आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाम्ही ‘सत्ताभिमानी’...! ( बुरा ना मानो होली है )

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलाखत घेतल्याने तमाम महाराष्ट्राच्याच भुवया उंचावल्या. हे दोन ध्रुव एका व्यासपीठावर आले कसे, असा प्रश्नही अनेकांना पडला. मात्र ’बेकीतही एकी’ ही मराठी माणसाची परंपरा यातून दिसून अाली. अशाच आणखी दोन ध्रुवांना एकत्र आणण्याचा योग ‘दिव्य मराठी’ने  होळीनिमित्त खास आपल्या वाचकांसाठी आणला आहे.... या उपक्रमाचे नाव आहे प्रतिशोध मराठी मनाचा..... या (न झालेल्या) विशेष मुलाखतीचे वार्तांकन खास अामच्या वाचकांसाठी...  

स्थळ : लोणावळ्याचे फार्म हाऊस
(अविनाश भोसलेंचे)  
नारायण राणे : (प्रेक्षकांना उद्देशून ) खरं तर आज एका पक्ष प्रमुखाने दुसऱ्या पक्ष प्रमुखाची मुलाखत घेण्याची ही महाराष्ट्रातील दुसरीच वेळ. पण माझ्यावर दडपण बिडपण अजिबात आलेले नाही. कारण आपला स्वभावच सुरुवातीपासून रोखठोक आणि बेधडक. म्हणूनच आज माझे प्रश्नही तसेच बेधडक असतील.   
मी वयाने मोठा असलो तरी  उद्धवरावांचे आमदार जास्त आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांचा मान मोठा...  
तर उद्धवा... सॉरी सॉरी.. उद्धवराव ‘(प्रति) शोध मराठी मनाचा’ या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तुमचे स्वागत आहे.   
उद्धव ठाकरे : जय म्हाराष्ट्र....  

राणे : उद्धवजी खरे तर तुमचा पक्ष प्रचंड ‘ स्वाभिमानी’.  साहेबांनीच हे संस्कार तुम्हा आम्हावर घडवले. मात्र तरीही हा ‘स्वाभिमान’ गहाण टाकून तुम्ही सत्तेत कसे सहभागी झालात. आणि तेही दुय्यम स्थानी.  
उद्धव : (मोठ्या आवाजात) हे पाहा, तो ‘स्वाभिमान’ वगैरे जो काही आहे तो तुमचा पक्ष आहे. आमची फक्त सेना. शिवसेना. साहेबांच्या आशीर्वादाने आणि तमाम मराठी माणसाच्या हितासाठी आम्ही लढत आहोत. त्यासाठीच सत्तेत आहोत. माझा शेतकरी सुखी झाला पाहिजे. प्रसंगी त्यासाठी सत्तेला लाथ मारण्याची माझी तयारी आहे. सत्तेसाठी लाचार होण्याची  आमची अाैलाद नाही.  

राणे : हे झाले ‘ऑन रेकॉर्ड’. अाता ‘ऑफ द रेकॉर्ड’ काय आहे तेही सांगून टाका.  
उद्धव : (हळू आवाजात) काय सांगावं नारायणराव, गेली १५ वर्षे आमचा सैनिक सत्तेपासून दूर होता. सैरभैर झाला होता. या वेळी कसे तरी आघाडीविरोधात वाटावं होते. म्हटलं चला चांगले योग आहेत. सैनिकांचे कल्याण करावे, आपणही मुख्यमंत्री व्हावे. मात्र कमळीने आयत्यावेळी दगा दिला. पाठीत खंजीर खुपसला म्हणा, आणि सारे स्वप्नं भंगले. आता तरीही तुम्ही म्हणताय तसा स्वाभिमान जपायला जावा तर पक्ष फुटण्याची भीती. पदेच नसतील तर कार्यकर्ते आणि नेते  टिकतील कसे? तुम्ही नाही का मागच्या वेळी गेलात आम्हाला सोडून. सत्तेसाठी. तशीच गत इतरांची.  

राणे : आमचे सोडा हो. पण मी म्हणतो. ज्यांच्यावर तुमचा राग त्यांच्याच मांडीला मांडी लावून कसे बसता?  
उद्धव : अडला हरी..... दुसरं काय  

राणे: पण तुमचा फडणवीसांवर राेष दिसत नाही. मात्र दिल्लीकरांची नाव जरे घेतले तरी तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. असे का?  
उद्धव : दिल्लीकरांमुळेच मराठी माणसात फूट पडली. २५ वर्षांची युती तुटली. आमचे मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न भंगले. युती असती तर आज आम्ही मोठा भाऊ असतो राज्यात. मुख्यमंत्रीही झालो असतो. मात्र त्या ‘अफजलखानांना’ ते मान्य नव्हते. नोटाबंदीचेही वांधे त्यांनीच केले. फडणवीस बिचारा गरीब माणूस. त्यांचा दोष नाही. दिल्लीचा ‘बादशहा’ जो हुकूम सोडणार त्याची अंमलबजावणी त्याच्या ‘फडणवीस’ना करावीच लागते. स्वतःची नोकरी वाचवण्यासाठी एेकावे लागते त्यांना वरिष्ठांचे.....  

राणे : गेल्या वर्षभरात तुम्ही दुसऱ्यांदा स्वबळाची घोषणा केलीत. एवढा आत्मविश्वास आला कुठून?  
उद्धव: (खड्या आवाजात ) माझा सैनिक हीच माझी ताकद आहे. विधानसभेवर भगवा फडकवण्याची ताकद फक्त आमच्या शिवबंधनात आहे.  
(नंतर हळू आवाजात) आणि नारायणराव तुम्हीच सांगा दुसरा पर्याय तरी आहे का आमच्याकडे. ‘कमळा’ला आमच्या बाणाची अॅलर्जी. भाऊ असले तरी त्यांची आणि आमची ‘मनं’ (से) जुळत नाहीत. मग काय करणार? नवऱ्याने टाकून देण्याआधी आपणच काडीमोड घेऊन टाकायचा. ... तसे आहे हे..  

राणे : बरं आता तिसऱ्या पिढीलाही तुम्ही प्रमोशन दिले आहे. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत तुमच्या?  
उद्धव : जी स्वप्ने आपण पूर्ण करू शकलो नाहीत ती किमान आपल्या मुलाने तरी पूर्ण करावीत अशी तुमच्या- आमच्यासारख्या सर्वच बापांची अपेक्षा असते. मुख्यमंत्रिपद आपल्याला नाही मिळाले ते पुढच्या पिढीने तरी मिळवावे हीच अपेक्षा दुसरं काय?  

राणे : नाही नाही. माझे तसे नाही. मुख्यमंत्रिपद मलाच मिळायला हवे. म्हणून तर स्वाभिमान जपून ठेवलाय मी..... अाता मला काेणी कितीही ‘दिल्ली’त बाेलावत असले तरी मी मात्र महाराष्ट्रातच राहणार... काेण मला राेखताेय तेही पाहूयात....!  
राणेंच्या या वाक्याला उद्धवही टाळी देऊन प्रतिसाद देतात आणि दोघेही हातात हात घालून अँटी चेंबरमध्ये निघून जातात......

 

- महेश रामदासी

बातम्या आणखी आहेत...