आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैसर्गिक शेतीतच शेतकऱ्यांच्या अात्महत्या राेखण्याची क्षमता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यावरण व्यवस्थेचा आदिवासी जीवन पध्दतीवर काय परिणाम होतो, याविषयी बेलाेरा (जि. अमरावती) येथील सुभाष पाळेकर प्रकल्प अभ्यास करीत हाेते. जंगलातील झाडे, वेलींना कोणतेही खतपाणी, औषधफवारणी नसते तरी आंबा, काजू, बोर, जांभूळ, चिंच अगणित फळे कसे देतात? अगदी दुष्काळात देखील फळे येतात. याचे इंगित सुभाष पाळेकरांना या अभ्यासात अाढळले. कृषिपदवीनंतर घरची शेती रासायनिक पध्दतीने करू लागले. पहिली १३ वर्षे चांगले उत्पादन मिळाले. मात्र नंतर शेतीत उत्पादन मिळेना. त्यांनी पुन्हा अभ्यास सुरू केला अाणि निसर्गाची स्वत:ची व्यवस्था असल्याचे जाणले त्यातूनच झिराे बजेट शेती संकल्पनेचा उदय झाला. १९८८ ते २००० पर्यंत १२ वर्षे स्वत:च्या शेतीत अध्यात्मिक-नैसर्गिक शेतीचे प्रयोग केले. आज देशभरातील अनेक राज्यांनी त्यांच्या झिरो बजेट शेतीची कास धरली.

 

कर्जबाजारीपणामुळे शेतीव्यवसाय प्रचंड अडचणीतून जात असतानाना शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला रास्त बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. सरकारने किती ही पॅकेज अथवा कर्जमाफी दिली, तरी आत्महत्या थांबत नाहीत. कारण संकरित बियाणे व रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे जमीनीतील पुरक जीवाणु नष्ट होत आहेत. कृषितज्ञांकडूनही  रासायनिक खते व फवारणीला पर्याय नाही असे सांगितले जाते. त्यामुळे रासायनिक पध्दतीने शेती करण्यासाठी प्रचंड मोठा खर्च तुलनेने कमी उत्पादन व कमी बाजारभाव मिळतो. तर सेंद्रीय शेती वापरण्यासाठी निविष्टा या रासायनिक निविष्टापेक्षा महाग आहेत.  सेंद्रीय शेतीमधील उत्पादन खर्च तुलनेत कमी उत्पादनामुळे मोठ्या प्रमाणात तोटा आहे. मग रासायनिक असो अथवा सेंद्रीय पध्दतीने शेती केली. तरी उत्पादन खर्च व उत्पन्नाचे प्रमाण विसंगत असल्याने शेतकऱ्यांसमाेर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहत नाही. 


झिरो बजेट नैसर्गिक शेतीमध्ये उत्पादन खर्च शून्य असूनही उत्पादन वाढ मिळते. देशी गाईचे शेण, गोमुत्र आदी सहज मिळणाऱ्या घटकांपासून घरच्या घरी शेतकरी निविष्टा तयार करून शकतो. त्यासाठी विशेष खर्च करण्याची गरज नाही. एक देशी गाय ३० एकर शेतीसाठी पुरेशी आहे. तर भाकड गाईंच्या गोमुत्र शेण वापरातून अधिक चांगली नैसर्गिक शेती करता येते. यातून मिळणारे उत्पादन  शरीर व आरोग्याला हानीकारक अशा विषाचे अंश नसल्यामुळे दुप्पट भाव मिळतो. अगदी परदेशातून ही खूप मागणी आहे. विषमुक्त, पोषणमुल्यांनी समृध्द असल्याने ग्राहक दुप्पट किमत देण्यास मागेपुढे पाहत नाहीत. उत्पादन खर्च शुन्य, दुप्पट उत्पादन, दुप्पट किंमत या त्रिसुत्रीमुळे नैसर्गिक शेती करणारा शेतकरी आत्महत्या करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. देशात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यापैकी एकही शेतकरी नैसर्गिक शेती करणारा नाही.


दक्षिण भारतात नैसर्गिक शेतीवर प्रचंड प्रमाणात काम सुरू आहे. आपल्या देशात प्राचीन काळापासूनच झिरो बजेट शेतीचे मॉडेल प्रत्येक गावात आहेत. आजमितीला देशातील पन्नास लाख शेतकरी झिरो बजेट शेती करत आहेत. त्यापैकी सुमारे ४० लाख शेतकरी केवळ दक्षिण भारतातील आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाकडे अधिक लक्ष देऊनही शेती व्यवस्थेकडे गंभीर दुर्लक्ष झाल्याने निवडणुकीत पराभव झाला; हे चंद्राबाबू नायडू यांच्या लक्षात आल्यावर राज्यातील शेतीला सावरण्यासाठी नैसर्गिक शेती पध्दतीला ते प्रोत्साहन देत आहेत. त्यासाठी तेलंगणात नैसर्गिक शेतीच्या प्रचार प्रसार शिबीरांच्या आयोजनात तेलंगणा सरकारने पुढाकार घेतला. नैसर्गिक शेतीच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात शेतीक्षेत्रात क्रांतीकारी बदल करण्याचा सरकारने निश्चय केला आहे. उत्तरप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश, गुजरात, पंजाब, केरळला देखील नैसर्गिक शेतीचे महत्व पटल्याने ही राज्ये नैसर्गिक शेतीकडे वळली आहेत.  


रासायनिक शेती अथवा सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून सध्याचे केंद्रसरकार २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू शकत नाही. नैसर्गिक शेतीच फक्त शाश्वत उत्पन्न देते. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेती तसेच इतर पध्दती समजून घेण्यासाठी १९-२० फेब्रुवारीला परिषदेचे आयोजन केले आहे. केंद्रसरकारने नैसर्गिक शेतीचा पुरस्कार केल्यास देशभरातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जबाजारीपणा व अन्य समस्या दूर होतील.


अन्नधान्याच्या स्वावलंबनासाठी हरितक्रांती भारताने स्वीकारली. मात्र भारताला अन्नधान्याच्या दृष्टीने स्वावलंबी बनवणे हा नव्हे, तर नैसर्गिक संसाधनाचे शोषण हाच हरित क्रांतीचा प्रमुख उद्देश राहिला. रासायनिक पध्दतीने एक एकर जिरायती शेती केल्यास ३० हजार रूपये तर बागायती शेतीव्दारे दीड लाख रूपये परदेशात जातात. देश पातळीवर विचार केल्यास हजारो करोड रूपये परदेशात जातात. कारण शेतीसाठी लागणाऱ्या सर्व निविष्टा या परदेशातून येतात. रासायनिक निविष्टाचे उत्पादन करण्यास परदेशी कंपन्या गुंतल्या आहेत. नैसर्गिक शेतीमध्ये उत्तम रोग प्रतिकार शक्ती असते, देशी बियाणे वापरली जातात, ट्रॅक्टर, अवजारे, फवारणी यापैकी एकाची सुध्दा गरज नसल्याने उत्पादन खर्च अत्यल्प राहताे. त्यामुळे गावातल्या गावातच पैसा खेळता राहताे. शिवाय उत्पादित शेतमालावर घरी प्रक्रिया करून दुप्पट किमतीला विकता येताे. रासायनिक शेतीमध्ये एक एकराला  लागणाऱ्या पाण्यावर नैसर्गिक पध्दतीने दहा एकरावर शेती करता येते. अर्थात नैसर्गिक शेतीच्या मॉडेलमध्ये नव्वद टक्के पाण्याची बचत करून फक्त पाण्यावर १० एकर शेती पिकवू शकतो. त्यामुळे दुष्काळातही नैसर्गिक पध्दतीने चांगली शेती करता येते. पिक लागवडीनंतर तीन वर्षानंतर प्रति वर्षी किमान एकरी सहा लाख रूपयाचे उत्पन्न मिळू लागल्यावर शेतकरी आत्महत्या का बरे करेल?
- प्रदीप गुरव, बारामती

बातम्या आणखी आहेत...