आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी संस्कृतीमधील पहिले लिखित पुस्तक गिलगमेश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इसवी सन पूर्व सातच्या शतकामधील शेवटचा असिरीयन सम्राट असुरबानीपाल याची राजधानी, प्राचीन नगरी निनेवेह येथील भग्नावशेषाच्या  उत्खननामध्ये ब्रिटिश पुरातत्ववेता ऑस्टीन हेन्री लेयार्ड याला, इसवी सन १८३९ मध्ये,अज्ञात लिपीमध्ये मातीच्या टॅब्लेटवर लिहिलेले पंचवीस हजार लेख  आढळले. या लिपीला क्युनीफार्म हे नाव दिल्या गेले.

 

मानवजातीच्या सुदैवाने असिरीयन भाषांचा तज्ञ रॉलीन्सन याने या लिपीचे संपूर्ण वाचन केले. या क्लेटॅब्लेटसमध्ये डझनभर टॅब्लेटस् ह्या गिलगमेशच्या कथेविषयी आहेत. सर्वात प्राचीन टॅब्लेटसचा निर्मिती कालखंड हा इसवी सन पूर्व २१०० हा आहे.  या महाकाव्यातील शिर्षक नायक गिलगमेश हा इतर महाकाव्यातील नायकाप्रमाणे पौराणिक वा काल्पनिक पात्र नाही. तर तो प्राचीन नगरराज्य उरुकचा इसवी सन पूर्व सत्ताविसशेच्या कालखंडामधील ऐतिहासिक राजा आहे. काळाच्या आेघात त्याच्या जीवनपटाला दंतकथांच स्वरुप आले. संपूर्ण महाकाव्य त्याच्या जीवनावर रचल्या गेले. ही कथा आपल्या प्रत्येकाच्या जीवनातील मूलभूत व संवेदनशील प्रश्नाला हात घालते. मृत्युविषयी मुक्त चिंतन करताना, मानवाची अमरत्वाची आस व त्यामधील निष्फळपणा अधोरेखीत करते. मृत्युचा सहज स्वीकार करावयाचा संदेश देताना आपलं अमरपण आपल्या कर्तृत्वामध्ये शोधायला प्रवृत्त करते. ही कथा आहे व्यक्तीच्या आत्मशोधाची, त्याच्यामध्ये आलेल्या मूलभूत परिवर्तनाची, त्याच्या मैत्रीची, मृत्युच्या भयावह भितीची व शेवटी प्राप्त झालेल्या आत्मज्ञानाची. 

 

गिलगमेश हा महानायक दोन तृतियांश देव व एक तृतियांश मानव महापराक्रमी व महासामर्थ्यवान. आपल्या शौर्यासाठी व न्यायप्रियतेसाठी प्रसिद्ध. त्याने  उरुक या नगराची बांधणी केली. उंच व भक्कम परकोट बांधून नगर सुरक्षीत केले. देवतांसाठी विशाल देवालये उभारली. पर्वतामधून रस्ते काढले. वाळवंटात  विहिरी खोदल्या. नदीचे पाट फिरवून बागबगीचे केले. अमरत्वाच्या शोधात जगाच्या अंतापर्यंत दूष्कर प्रवास केला. प्राचीन महाप्रलयात एकमेव जीवंत राहिलेल्या व अमरपद प्राप्त झालेल्या उतनीपिश्तीम या पुराण पुरुषाला भेटून आला व शेवटी आपली कथा त्याने निलरत्नावर कोरुन काढली. 

 

परंतु महाकाव्याच्या सुरुवातीला तो अतिशय जुलमी व क्रूर दाखवलेला आहे. राज्यामधली कुठलीही स्त्री त्याच्यापासून सुरक्षीत नाही. त्याची सगळी बांधकामे  त्याने सक्तीच्या गुलामगिरीतून करुन घेतलेली. प्रजा त्रस्त होऊन देवतांकडे गाऱ्हाणे घेऊन जाते. देवता त्याला शह देण्यासाठी त्याच्या सारखाचा बलवान प्रतिस्पर्धी निर्माण करतात. त्याचे नाव एनकिडू. हा निसर्ग पुत्र. जंगलामध्ये राहणारा, जंगली प्राण्यांचा सहचर. धुर्त गिलगमेश देवालयातील वारांगणा  शमहाटला त्याच्याकडे पाठवतो. तिच्याशी रत झाल्यानंतर त्याचे जंगलीपण संपते. जंगलामधले सहजर प्राणी त्याला आेळखत नाहीत. शमहाट त्याला नागरजीवनाचे प्रलोभन दाखवून उरुकला घेऊन येते. जंगली एनकिडूचे नागर होणे हे प्रतिकात्मक आहे. मानववंश रानातील शिकार व कंदमुळे या अवस्थेपासून नागर संस्कृतीमध्ये परीवर्तीत झाल्याचे ते प्रतीक.  सिंहासनावर बसलेल्या दैदीप्यमान तेजस्वी गिलगमेशला बघून इस्थर ही साैंदर्याची देवता त्याला मोहीत होते व लग्नाची मागणी घालते. इस्थर ही ग्रीक  पौराणिक कथांमधील सौंदर्य देवता व्हीनसची पूर्वज.  गिलगमेश आता पहिल्या सारखा कामांध राहिलेला नाही.

 

तो तिला नकार देतो. झालेल्या अपमानामुळे इस्थर प्रचंड चिडते. स्वर्गातील भयंकर वृषभाला ती  गिलगमेशला ठार मारण्यासाठी पाठवते. परंतु दोघे मिळून हंबाबाप्रमाणे त्या वृषभाला सुद्धा ठार करतात.  पवित्र देवदार वृक्षांची कत्तल, हंबाबा व स्वर्गीय वृषभाचा वध यामुळे देवता अतिशय संतप्त होतात. गिलगमेशला शिक्षा देण्यासाठी एनकिडूला मृत्युदंड  देतात. बारा दिवसांच्या आजारानंतर तो मरण पावतो. इथून महाकाव्याला परत वेगळे वळण लागते. मित्राच्या मृत्युमुळे गिलगमेश उध्वस्त होतो. सतत शवाभोवती घिरट्या घालतो. परंतु मृतशरीर जेव्हा सडायला लागते तेव्हा तो स्वत:च्या मरणाच्या कल्पनेने हादरुन जातो. ही नियती आपल्याला सुद्धा भोगावी लागणार या जाणीवेने व्याकुळ होते. त्याला भौतीक वैभवाच्या अर्थहिनतेची व स्वत:च्या नश्वरपणाची विकल करणारी जाणीव होते. युफ्रेटीस नदीच्या प्राचीन पवित्र तिरावर निर्माण झालेली गिलगमेशची ही कहाणी एखाद्या आधुनिक अस्तित्ववादी कादंबरीच्या नायकाप्रमाणे आत्मशोध घेताना दिसते. तारुण्य आणि म्हातारपण, निराशा आणि यश, मानव आणि देवता, जीवन आणि मृत्यू या सर्व विषयावर मुलभूत चिंतन  करताना दिसते. ही कहाणी अपयश आणि वास्तव स्वीकारायला शिकवताना, व्यक्तीच्या अनुभवसमृद्ध होण्यामधून येणाऱ्या समंजसपणाची प्रक्रिया उलगडून  दाखवते. या महाकाव्यामधून तत्कालीन समाजाचे अस्सल प्रतिबिंब तर दिसतेच त्यासोबत नंतरच्या कालखंडामध्ये रुजलेल्या कितीतरी साहित्यिक व  सांस्कृतिक आदी बंधांचा उगमसुद्धा याच महाकाव्यातून झालेला दिसतो. नंतर आलेल्या ग्रीक संस्कृतीने व बायबनलने सगळे जग प्रभावित केले. परंतु या दोघांचीही मुळं, सुमेरीयन संस्कृतीत पक्की रुजलेली दिसतात.

  
-प्रा. डॉ. गजानन मालोकार, 
gajananmalokar62@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...