकामुळेच आपल्याला अच्छे दिन बघायला मिळाल्याची जाणीव ठेऊन महादेव दुब्बल कुटुंबियांनी नुकताच नाजुकाचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करून पंचक्रोशीत आनंद साजरा करतात. नाजुकाचा आदर व सन्मान म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही दुब्बल कुटुंबियांनी वाढदिवस साजरा करताना तिची हौसमौज केली. घरासमोर आकर्षक रांगोळी, वेगवेगळी फुले, रंगबेरंगी फुगे, घराबाहेर सर्वत्र विद्युत रोषणाई केली. जेवणाचा भक्कड बेत, सोबत परिसरातील लहान मुलांसह अबाल वृद्धांना नाजुकाच्या वाढदिवशी आमंत्रित केले. 

 

या सर्वांना रंग यावा म्हणून घराबाहेर बॅंड बाजाच्या तालावर मुले नाचू-बागडू लागली. यानंतर म्हशीची सजावट करून बॅंड बाजाच्या तालात गावातून तिची मिरवणूक काढली गेली. गावातील देव-देवळांची दर्शन झाल्यावर बालगोपाळ व अबाल वृद्धांना मिठाई वाटप झाले. नवख्या लोकांना तर येथे लग्नसोहळा असल्याचा भास झाला पण हे सर्व सुरू होतं नाजुकाच्या प्रेमापोटी. मग सायंकाळी नाजुकाचा केक कापून रीतसर पाचवा वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने साजरा झाला. मग पंचक्रोशीतील ग्रामस्थांना भोजन दिले आणि नाजुकाचा वाढदिवसाचा जल्लोष संपला. यंदाच्या नाजुकाच्या वाढदिवसाला गावातील सरपंच संदीप राऊत, डॉ. अनिल वानखडे, पोलीस पाटील, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 

विशेष म्हणजे दुब्बल कुटुंबिय आपल्या मुलींचा व घरातील इतर मंडळींचा कोणाचाही वाढदिवस साजरा करत नाहीत पण नाजुकाचा वाढदिवस ते आनंदाने साजरा करतात.

 

याबाबत महादेव दुब्बल सांगतात, पूर्वी आमची आर्थिक स्थिती हलाखीची होती. पण नाजुका आमच्या घरात आली आणि आमची गरिबी हळू हळू दूर होत गेली. आम्ही तिचा चांगला संभाळ केला पुढे तिनेही आम्हाला आधार दिला. आज ती रोज सकाळ- संध्याकाळ 7-7 लिटर दूध देते. तिच्यामुळे आमच्या कुटुंबाचा कायापालट झाला. आर्थिक तंगी दूर झाली व 'अच्छे दिन' आले म्हणावे लागेल. नाजुकामुळेच आज माझे कुटुंब स्वावलंबी जीवन जगत आहे. मला 5 मुली असून दोघींचे लग्ने झाले तर 3 मुलींचे शिक्षण नाजुकाच्या जीवावरच सुरु आहे. आज आमच्या घरात लक्ष्मी नांदत असून सुख शांती आहे. त्यामुळे आम्ही आनंदी जीवन जगत आहे, असे महादेव दुब्बल यांनी सांगितले.

 

पुढे स्लाईडद्वारे पाहा, नाजुकाच्या वाढदिवसाचे फोटोज.....

बातम्या आणखी आहेत...