आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईशान्येत लोकांनी गोमांस खाऊ नये अशी भाजपची इच्छा, पण तो मुद्दा बनवणार नाही

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमंत बिस्व सरमा हे ईशान्येत भाजपचा सर्वात मोठा चेहरा आणि आसाममध्ये ९ विभागांचे मंत्री आहेत. नॉर्थ-ईस्ट डेमॉक्रॅटिक अलायन्सचे संयोजक सरमांशी २०१९ च्या रणनीतीवर चर्चा केली भास्करचे धर्मेंद्रसिंह भदौरिया यांनी. भाजपत सन्मान मिळाला. काँग्रेसच्या वेळीही मी हेच काम करत होतो, पण स्वीकृती नव्हती. मुख्यमंत्री होणे, न होणे ही किरकोळ बाब आहे. आज मी त्यापेक्षा खूप वर आहे.  

 

प्रश्न : २०१९ साठी तुमचे लक्ष्य काय आहे?   
उत्तर : ईशान्येत भाजप आणि आमची आघाडी आहे, नॉर्थ-ईस्ट डेमॉक्रॅटिक अलायन्स. सद्यःस्थितीत २५ पैकी १८-२० लोकसभा जागा आमच्या आघाडीला मिळायला हव्यात. 

 
प्रश्न : तुम्ही लोकसभा निवडणूक लढणार असल्याचीही चर्चा आहे, केंद्रीय राजकारणात जाण्याची इच्छा आहे का?   
उत्तर
: आसाममध्ये मी आमदार म्हणून २००१ पासून निवडून येत आहे. मंत्रीही आहे. दिल्लीहून ईशान्येसाठी खूप काम करता येऊ शकते, ते गुवाहाटीहून शक्य नाही. लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळाव्यात, अशी इच्छा आहे. निवडणूक लढवावी लागली तर लढेन.   


प्रश्न : तुम्ही म्हटले होते की, जेव्हा तुम्ही राहुल गांधींना भेटायला गेला होता तेव्हा ते कुत्र्यासोबत वेळ घालवत होते, तुमच्याशी बोलले नाहीत. त्यामुळेच काँग्रेस सोडली का?   
उत्तर
: काँग्रेस सोडण्याचे कारण हे नव्हते. तेव्हा काँग्रेस विधिमंडळ पक्षात अस्वस्थता होती. मुख्यमंत्री गोगोई साहेबांना बदला, अशी आमची मागणी होती. ५५ आमदारांनी गोगोईंच्या विरोधात आणि १२ जणांनी बाजूने मत दिले होते. सोनियाजींनी मागणी मान्य केली होती, पण राहुलजींचा दृष्टिकोन एकपक्षीय होता. मी, सी. पी. जोशी आणि गोगोई भेटण्यासाठी गेलो होतो तेव्हा राहुल पूर्णवेळ कुत्र्याशी खेळत राहिले. मी बोलत होतो, पण त्यांचे लक्षच नव्हते.  राहुलजींसोबत काम करण्याची स्थिती नाही, हे लक्षात आले. नंतर मी पक्ष सोडला. 

 
तुम्ही आसामचे मुख्यमंत्री होऊ न शकल्याने काँग्रेस सोडली, पण येथेही होऊ शकला नाहीत?   
 उत्तर
: असे नाही. मी गोगोईजींना बदलण्यासाठी पक्ष सोडला होता. राहुलजींनी बदलले नाही, तेव्हा आसामच्या जनतेने मुख्यमंत्री बदलला. मी अमित शहा यांना भेटलो होतो, तेव्हा मुख्यमंत्री होण्याचा हेतू नाही, असे मी सांगितले होते. भाजपत आल्यानंतर खूप सन्मान मिळाला. मुख्यमंत्री होणे, न होणे लहान बाब आहे. आज मी त्यापेक्षा खूप वर आहे.   


प्रश्न : तुम्ही काँग्रेसचा बदला घेत आहात का?   
उत्तर
: आसाम विधानसभा निवडणुकीच्या वेळी बदल्याची भावना होती. राहुलजींबद्दल जो राग होता, त्यात कदाचित राजकीय बदल्याची भावना होती. आत त्यांच्याबद्दल घृणा, बदल्याची भावना नाही. मी सकारात्मकपणे भाजपचे काम करत आहे. काँग्रेसमध्ये होतो, हे विसरलो आहे.   
प्रश्न : तुम्ही दोन आमदारांसोबत मेघालय आणि कमी संख्या असतानाही मणिपूरमध्ये भाजपचे सरकार स्थापून ‘पार्टी विथ डिफरन्स’ ही ओळख संपवली आहे का?   
उत्तर
: काँग्रेस तसा दुष्प्रचार करत आहे. कुठलीही जोड-तोड झाली नाही. निवडणुकीच्या वेळी एखादा पक्ष आमच्यासोबत आला नाही तर निवडणुकीनंतर आम्ही सर्व एक होऊ, अशी आमची रणनीती आहे. ही बाब आम्ही जनतेला प्रचाराच्या वेळीच सांगतो. त्यामुळे राजकीय आणि नैतिकदृष्ट्या हे योग्य आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर तासाभरातच आम्ही सरकार स्थापन करू शकलो.   


प्रश्न : भाजपच्या विचारसरणीशी देणे-घेणे नसलेले राजकीय पक्षही नॉर्थ-ईस्ट डेमॉक्रॅटिक अलायन्समध्ये आहेत. विचारसरणीपेक्षा सत्ता मोठी झाली का?   
उत्तर
: जे लोक रालोआसोबत आहेत, ते सर्व काँग्रेसविरोधी आहेत. भाजपच्या विचारसरणीशी हे सर्व पक्ष जोडले जावेत, हे गरजेचे नाही. आमचा समान कार्यक्रम आहे. ही आघाडी निवडणुकीसाठीच नाही, राष्ट्रनिर्माणासाठीही आहे.    


प्रश्न : कत्तलखान्यात गोहत्येला देशभर विरोध करणारा भाजप ईशान्येत चूप का आहे?   
उत्तर
: ईशान्येतील जनजाती बीफ खातात. दीर्घकाळची परंपरा आहे. येथे अशी स्थिती नाही की एक वर्ग बीफ खातो, दुसरा खात नाही, त्यामुळे त्याला दु:ख होते. येथेही गोहत्या होऊ नये, लोकांनी गोमांस खाऊ नये, अशी आमची इच्छा आहे. पण आम्ही त्यासाठी जबरदस्ती करणे आणि त्याला राजकीय मुद्दा बनवण्याच्या बाजूने नाही. 

 

प्रश्न : नागरिक संशोधन विधेयकाने आसामच्या मूळ नागरिकांनाच निर्वासित होण्यास विवश केले आहे. एवढा वाद का होत आहे?   
उत्तर
: येथील मूळ निवासींवर विधेयकाचा परिणाम होणार नाही. विधेयक मंजूर झाल्यास आसाममध्ये जे बंगाली हिंदू आले आहेत त्यांना नागरिकत्व मिळेल. मात्र, एका वर्गाचे म्हणणे आहे की, आसाममध्ये अनेक विदेशींना भारतीय मानले आहे, आता आणखी दबाव टाकू नका. आसाममध्ये वैध नागरिकांच्या गणनेसाठी एनआरसी अपग्रेडेशन सुरू आहे. ३० जूनला त्याचा निकाल येईल. येथे वास्तवात किती नागरिक आहेत, ही संख्या समोर येईल. त्यानंतरच निर्णय होईल.   

 

प्रश्न : या विधेयकाच्या मदतीने बांगलादेशच्या हिंदूंना राज्यात आणण्याचा प्रयत्न होत आहे का?   
उत्तर
: विधेयकामागील मूळ विचार असा आहे की, बांगलादेश-पाकिस्तान मुस्लिम देश झाले आहेत. त्यानंतर अनेक लोकांना (गैर-मुस्लिमांना) धार्मिक भेदभावाचा बळी व्हावे लागले. भारत स्वतंत्र झाला होता तेव्हा नेहरूंनी म्हटले होते की, तुम्ही वाटेल तेव्हा परत येऊ शकता. सध्या आसाममध्ये १९७१ पासून आतापर्यंत चौकशी होत आहे. बांगलादेशी किंवा पाकिस्तानी मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा प्रश्नच नाही. हे विधेयक हिंदू, ख्रिश्चन, जैन आणि बौद्धांसाठी आहे.

   
प्रश्न : गेल्या चार वर्षांत सांप्रदायिक ध्रुवीकरण देशात वाढले आहे. आसाममध्येही वाढले आहे का?   
उत्तर
: आसाममध्ये जे मूळ मुस्लिम आहेत, ते २००-३०० वर्षांपासून आहेत. त्यांच्याबाबत जास्त विरोधाभास नाही. बांगलादेशातून जे मुस्लिम येतात, त्यांच्या ओळखीचा मुद्दा आहे. कारण त्यांची संख्या ३२ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. आसामची ओळख त्यांच्यामुळे धोक्यात आली आहे. येथे १६ जिल्ह्यांत बांगलादेशी मुस्लिम बहुसंख्याक आहेत आणि आम्ही अल्पसंख्याक झालो आहोत.   


प्रश्न : तुम्ही बांगलादेशी मुस्लिमांना राज्यातून बाहेर करण्याची गोष्ट करता? कसे कराल?   
उत्तर
: आम्ही राज्यातून बाहेर करत नाही. जे बेकायदेशीररीत्या येथे राहत आहेत, त्यांना राजकीय अधिकार नसावा. आर्थिक अधिकार किती मिळावेत, यावरही चर्चा व्हायला हवी.   

बातम्या आणखी आहेत...