Home | Divya Marathi Special | Jayashri desai write about bhayyuji maharaj

अवघडसा वसा घेत, एक योगी नांदतो। वेदनांच्या कळांतुनी, सेवागंध दरवळतो।।

जयश्री देसाई | Update - Jun 17, 2018, 05:35 AM IST

आपण प्रत्येकाला देव्हाऱ्यात बसवण्याची घाई करतो आणि मग एखाद्याला देव्हाऱ्यात बसवलं की, त्याच्याशी मानवी भावभावनांचा काही

 • Jayashri desai write about bhayyuji maharaj

  आपण प्रत्येकाला देव्हाऱ्यात बसवण्याची घाई करतो आणि मग एखाद्याला देव्हाऱ्यात बसवलं की, त्याच्याशी मानवी भावभावनांचा काही संबंध असतो हेच आपण सोयीस्करपणे विसरून जातो. पण असे हळवे, मोडून टाकणारे क्षण त्यांच्याही आयुष्यात येऊ शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्याला अशा उंचीवर नेऊन ठेवलं की मन मोकळं करून त्या भावनांचा निचरा करायचा त्याचा मार्गच आपण बंद केलेला असतो हेही भान ठेवलं पाहिजे. भय्यू महाराज यांनी आत्महत्या केली आणि वादाचं मोहोळ उठलं. अनेकांना स्वाभाविकच धक्का बसला. या पार्श्वभूमीवर त्यांच्यासमवेत काम करताना आलेल्या अनुभवांच्या आधारे केलेलं हे एक विश्लेषण...

  प्रख्यात शायर जावेद अख्तर यांचा एक शेर आहे...
  अपनी वजह-ए-बरबादी तो सुनिये मजे की है,
  अपनी जिंदगी से यूं खेले, जैसे किसी दुसरे की है।

  या ओळी भय्यू महाराजांना चपखल बसतात, असं कामाच्या निमित्ताने त्यांचा जो ५-६ वर्षांचा सहवास लाभला त्या काळात मला सतत जाणवत राहिलं. हे त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याला जसं लागू होतं तसंच ते ज्या झपाटलेपणाने दिवसाला हजारो मैल रस्तामार्गे प्रवास करून सामाजिक काम करत होते, जवळपास २०० सामाजिक प्रकल्प राबवत होते, त्याचे जे विपरीत परिणाम त्यांच्या तब्येतीवर व कुटुंबावर होत होते त्यालाही लागू आहे.


  मी त्यांच्या सहवासात आले ते कामाच्या संदर्भात. मी एका कंपनीचा प्रकाशन विभाग सांभाळत होते, त्याच बरोबर त्या उद्योग समूहाचा सीएसआर सांभाळणाऱ्या फाउंडेशनचीही जबाबदारी माझ्याकडे होती. सामाजिक कामाची मला खूप आवड. त्याला दिशा मिळाली ती भय्यू महाराजांच्या सहवासात आल्यावर. त्यांच्यासह आम्ही वाशिम, दर्यापूर व सांगोला येथे शेकड्यांनी सामूहिक विवाह घडवून आणले. काही वर्षांपूर्वी महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात तुळजापूरजवळ अपसिंगा आणि औरंगाबादजवळ टेंभापुरी या शिवकालीन तलावांचं पुनरुज्जीवन आणि टाक्या वाटप आम्ही केलं. थंडीच्या काळात गरिबांना ब्लँकेट वाटप, विविध कारागृहांमध्ये कैद्यांसाठी ते जी वाचनालयं चालवत होते त्यासाठी पुस्तकं जमवून देणं, बियाणे वाटप असे विविध उपक्रम केले. यामागची प्रेरणा जी होती ती त्यांनीच प्रतिपादिलेल्या अध्यात्मातून मानवतेची! धर्म कधीही त्यांनी मठ – मंदिरात बंदिस्त केला नाही. माणसाच्या रूपात देव पाहण्याची व त्याची सेवा करण्याची प्रेरणाच कायम दिली.


  टेंभापुरी तलावाच्या लोकार्पणाच्या वेळी एका स्त्रीने त्यांना जाहीर मुलाखतीत विचारलं की माझे सासरे वयस्कर आहेत. त्यांना सकाळी लवकर भूक लागते. पण माझे कुलधर्म-कुलाचार झाल्याशिवाय मी नैवेद्य दाखवू शकत नाही व त्यांना जेवण देऊ शकत नाही, तर मी काय करावं? त्यांनी सांगितलं की नैवेद्याच्याही आधी त्यांना जेवायला द्यावं. देव त्यांच्यातच आहे. माणसाला उपाशी ठेवून कर्मकांड करू नका… हे त्यांच्या साऱ्याच सामाजिक कामाचं सूत्र राहिलं असं त्यांच्यासोबत काम करताना लक्षात आलं. त्यांनी अल्पावधीत उभं केलेलं, समाजातल्या विविध क्षेत्रांतील गरजवंतांसाठीचं सामाजिक काम हे त्याचंच प्रतीक होतं आणि ते फक्त हिंदू धर्मापुरतं मर्यादित नव्हतं. त्यामुळेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या ट्रस्टबरोबर आम्ही जे सामाजिक विवाह घडवून आणले तेही सर्वधर्मीय होते!


  ते इंदूरमध्ये राहत असले तरी महाराष्ट्र, विशेषतः मराठवाडा व विदर्भ ही त्यांची कर्मभूमी होती. त्यामुळे इथे राहत असलेल्या शेतकऱ्यांसाठी, फासेपारध्यांसाठी, एड्सग्रस्त मुलांसाठी सतत काही ना काही करत राहणे हा त्यांचा ध्यास होता. ते नाथपंथीय होत. त्यामुळेच त्यांच्या संपर्कात आल्यावर नवनाथांचा सेवेचा वारसा अनेक अंगांनी पुढे नेणं हे ओघानेच होत असे. नव्हे, ते गोड बोलून करवून घेत असत.


  मुलीच्या लग्नाचा बोजा उचलू न शकल्याने आत्महत्या करणारा वा पाणी किंवा बियाणेही घेण्याची ऐपत नसल्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचलणारा शेतकरी हे त्यांच्या नेहमीच्याच चिंतेचे विषय होते. आम्ही त्यांच्या सहवासात आलो तेव्हा ते सर्व धार्मिक स्थळांवर शेतकऱ्यांना अद्ययावत माहिती मिळण्याची सोय करण्यासाठी कृषितीर्थाची योजना आखण्यात गुंतले होते. त्यांचा झपाटा असा होता की त्यानंतर अवघ्या एका महिन्यात ती सुरूही झाली होती. ते पाहिल्यानंतर व त्यांच्या कामाचा आवाका लक्षात आल्यानंतर त्यांनी सांगायचे आणि आम्ही ते करायचे असाच प्रवास चालू राहिला. सामूहिक विवाह हा खरं तर आमच्या ध्येयधोरणात बसणारा विषय नव्हता. पण गुरुजींबरोबर घडवून आणलेले विवाह हे फक्त सामूहिक विवाह सोहळे नव्हतेच, तेच बियाणे वाटपाचेही कार्यक्रम होते.


  नवदांपत्याला अगदी कपडे, मंगळसूत्र व गृहोपयोगी सामान देण्यापासून ते शेतीसाठी बियाणे देण्यापर्यंत सगळंच त्यात होत होत. विशेष म्हणजे याला प्रतिसाद इतका उत्तम मिळत होता की या सर्वच ठिकाणी गुरुजींनी जेवढे लक्ष्य दिले होते त्यापेक्षा किती तरी अधिक विवाह त्यांच्या शिष्यांनी जुळवून आणले.


  तलावाचा जीर्णोद्धार ही कल्पनाही त्यांचीच. तेव्हा मराठवाड्यात भीषण दुष्काळ पडला होता. आम्ही सगळ्यांनी एक-एक दिवसाचा पगार देऊन पैसे जमवले. तेवढेच व्यवस्थापनाने घातले त्यातून या दोन्ही विशाल तलावांतला गाळ काढण्यात आला. तिथे टाक्या वाटप करण्यात आले. त्यांच्याच काही भक्तांनी फुकट जेसीबी दिले आणि एक अतिशय महाकाय काम लीलया पार पाडले. त्यांच्या नावाची जादूच अशी होती की त्यांना करायचेय म्हटल्यावर हजारो हात पुढे येतात असं आमच्या लक्षात आलं. यानंतर तो भाग टँकरमुक्त तर झालाच, पण तिथले सोयाबीनचे उत्पन्नही अनेक पटींनी वाढले.


  ५ वर्षांतल्या अशा किती कामांची यादी द्यावी? सारे साधू-संत धार्मिक कुंभमेळा साजरा करत असताना त्यांनी शेतकऱ्यांचा महाकुंभ साजरा केला. समाजात आदर्श प्रस्थापित करण्यासाठी तुळजापूरला संभाजी महाराजांच्या महाकाय पुतळ्याची प्रतिष्ठापना केली आणि जीवदया अभियान असो वा बेवारस मृतदेहांवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याची चळवळ असो; त्यांचं वेगळं व्हिजन सतत जाणवत राहिलं आणि त्यात या ना त्या प्रकारे माझा—आमच्या कंपनीचाही खारीचा वाटा राहिलाच! आताही त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये आदर्शवत संत नगरी उभी होते आहेच...


  त्यांनी उभे केलेले असे असंख्य प्रकल्प यापुढे कदाचित तडीला जातीलही.. .पण ते बघायला ते नसतील! ही उणीव कायमचीच!
  आज भय्यू महाराज अापणातून गेल्यानंतर खूप उलटसुलट चर्चा चालू आहेत. त्यांना इतका टोकाचा निर्णय घेण्याएवढा कसला आलाय तणाव अशीही चर्चा हाेत आहे. अर्थात त्यांनी स्वतःचा अंत करायचा जो मार्ग निवडला त्याचं समर्थनच होऊ शकत नाही. पण तरीही १५० हून अधिक सामाजिक प्रकल्प चालवणाऱ्या व त्याच बरोबर कौटुंबिक समस्यांशीही झुंजणाऱ्या माणसाला तणाव असू शकतात हे आपण लक्षात घेतले पाहिजे. मला ते संत कमी, समाजसेवक जास्त असेच कायम वाटत राहिले आणि एवढे सामाजिक प्रकल्प चालवणे हे साेपे काम नाही. साधे एड्सग्रस्त मुलांसाठी ते जी बालगृहं चालवत होते, तिथल्या मुलांना औषधे व त्यांचा राहण्या-जेवण्याचा खर्च एवढाच विचार केला तरी त्यांच्यापुढची ती चिंता किती जास्त असेल याचा अंदाज येतो. प्रकृती अस्वास्थ्य, पारिवारिक प्रश्न हे तर प्रत्येकाला अपरिहार्यच!


  त्यामुळे एकच लक्षात घेतलं पाहिजे की तेही एक माणूसच होते. त्यांनी स्वतःला कधीही देव म्हटलं नाही किंवा त्यांची जी पुस्तके आम्ही प्रकाशित केली त्यांच्या मुखपृष्ठावरही, त्यांच्या फोटोमागे, देवाच्या मूर्तीमागे असते तशी प्रभावळ दाखवू दिली नाही. त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या. ते त्यांचे वेगळेपण होते. त्याचा उपयोग त्यांनी समाजासाठी केला. पण आपण प्रत्येकाला देव्हाऱ्यात बसवण्याची घाई करतो आणि मग एखाद्याला देव्हाऱ्यात बसवलं की, त्याच्याशी मानवी भावभावनांचा काही संबंध असतो हेच आपण सोयीस्करपणे विसरून जातो. पण असे हळवे, मोडून टाकणारे क्षण त्यांच्याही आयुष्यात येऊ शकतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. एखाद्याला अशा उंचीवर नेऊन ठेवलं की मन मोकळं करून त्या भावनांचा निचरा करायचा त्याचा मार्गच आपण बंद केलेला असतो हेही भान ठेवलं पाहिजे.


  मला त्यांच्या बरोबर काम करताना त्यांच्याविषयी एक कविता सुचली होती . ती आवर्जून इथे द्यावीशी वाटतेय
  दुःखाचा काळडोह
  काळजात नांदतो
  ओठांवर हास्यरंग
  अनायास रंगतो ....१
  अवघडसा वसा घेत
  एक योगी नांदतो
  वेदनांच्या कळांतुनी
  सेवागंध दरवळतो...२
  मला जाणवलेले गुरुजी हे असे होते!

  - जयश्री देसाई
  jayashreedesaii@gmail.com

 • Jayashri desai write about bhayyuji maharaj
 • Jayashri desai write about bhayyuji maharaj
 • Jayashri desai write about bhayyuji maharaj

Trending