Home | Divya Marathi Special | Reminder 2017; Key events in the year round

स्‍मरण 2017: वाचा, समाजमन ढवळून काढणा-या महाराष्‍ट्रातील महत्‍त्‍वाच्‍या घटना

दिव्‍य मराठी | Update - Dec 30, 2017, 08:34 AM IST

तसा तर प्रत्येक क्षण मोलाचा असतो. पण व्यक्ती आणि समष्टीच्या जगण्याला अर्थ पुरवणारे क्षण थोडेथोडकेच असतात. कधी कळत-कधी नक

 • Reminder 2017; Key events in the year round

  तसा तर प्रत्येक क्षण मोलाचा असतो. पण व्यक्ती आणि समष्टीच्या जगण्याला अर्थ पुरवणारे क्षण थोडेथोडकेच असतात. कधी कळत-कधी नकळत घटना घडतात आणि समाजसमूहांच्या, प्रस्थापित व्यवस्थांच्या क्रिया-प्रतिक्रिया घटनांच्या दिशा निश्चित करत जातात. प्रगतीचे-अधोगतीचे, समाधानाचे-असमाधानाचे, सृजनाचे-श्रमाचे असे विकास-विरोधात्मक किती तरी क्षण समाजमन ढवळून काढतात. अशाच राज्याच्या परिघात घडलेल्या, पण देशव्यापी प्रभाव राखलेल्या, मुख्य म्हणजे प्रगतीचे नवे आणि निर्णायक वळण अधोरेखित करणाऱ्या विविध क्षेत्रांतील घटनांचा हा मागोवा. वर्तमानाची जाण आणि भविष्याचे भान देणारा...


  ‘पूल गिर गया...पूल गिर गया’चा आक्रोशध्वनी उमटला आणि स्वत:चा जीव वाचवण्यातून झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवासी मरण पावले.


  बाहेर मुंबईची कोंडी करत पाऊस कोसळत होता आणि एल्फिन्स्टन रेल्वे पुलावर एकच दाटी झाली होती. तेवढ्यात ‘पूल गिर गया...पूल गिर गया’चा आक्रोशध्वनी उमटला आणि स्वत:चा जीव वाचवण्यातून झालेल्या चेंगराचेंगरीत २३ प्रवासी मरण पावले. या घटनेमुळे शासन-प्रशासनावरच्या राग-संतापाचा स्फोट झाला. अनेक संसार उद्ध्वस्त करणाऱ्या त्या घटनेला कालावधी लोटलाय. आता लष्कराचे अभियंते-जवान पुलाची तातडीने उभारणी करण्यासाठी खपताहेत आणि त्या वेळी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणाऱ्या मुंबईकर प्रवाशांच्या तोंडी आता एअरकंडिशन्ड लोकलचे कौतुक ऐकू येऊ लागलंय...


  > २३ मृतांत १५ पुरुष, ८ महिलांचा समावेश
  > ३९; ३० पुरुष आिण ९ महिला जखमी
  > ३० मि. स. १०.१५ ते १०.४५ पर्यंत चेंगराचेंगरी

  पुढील स्‍लाइडवर पाहा, आणखी महत्‍त्‍वरच्‍या घडामोडी...

 • Reminder 2017; Key events in the year round

  एल्फिन्स्टन रेल्वे

  पुलावरील प्रचंड गर्दीत भारा वाहणाऱ्या व्यक्तीकडील फुलं पडली आणि फुलं पडली म्हणता म्हणता उच्चारसाधर्म्याने पूल पडला असा अनेक प्रवाशांचा गैरसमज झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. 

 • Reminder 2017; Key events in the year round

  २९ नोव्हेंबर २०१७ - कोपर्डी 

  मुलीच्या अन्यायग्रस्त कुटुंबासाठी अख्खा समाज रस्त्यावर आला. सरकार मदतीला आले. मुलाच्या उद्ध्वस्त कुटुंबासाठी पुढे आलेल्यांचा आवाज व्यवस्थेपर्यंत पोहोचलाच नाही. त्याचेच प्रतिबिंब न्यायदानातही पडले. 

 • Reminder 2017; Key events in the year round

  खर्डा; नितीन आगे खुन प्रकरणातील आरोपी निर्दोष

  खर्डा घटनेत सामील आरोपींना निर्दोष जाहीर करण्यात आले. एका बाजूला टोकाचा आनंद आणि दुसऱ्या बाजूला टोकाचे नैराश्य या घटनांतून पुढे आले...

 • Reminder 2017; Key events in the year round

   शिस्तीचा महामूक मोर्चा 

  मराठा समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक संस्थांत आरक्षण मिळावे, यासाठी महाराष्ट्रात गावोगावी मूक मोर्चे निघाले. कोपर्डी प्रकरणाने या मोर्चाला आणखी एक उद्दिष्ट दिले. लाखांच्या वर उपस्थिती, तरीही स्वयंशिस्त आणि संघटनकौशल्याचे प्रतीक ठरलेल्या निषेध मोहिमेतला ५८ वा मोर्चा मुबईत काढण्यात आला. कुणासाठी क्षणभरही न थांबणाऱ्या मुंबईला शब्दश: रोखून धरले, सत्ताधाऱ्यांना रस्त्यावर येऊन दखल घेण्यास भाग पाडले...

 • Reminder 2017; Key events in the year round

  शेतकऱ्यांचा भडका उडाला... 

  आत्महत्याग्रस्त महाराष्ट्रातल्या शेतकयांना संपूर्ण कर्जमाफी मिळालीच पाहिजे, या आग्रही नि आक्रमक मागणीसाठी सरत्या वर्षात राज्यात शेतकयांचा भडका उडाला...

   

  शेतकऱ्यांचा संपाच्या रूपाने भडका उडाला. भाजीपाला, दूधदुभते रस्त्यांवर ओतले गेले. सत्ताधाऱ्यांनी महत्प्रयासाने हा भडका रोखला. ३० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची कर्जमाफी जाहीर झाली. पुढे शेतकऱ्यांच्या याद्यांवरून घोळ झाले. ते अजूनही संपलेले नाहीत. शेतकरी नेत्यांचेही समाधान झालेले नाहीत. नव्या वर्षात आंदोलन तीव्र करण्याचा त्यांना दिलेला इशारा त्याचेच द्योतक आहे.

   

 • Reminder 2017; Key events in the year round

   कुंभमेळा : एक जागतिक वारसा

  धर्म, श्रद्धा आणि सत्त्वभाव जागवणाऱ्या कुंभमेळ्याला संयुक्त राष्ट्र संघाने
  जागतिक वारसा म्हणून सरत्या वर्षात मान्यता दिली.  हिंदू धर्म परंपरेनुसार किती तरी आखाडे - पंथ या निमित्ताने एकत्र येतात. उन्नत होत गेलेल्या परंपरांचे दर्शन घडवतात. ते दर्शन घ्यायला देशोदेशीचे जाणकार, अभ्यासक मुक्काम ठोकून असतात.  यंदा नाशिकने हा वारसा जपला. नियोजन आणि व्यवस्थापनाचा आणखी एक धडा घालून दिला...

   

 • Reminder 2017; Key events in the year round

  मराठीची राष्ट्रीय मोहोर ‘कासव’ चित्रपटाला सुवर्णकमळ, ‘दशक्रिया’, ‘व्हेंटिलेटर’चाही सन्मान

  गेली काही वर्षे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांवर मोहोर उमटवणाऱ्या मराठी चित्रपटांनी यंदाही आपले स्थान कायम राखले. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या दिग्दर्शक जोडीच्या ‘कासव’  चित्रपटाने ‘सुवर्णकमळ’ पटकावत पुरस्कारांची शर्यत जिंकली, तर ‘दशक्रिया’ सिनेमाने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, सर्वोत्तम सहायक अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट पटकथा असे तीन-तीन पुरस्कार पटकावले. राजेश मापुस्कर यांच्या ‘व्हेंटिलेटर’ या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा व उत्कृष्ट संकलन आणि ध्वनी संकलनासाठीचे पुरस्कार मिळाले.

 • Reminder 2017; Key events in the year round

  माटुंग्याचे स्त्रीकेंद्री स्थानक 

  रेल्वेस्टेशनचा ताबा महिलांकडे दिला तर? हा केवळ निबंधाचा विषय नव्हे, तर जगण्यातले सुखद वास्तव आहे, याची जाणीव करून देणारा क्षण आला. भारतात पहिल्यांदाच मुंबईतले माटुंगा उपनगरी रेल्वेस्थानक महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. बाई घर-संसार आणि देशही सांभाळू शकते, तर एक स्थानक का नाही? आता या महिलांनी स्थानकावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय आणि प्रवाशांची वाहवासुद्धा...

 • Reminder 2017; Key events in the year round

  ए लाइफ इन मेट्रो

  एका बाजूला जमिनीच्या वर मुंबई तिच्या वेगाने सुसाट धावतेय आणि त्याच वेळी जमिनीच्या खाली समांतर असं वेगवान जग आकारास येतंय. मुंबईत जमिनीखालून ३३.५ किमी धावणाऱ्या मेट्रो ट्रेनच्या कामाला सरत्या वर्षाने वेग दिलाय. अवाढव्य टनेल बोरिंग मशीन तंत्राचा वापर करून भुयारं तयार केली जाताहेत. शेकडो कामगार मुंबईचाच नव्हे, देशाचा चेहरा-मोहरा बदलून टाकण्यासाठी जिवाचे रान करताहेत, अहोरात्र...

 • Reminder 2017; Key events in the year round

  पाण्याचे पीक तरारले...

  समाजाला वास्तवातल्यापेक्षा पडद्यावरचा नायक भावतो तसा मिळाला, आमिर खानच्या रूपाने. आमिरने पानी फाउंडेशनतर्फे शासनाच्या सहकार्याने दुष्काळावर मात करण्याच्या उद्देशाने वॉटर कप स्पर्धा जाहीर केली. दुसऱ्या पर्वात महाराष्ट्रातल्या ३० तालुक्यांतल्या १३०० गावांनी या प्रयत्नांत सहभाग नोंदवला. यात कुणी किती लाखांचं पारितोषिक मिळवलं, यापेक्षा श्रमदानाचा नवा आदर्श निर्माण केल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं...

 • Reminder 2017; Key events in the year round

   पुणे मनपाचे रोख धाडस

  खासगी वा सार्वजनिक कंपन्यांचे रोखे शेअर बाजारात विक्रीला येणे यात नवल काहीच नाही.  पण सरत्या वर्षात पुणे महानगरपालिकेने हे धाडस केले. या रोख्यांची बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये रीतसर नोंद झाली. या पोटी पालिकेने २०० कोटी उभारले आहेत आणि रोखेविक्रीतून २२६४ कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. हे पाऊल पुण्याची पत-प्रतिष्ठा वाढवणारे आहे, तसेच ते जबाबदारी अधिक अधोरेखित करणारे आहे.

Trending