आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवघ्या विसाव्या वर्षी झाले कोट्यवधी चाहते; अॅलन वॉकर : जगातील सर्वात प्रसिद्ध संगीतकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिभा कधीच वयाशी बांधील नसते. ही बाब प्रसिद्ध संगीतकार आणि डीजे अॅलन वॉकर यांनी सिद्ध केली. अवघ्या २० व्या वर्षीच त्यांनी ‘फेडेड’ आणि ‘स्पेक्टर’सारखी अनेक लोकप्रिय गाणी बनवली आहेत. आज ते तरुण वर्गासाठी आदर्श आहेत. वॉकर आणि त्यांच्या कुटुंबाचा संगीताशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता. मात्र, संगीताची आवड आणि ज्ञान त्यांना आहे. अॅलन यांच्या संगीत रचनांमुळे आताच त्यांच्या चाहत्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. अगदी फार कमी लोकांना हे माहीत आहे की त्यांची आवड प्रोग्रॅमिंग आणि ग्राफिक डिझायनिंगमध्ये होती.


अॅलन अोलव्ह वॉकर यांचा जन्म २४ ऑगस्ट १९९७ रोजी नॉर्थ हॅम्पटन, युकेत झाला. आईचे नाव हिल्डे वॉकर. त्या नॉर्वेच्या. पिता फिलिप अॅलन वॉकर इंग्लंडचे. आपल्या माता-पित्यामुळे अॅलन यांच्याकडे दोन्ही देशांचे नागरिकत्त्व होते. वयाच्या दुसऱ्या वर्षी अॅलन आपल्या माता-पिता, बहिणीसह नॉर्वेच्या बर्गन शहरात शिफ्ट झाले. जगात तंत्रज्ञान वेगाने पसरत असताना अॅलन यांचा जन्म झाला. डिजिटल जगात जन्म झाल्यामुळे सर्वसामान्य मुलाप्रमाणेच त्यांनाही संगणकाचीच आवड होती. त्यामुळेच पुढे चालून त्यांनी प्रोग्रॅमिंग आणि ग्राफिक डिझायनिंगचे धडे गिरवले. मात्र लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. ही आवड त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातून यू ट्यूबच्या माध्यमातून त्यांनी संगीत शिकायला सुरुवात केली. संगीताशी निगडित अनेक विषय पाहिले.


२०१२ मध्ये डेव्हिड व्हिसलचे गाणे ऐकत असताना त्यांनी स्वत: संगीतकार बनण्याचा निश्चय केला. याविषयी जास्त माहिती मिळवण्यासाठी ते इटालियन डीजेला भेटण्यासाठी गेले. अॅलन यांना इलेक्ट्रॉनिक संगीत आधीपासूनच आवडायचे. सर्व माहिती मिळवल्यानंतर जुलै २०१२ पासून त्यांनी स्वत:ची संगीत कंपनी सुरू केली. "एफएल स्टुडिओ' सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ते आपल्या संगीत रचना बनवू लागले. आपल्या ऑनलाइन चाहत्यांच्या सल्ल्यानंतर अॅलन यांनी संगीतालाच आपले करिअर बनवण्याचा निर्णय घेतला.  यूट्यूब आणि साउंडक्लाउडवर आपल्या संगीत रचना ते पोस्ट करू लागले. आपल्या सुप्रिसद्ध गाण्यापैकी एक असलेले स्पेक्टरही त्यांनी आधी यू ट्यूबवरच पोस्ट केले होते. ग्राफिक डिझायनर असल्यामुळे आपला लोगोही त्यांनी स्वत:च बनवला होता. आता त्यांच्या चाहत्यांची संख्या झपाट्याने वाढत होती.
१७ ऑगस्ट २०१४ रोजी अॅलन यांनी वयाच्या १७ व्या वर्षी फेडेड रिलीज केले. हे गाणी लगेच लोकप्रिय झाले नाही. मात्र १९ नोव्हेंबर २०१४ ला नो कॉपीराइट साउंड्स अंतर्गत रिलीज करताच त्याचे प्रचंड कौतुक झाले. फेडेडला यूट्यूबवर २ कोटी ९० लाख व्हिह्यूज मिळाले. स्पॉटिफाईवर ७ कोटी वेळा ते प्ले केले गेले. साउंड क्लाउडवर त्याला २ कोटी लोकांनी पाहिले. मात्र अॅलन यांच्या आयुष्यात नवे वळण आले ते २०१५ मध्ये. स्वीडनच्या सोनी म्युझिकने फेडेड गाणे पाहिले. गाणे रिलीज झाल्यानंतर अनेक देशात ते दीर्घकाळ पहिल्या क्रमांकावर होते. अॅपलच्या आयट्यून चार्टनुसार तेे ३२ देशात एकाच वेळी पहिल्या क्रमांकावर होते. हेच गाणे यूट्यूबच्या पहिल्या १० सर्वाधिक पाहिल्या गेलेल्या व्हिडिओतही समाविष्ट आहे. अॅलन वॉकर आता प्रसिद्ध व्यक्ती बनली होती. त्यांची लोकप्रियता अनेक पटींनी वाढली होती.


फेडेडच्या अमाप यशानंतर अॅलन यांनी शाळा सोडून आपले सर्व लक्ष संगीतावर केंद्रित केले. त्यांनी लाइव्ह परफॉर्मन्स देणे सुरू केले. मार्च २०१६ पर्यंत त्यांनी ३० ते ४० रचनांची निर्मिती केली. त्यातीलच एक म्हणजे ‘सिंग मी टू स्लीप’. हे अतिशय लोकप्रिय झाले. अनेक देशात टॉपवर राहिले. त्यानंतर आले त्यांचे ‘अलोन’ गाणे. त्याला लोकांनी डोक्यावर घेतले. २०१६ मध्येच अॅलन यांनी आपला ‘रुटीन’ हा व्हिडिओ रिलीज केला. हे गाणी त्यांनी डेव्हिड व्हिसलसह बनवले होते. २०१७ मध्ये त्यांनी के-३९१ सह एक गाणे रिलीज केले होते. डेव्हिड व्हिसल अॅलन यांचे प्रेरणास्रोत आहेत.

बातम्या आणखी आहेत...