आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीकरांना लाभलेल्या मधुसान्निध्याचा अमृत महाेत्सव!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

“ माझा मराठीचा बोलु कौतुके ।
परि अमृतातेही पैजा जिंके ।
ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन ।।”


संत  ज्ञानेश्वरांच्या ओवीशी एकनिष्ठ असणारे प्राध्यापक मधू जामकर यांच्याच सक्रियतेमुळे परळीत  ७१  वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी ठरले. सरांचे त्यांच्या जीवनाच्या अमृतमहोत्सवी वर्षात अभिष्टचिंतन करणे हे परळीकरांचे कर्तव्य ठरते, म्हणूनच येथील सर्वपक्षीय, सर्वस्तरीय समाजधुरीणांकडून त्यांचा गौरव सोहळा साजरा  करण्यात अाला. 
आमच्या युवक गणेश मंडळाच्या वतीने ‘डॉ. जीवनराव देशपांडे स्मृती व्याख्यानमाला’ दरवर्षी आयोजित केली जात असे, सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ ‘वाद्योत्सव’ न होता ‘विचारोत्सव’ असावा, अशी सरांची अपेक्षा होती. त्यात वैचारिक मंथन-सामाजिक प्रबोधनाचे कार्य महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते, कवी, सांगीतिक, अाध्यात्मिक  क्षेत्रातील विभूती करीत असत. त्यातून अनेक महनीय व्यक्तींची जीवनमूल्य अवगत झाली.


इंग्रजीमध्ये म्हण आहे.  ‘Men of few words are the best men’ जामकर सर आधुनिक, भौतिक नव्हे, तर प्रगल्भ, मनमौजी व्यासंगी जीवन जगले, सुप्रसिध्द साहित्यिक असून देखील त्यांनी सातत्याने संयोजकांना पाठबळ दिले. परळी हे त्यांच्या प्रतिभेमुळे विचारांचे शक्तिपीठ बनले.  त्यांनी समीक्षापर ग्रंथ, ललित व काव्यसंग्रह हे साहित्यप्रकार सक्षमतेने हाताळले. ‘महाराष्ट्रात अनेक गावांमध्ये माझ्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळे झाले, पण परळीमध्ये माझे एकही पुस्तक प्रकाशित झाले नाही’, अशी खंत ते सातत्याने व्यक्त करत.   ती दूर करण्याचा प्रयत्न मी नगराध्यक्ष असतांना काही प्रमाणात केला आणि त्यांचे २४ वे पुस्तक ‘मावळतीचे रंग’ या ललित संग्रहाचा प्रकाशन सोहळा परळीमध्ये नगरपरिषदेमार्फत अायाेजित  केला. याच कार्यक्रमात श्रोत्यांमधून जामकर सरांचा अमृतमहोत्सव आयोजित करावा, अशी भावना व्यक्त झाली होती, ती मूर्त स्वरूपात अाली. 


‘मावळतीचे रंग’ या ललित संग्रहात संत रामदासांच्या ‘उदासीन काळ हा कोठे न कंठी’ या पालुपदाबाबत सर पुस्तकाच्या समारोपाप्रसंगी लिहितात की, ‘मला सतत चालायचे आहे, त्यात माझ्या वळणाचा मलाच शोध घ्यायचा आहे, हे वळण समोर दिसताच त्यावर थांबून मागे पुढे पहावयाचे आहे. मागच्या चुका या वाटचालीत पुढे होता कामा नयेत, याची काळजी घ्यायची आहे. या मार्गक्रमणात कारूण्य आत्मचिंतनाने, नव्या हुरूपाने अजमावून चालायचे आहे. जगण्यात प्रश्न पुन्हा पुन्हा निर्माण होतात हे जिवंत माणसाचेच लक्षण आहे.’ हे सुंदर निरूपण वाचण्यात आले, आणि त्यांची जीवनाबाबतची उमेद उमजली. अगदी सरांचा उत्तरार्ध पार पडावा. या सिद्धहस्त लेखक, कवी व्यक्तिमत्वास अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा!

 

> प्रा. मधू जामकर यांचे विद्यार्थ्यांच्या जडण- घडणीतील याेगदान, सांस्कृतिक चळवळीला मिळालेल्या पाठबळामुळे परळीचे नाव देशभरात पाेहाचले. त्यांच्याच सक्रियतेमुळे परळीत ७१ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी ठरले. म्हणूनच येथील सर्वपक्षीय, सर्वस्तरीय समाजधुरीणांकडून त्यांचा अमृत महोत्सवी गौरव सोहळा नुकताच साजरा करण्यात अाला. त्यानिमित्त..

 

- बाजीराव धर्माधिकारी

बातम्या आणखी आहेत...