आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापरकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचे स्वप्न ज्यांनी उराशी बाळगले. ज्यांनी सर्वांना स्वातंत्र्याचा मंत्र दिला. ज्यांनी स्वराज्याची प्रेरणा दिली. त्या प्रेरणेतून निर्माण झालेली स्वराज्याची सोनेरी किरणे या भूमीवर पसरताना त्यांनी पाहिली देखील.. ते हिंदवी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले होत. वेरूळ हे शहाजीराजे भोसले यांचे मूळ गाव. नुकतीच त्यांची जयंती साजरी झाली, यानिमित्त त्यांच्या कार्यावर अाेझरता प्रकाश टाकणारा हा लेख...
वेरूळचे भोसले घराणे पूर्वीपासून अतिशय सुप्रसिद्ध होते. मालोजीराजे भोसले या घराण्यातील पराक्रमी सरदार होते. रयतेविषयी त्यांच्या मनात अतिशय प्रेम व जिव्हाळा होता. मालोजीराजे यांच्याकडे वेरूळची पाटीलकी होती, याच मालोजीराजे व दीपाबाई उर्फ उमाबाई यांना १८ मार्च १५९४ रोजी वेरूळ येथे पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव शहाजी असे ठेवण्यात आले.
वडील मालोजीराजे हे इंदापूरच्या लढाईमध्ये धारातीर्थी पडले. वडिलांच्या मृत्यूनंतर शहाजीराजे यांना त्यांची जहागिरी देण्यात आली. लखोजीराजे जाधव यांची सुकन्या जिजाई यांच्याशी शहाजीराजे यांचा विवाह इ.स. १६१०-११ मध्ये संपन्न झाला. विवाहानंतर शहाजीराजे हे आपल्या जहागिरीचा कारभार स्वत: पाहू लागले.
१७ व्या शतकाच्या सुरुवातीला दख्खनमध्ये शहाजी महाराज यांना वेळोवेळी संघर्ष करावा लागला, मग आदिलशाही, निझामशाही असो किंवा मोगलांशी ते सतत लढत राहिले. शहाजी महाराज एक महत्त्वाकांक्षी मराठा सरदार होते. दुसऱ्यांची चाकरी करण्याचा त्यांचा मानस नव्हता, ते स्वतंत्र विचाराचे व्यक्ती होते. त्यांना हिंदूंचेे स्वतंत्र राज्य असावे, असे वाटत होते. पण बलाढ्य मोगल असताना व दक्षिणेत आदिलशाही व निझामशाही प्रबळ असताना त्यांना सुरुवातीला निझामशाहीत राहून आपल्या पराक्रमामुळे तेथे दबदबा निर्माण केला.
भातवडी या ठिकाणी इ.स. १६२४ मध्ये झालेल्या लढाईत शहाजीराजे भोसले यांनी मोठा पराक्रम केला. या लढाईचे नेतृत्व जरी मलिक अंबरने केले असले तरी युद्धामध्ये पराक्रम हा भोसले बंधूंनी केला. भातवडीच्या लढाईची खरी व्यूहरचना ऐन पंचविशीतल्या तरुण शहाजीराजे यांची होती. याच लढाईत शरीफजीराजे भोसले हे शहाजी महाराजांचे धाकटे बंधू युद्धात मारले गेले.
निझामशहाला विजय मिळाला. यात फार मोठे योगदान शहाजीराजे यांनी दिले. बृहदीश्वरी शिलालेखात आलेल्या उल्लेखानुसार भातवडीच्या युद्धानंतर दरबारी रिवाजानुसार मुर्तजा शहाने मलिक अंबरला मोठेपणा दिला, तरी त्याने खास आदर सत्कार आपल्या कर्त्या व आवडत्या शहाजींचा केला. या भातवडीच्या विजयापासून दख्खनच्या राजकारणात शहाजीराजे यांचे महत्त्व वाढले. शहाजीराजे भोसले यांनी निझामशाहीत एकही वयस्कर निझामशहा नसताना एका दहा वर्षांच्या मुर्तजा नावाच्या निझाम वंशातील मुलावर छत्र धरून स्वातंत्र्याचा पहिला प्रयत्न केला. शहाजी महाराजांनी चालवलेल्या या मोहिमेचा बंदोबस्त करण्यासाठी मोगल व आदिलशहा यांनी एकत्र येऊन शहाजी महाराजांच्या विरोधात मोहीम आखली. या दोन्ही सत्तांच्या विरोधात पेमगिरी ते माहुली असा जवळपास ४-५ वर्षे संघर्ष शहाजीराजे यांनी केला.
शहाजीराजे जोपर्यंत लढणे शक्य आहे, तोपर्यंत माहुलीच्या किल्ल्यावर त्यांनी मोगल व आदिलशाही सैन्याशी निकराचा लढा दिला. पण या दोन्ही बलाढ्य सत्तांपुढे त्यांचा निभाव लागला नाही. अशा कठीण परिस्थितीत देखील शहाजीराजे नाउमेद झाले नाहीत. आदिलशहाने शहाजीराजे यांची कामगिरी पाहून पुढे या पराक्रमी सरदाराची आपणास मदत होईल, म्हणून त्यांना आदिलशाहीत सामील करून घेतले. या युद्धात शहाजीराजे यांचा पराभव झाला असला तरी एक मराठा सरदार राज्य करू शकतो, तो राजा होऊ शकतो हा अात्मविश्वास बाकीच्या दख्खनमधील सरदारांमध्ये निर्माण करण्याचे काम शहाजीराजे भोसले यांनी केले.
शहाजी महाराजांना मोठ्या आदराने आदिलशहाने आदिलशाहीत सामील करून घेतले. त्यांना ‘फर्जंद’ हा बहुमान मिळाला. याचा अर्थ असा की, शहाजी हा स्वतंत्र सेनापती- युवराजाच्या तालाचा- म्हणून त्यांना सर्व वजिराधिकाऱ्यांनी मान द्यावा. सुभा, सरलष्कर यांसारखा तो एक अधिकारी समजला जाऊ नये. अप्रत्यक्षपणे आदिलशहा युद्ध वगैरे प्रसंगात सहायक म्हणून गणला जावा. इतर सरदारांपेक्षा शहाजीराजे यांना विशेष अधिकार देण्यात आले होते.
कर्नाटकमधील हिंदू संस्थानिकांचे संपूर्ण उच्चाटन न करता आपले स्वामित्व त्यांना मान्य करायला लावून शहाजी महाराजांनी आपापल्या मुलखातील त्यांचे अस्तित्व कायम ठेवले.
यावरून शहाजी महाराजांच्या उदार धोरणाची व स्वकीयांबद्दल त्यांना वाटत असलेल्या ममत्वाची प्रचिती येते. शहाजी महाराज आदिलशाही राजवटीचे ताबेदार असले तरीही स्वदेश आणि स्वधर्म याविषयी त्यांच्या मनात प्रखर अभिमान जागृत होता.
स्वतंत्र राज्य निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न निष्फळ झाले असले तरी त्यांच्या दृष्टीपुढे तेच होते. आपली अपुरी राहिलेली हिंदवी स्वराज्य स्थापित करण्याच्या आकांक्षेने कर्नाटकातील हिंदू राज्य व संस्थाने शहाजी महाराजांनी आपल्या छत्राखाली टिकवून ठेवली. तेथील राजांना त्यांनी आपले मांडलिक बनवले.
शहाजीराजे जरी आदिलशाही सरदार असले तरी कर्नाटकात ते एका स्वतंत्र राजाप्रमाणे कारभार करत असत. या कालखंडात त्यांनी मोठी जिवाभावाची माणसे जाेडली. पुढे संकटाच्या कालखंडात तीच त्यांच्या मदतीस आली. शहाजीराजे अतिशय विद्वान, सुसंस्कृत, धाडसी, शूर, धोरणी, पराक्रमी, दूरदृष्टीचे व कल्पक होते. ते न्यायी तसेच प्रेमळ होते. राजनीती व समाजशास्त्रातदेखील ते पारंगत होते. समाजाचे हित त्यांना चांगले ठाऊक होते.
dakkamji.history@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.