आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणसं जोडणारा माणूस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बोरीकर सरांशी माझे नाते अगदी अनोखे होते. म्हणजे १९६४ मध्ये मी त्यांचा विद्यार्थी होतो. नंतर सामाजिक कामांच्या निमित्ताने त्यांच्याशी जोडला गेलो. पुढे सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा सदस्य झालो. मग सर अध्यक्ष आणि मी सरचिटणीस असा दीर्घ प्रवास झाला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू सांगता येतील. पण त्यातील महत्त्वाचा आणि मला भावलेला पैलू म्हणजे ते माणूस जोडणारे होते. त्यांच्यातील दुसरा महत्त्वाचा गुण म्हणजे ते संस्थेच्या हितासाठी, भरभराटीसाठी कायम कार्यरत होते.  नेहमी त्यांच्यात उत्साह होता. तिसरी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणाच्या दर्जाविषयी ते अतिशय जागरूक होते. बोरीकरांचे जीवन अतिशय संघर्षमय राहिले. मला आठवते तो काळ. १९६० चे दशक होते. सर शिक्षक म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी विद्यार्थी मिळवले. पुढे जेव्हा संस्थेने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा ते प्राध्यापक झाले. गोविंदभाई श्रॉफ यांनी त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. प्राध्यापक असूनही त्यावेळची परिस्थिती लक्षात घेऊन त्यांनी विद्यार्थी गोळा केले. आम्हाला त्यांनी अर्थशास्त्र शिकवले. त्याच काळात विद्यार्थी वसतिगृह सुरू झाले. तेव्हा वॉर्डनची जबाबदारी कोणी स्वीकारावी, असा प्रश्न होता. बोरीकर सरांनी ती घेतली आणि समर्थपणे सांभाळली. प्रत्येक विद्यार्थ्याकडे त्यांचे खास लक्ष होते. जे गरजू, अडले-नडलेले होते त्यांना ते मनापासून मदत करत. आणि जे आडदांड, धुमाकूळ घालणारे विद्यार्थी होते त्यांच्यावरही त्यांनी अंकुश ठेवला होता. त्यांच्या मुशीत तयार झालेले अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर पोहोचले आहेत. ते जेव्हा त्यांना भेटत तेव्हा त्यांच्या पाया पडत. तुम्ही आमचे जीवन घडवले असे सांगत. यावरून बोरीकर सरांनी त्यांच्यासाठी काय केले असावे, याचा अंदाज येतो. 


मी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेसाठी काम करावे, अशी सरांची खूप इच्छा होती. ती जेव्हा त्यांनी माझ्याकडे बोलून दाखवली. तेव्हा मी त्यास नम्रपणे नकार दिला. कारण मी मुळात वकिली पेशाचा. एखाद्या शिक्षण संस्थेच्या कारभारात आपण काय करू शकणार, असे मला वाटत होते. पण सरांचा आग्रह कायम होता. ते अगदी माझ्या घरी आले. माझ्या मुलाला म्हणाले, अरे तुझ्या वडिलांना जरा वकिली व्यवसायातून मोकळे कर म्हणजे त्यांना शिक्षण संस्थेची सेवा करता येईल. एका चांगल्या शिक्षण संस्थेला तुझ्यासारख्या व्यक्तीची गरज आहे. याचा तरी विचार कर, अशी भावनिक साद त्यांनी घातली. तेव्हा त्यांचा आग्रह मोडणे मला कठीण झाले. संस्थेचे कामकाज पाहण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी प्रत्येक छोट्या-मोठ्या गोष्टींत मार्गदर्शन केले. अगदी अलिकडची गोष्ट म्हणजे अटल टिकरिंग प्रयोगशाळा योजनेसाठी सरस्वती भुवनचा प्रस्ताव मंजूर झाला पाहिजे, याकरिता त्यांनी खूप पाठपुरावा केला होता.  


सभु शिक्षण संस्थेत ते अकाउंटंट म्हणून रुजू झाले होते. मग त्यांनी एमए केले. संस्थेची वाटचाल त्यांच्या डोळ्यासमोर झाली होती. सरस्वती भुवन शिक्षण संस्थेची घटना ५० वर्षे जुनी आहे. त्यात काळानुसार काही बदल झाले पाहिजेत. अधिकाधिक लोकांना संस्थेसोबत जोडले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे त्यांनी घटनादुरुस्तीला महत्त्व दिले होते. त्याकरिता ते स्वत: आघाडीवर राहिले. तुम्ही तर त्या संदर्भातील टिपणे पाहिली तर असे दिसेल काही दुरुस्त्यांसाठी नेमके कोणते शब्द वापरावेत, हे त्यांनीच सुचवले होते. एवढी तळमळ असलेले बोरीकर जाणे म्हणजे संस्थेचे आणि शैक्षणिक क्षेत्राचे तसेच समाजाचे मोठे नुकसान आहे. हे नुकसान आता कधीही भरून येणार नाही. 


मैं नही रहूँ दुनिया में.. 
११ जानेवारीला २६ जानेवारीच्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची बैठक होती. बोरीकर सरांची प्रकृती बिघडलेली होती. तरीही ते आले आणि त्यांनी संगीताचे शिक्षक दाशरथे यांना बोलावले आणि सांगितले की, जब भी मैं नही रहूँ दुनिया में, तब भी रहेंगे उजाले, हे गाणे म्हणायचे आहे. खरेतर अशा कार्यक्रमात स्फूर्तीगीते असतात. पण सरांची सूचना ऐकून आमचे मन गलबलले होते.


- अॅड. दिनेश वकील, सरचिटणीस, सभु शिक्षण संस्था 

बातम्या आणखी आहेत...