आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासनावरील अवलंबन म्हणजे अात्मविश्वास गमावणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संस्थांची उभारणी केली जाते पण शासकीय अनुदानावर अवलंबून असतात. त्यातूनच पुढे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत असते . मराठीच्या अभिजाततेचा प्रश्न आता मानबिंदूचा प्रश्न झाल्याचं प्रतिपादन माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांनी केले. ९१व्या साहित्य संमेलनात सुधीर रसाळ आणि ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांनी घेतलेल्या मुलाखतीचा सारांश...


दीक्षित : स्वातंत्र्याची जी पहाट अनुभवली ते वातावरण आजच्या पिढीला जाणून घ्यायला आवडेल?
चपळगावकर : मला वाङमयाची जी आवड निर्माण झाली त्याचं खरं श्रेय मी निजामाला देताे. निजामाने मला पाचवीच्या वर्गातही मराठी शिकू दिलं नाही. हे जे घुसमटलेलं वातावरण होतं त्यामुळे मराठी वाङमयाचं विशेष प्रेम उफाळून आलं. एक आपली भाषा, वाङमय हे वाचलं पाहिजे आणि दुसरा जो संस्कार झाला की, वाङमयाने लेखकानं आपलं स्वातंत्र्य जपलं पाहिजे.
रसाळ : तुमच्यासमोर कोणते लेखक मॉडेल होते. 
चपळगावकर : मराठवाड्यातील दुहेरी पारतंत्र्याची, सांस्कृतिक पारतंत्र्याची दखल कितीशी घेतली गेली? संयुक्त महाराष्ट्र निर्माण होण्यासाठी नेहरूंची नाराजी पत्करून ज्यानं आपल्या राजकीय भविष्याचा बळी दिला ते स्वामी रामानंदतीर्थ हे संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत. हे सांगितलं पाहिजे नाहीतर हे  कळणार कसं?
रसाळ :  मूळ प्रश्न असा अाहे की, तुम्ही सुरुवातीला जे ललितलेखन केलं, त्यावेळी कोणते लेखक मॉडेल हाेते.  
चपळगावकर : त्याकाळी गंगाधर गाडगीळ हे घटनांच्या पलिकडं जाऊन माणसांच्या मनाचा वेध घेणारे लेखक होते. तसं मला व्यंकटेश माडगूळकर यांचं ‘माणदेशी माणसं’ आणि ‘गावाकडच्या गोष्टी’ हे भावलं. 
दीक्षित : आता आपल्या प्रादेशिक नेत्याच्याही विरोधात बोलणारी माणसं मिळत नाहीत? ती का कमी झाली?
चपळगावकर : समाजात नैतिकता आणि स्वार्थत्याग हे वातावरण असलं तर ते सगळ्याच क्षेत्रांमध्ये जातं. म्हणून त्या काळात वाङमयातही नवं वातावरण निर्माण झालेलं होतं. १९४५ ते १९६० पर्यंत किती लोक लिहू लागले, किती प्रकारचे लेखन आले. या नवचैतन्याला अनेक गोष्टी कारणीभूत होत्या. आत्मविश्वास आजूबाजूचा समाज निर्माण करतो. पण, याच्यामागे चळवळ आणि चैतन्याची शक्ती होती. ही लेखकाला स्वतंत्र ठेवायला मदत करणारी गोष्ट होती.
दीक्षित :  त्याकाळात जेव्हा प्रस्थापितांना आव्हान दिलं जायचं. तेव्हा ट्राेलिंग व्हायचं की, नाही?
चपळगावकर : तेव्हा आव्हानाची मर्यादाही सभ्यतेच्या चौकटीत होती. पुढे समाजाची मूल्यव्यवस्थाच बदलली. तेव्हा लोकही उदार होते. पुष्कळांना अनेकांनी मदत केली. अशी माणसं आहेत म्हणून हे सगळं टिकलेलं आहे. अशी उदारता समाजात पाहिजे.
रसाळ : एकाचवेळी जहाल आणि नेमस्त या दोन्ही गोष्टी तुम्ही एकत्र कशा केल्या.
चपळगावकर : समाजात छोट्या-छोट्या गोष्टींनी उदारतेनं शिक्षणाला प्रारंभ होताे. समाजाचा आत्मविश्वास जागृत करण्याला प्रारंभ होतो. म्हणून ज्यांनी शाळा काढल्या, संस्था उभारल्या तेही तितक्याच महत्त्वाच्या. प्रथम रानडेंनी हे ओळखलं. वरवरचा इतिहास आपण वाचतो आणि आपल्याला वाटतं की, टिळक आणि रानडे यांचं शत्रुत्व होतं. पण असं काही नाही. 
दीक्षित :  ही मूल्य मध्यमवर्गात  का पाझरली नाहीत?
चपळगावकर : आमच्या इतिहासात आम्ही लिबरल तत्त्वांना फारसं प्राधान्य दिलंच नाही. ही प्रवृत्ती आपल्या इतिहासातून आली आहे. स्वातंत्र्याचीही किंमत आहे ती अशी कुठेही खिशात मिळत नाही. अशा बाबी विचारातच घेतल्या जात नाहीत. 
रसाळ :  उदारमतवादी विचारधारेकडे का वळलात?
चपळगावकर : उदारमतवादी प्रवृत्तीच व्यवस्थित निर्माण करायला हवी, त्याशिवाय राज्यघटना पूर्णत: अमलात येऊच शकत नाही. यासाठी उदारमतवाद काय आहे हे लोकांना समजून सांगायला हवा. हे माझ्या मनात कुठेतरी आलं आणि पुढचं लेखन त्यानुसार आलं. आता उदारमतवाद सांगून संपादित करण्याची गरज आहे. आपल्याला नवा इतिहास घडवायचा असेल तर उदारमतवाद स्वीकारला पाहिजे. माझं मत, तुझं मत आपल्या सगळ्यांचं मत एकत्र करून निर्णय घेणं म्हणजे उदारमतवाद आहे. हा उदारमतवाद लेखनातून दिसला पाहिजे. 
रसाळ : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकोच होत आहे, तशी माणसं दिसतात का?
चपळगावकर :  एकतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी आपल्याला काही किंमत मोजावी लागते ही मूलभूत गोष्टच सामान्य लोकांना मान्य नाही. आगरकरांनी सांगितलेल्या गोष्टी आपल्याला पटल्या नाहीत, कर्व्यांनी जे काम केलं त्यालाही लोकांनी नाकारलं. त्याच्यानंतरही आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी केलेली आहे. झुंडशाही जेव्हा स्वातंत्र्याचा संकोच करते तेव्हा न्यायालयही निष्प्रभ होतं. 
रसाळ :  सरकारला दोन शब्द ऐकविणारे दिसतात का? 
चपळगावकर : विनोबांनी आणीबाणीच्या काळात एक आचार्य  स्कूल स्थापन केलं होतं. आता आपण कोणालाही आचार्य पदवी देतो.  आता सरकारला दोन शब्द एेकविणारे विचारवंत अत्यंत दुर्मिळ झाले आहेत. पण, लोक काही चुका करतात म्हणून आपणही तेच करायचं का? म्हणून मला समाजात सरकारच्या चुका दाखविणारे मग ते सामाजिक असो, राजकीय असो निर्भिड मत सांगणारे विचारवंत हवे आहेत, हे विचारवंत अनुदानाच्या माध्यमातून निर्माण होणार नाहीत.
रसाळ : ते का निर्माण होत नाही. त्यासाठी काही राजकीय, सामाजिक परिस्थिती जबाबदार आहे का?
चपळगावकर : स्वातंत्र्य चळवळीत त्यागाची प्रेरणा होती. त्यानंतरच्या काळात पुनर्रचनेची प्रेरणा आपल्याकडे आली. हिंदू-मुस्लिम ऐक्याची असेल किंवा राष्ट्रउभारणीची प्रेरणा असेल. हे जेव्हा वातावरण भारलेलं असतं तेव्हा विचारवंतांनाही वाटतं की, आपण विचार द्यावेत. आता विचारच ऐकायला कोणी तयार नाही. विचारवंतांचं तेज असलं पाहिजे, सत्ताधाऱ्यांना ते कळलं पाहिजे. आता पैसा, समृद्धी आणि स्वार्थ पाहणे हीच मुळी मध्यमवर्गाची प्रवृत्ती झाली आहे. (मध्यमवर्ग म्हणजे फक्त ब्राह्मण नव्हे.)
रसाळ :  भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदाचा तुम्ही राजीनामा दिला, तो का दिला?
चपळगावकर : सरकार जेव्हा समित्या नेमतं तेव्हा त्या समित्यांनी काही काम करावं आणि ताबडतोब आपण त्या अमलात आणाव्यात अशी मुळीच सरकारची इच्छाच नसते. मराठी शाळा बंद होतात. आपण काय करतो. पालक आणि मुलांनाही वाटतं की, इंग्रजी शाळेत जाणं हे प्रतिष्ठेचं लक्षण आहे. इंग्रजी शिकणं वा शिकवणं ही एक चुकीची आणि प्रतिष्ठेची संकल्पना आता रुजली आहे. इंग्रजी बोललं की, प्रतिष्ठित असा समज आपणच आपला करून घेतला आहे आणि यामुळेच भाषेचा धोका वाढत आहे.
दीक्षित :  मराठी का शिकावं आणि तिला जर अिभजात करून काही फरक पडणार आहे का?
चपळगावकर : काही मूल्य आपणच ठरवून घेतली आहेत. मराठी बोलताना कितीवेळा 
आपण अनावश्यक इंग्रजी वापरतो. गुगलवर माहिती उपलब्ध आहे, ज्ञान उपलब्ध नाही. ही ज्ञान मिळविण्याची प्रक्रिया आपल्या मातृभाषेत 
झाली पाहिजे. आमच्या पालकांना विचार करणारी मुलं नको आहेत. पालकांना पैसे  आणणारी मुलं हवी आहेत. मराठी ज्ञानभाषा व्हावी याचा नुसता ठराव केला जातो. पुढे काहीच होत नाही. एका 
भाषेने दुसऱ्या भाषेशी नातं जोडलं तर मराठी आपोआपच जागतिक होईल. अभिजात मराठी हा मानबिंदूचा प्रश्न आहे. पण बोलीभाषा कुठे आहेत हे बघितले पाहिजे. मराठी समृद्धतेसाठी प्रयत्न केला पाहिजे.


- शब्दांकन : पीयूष नाशिककर, नाशिक

बातम्या आणखी आहेत...