आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना जिथे शिकवले तेथेच स्वयंपाकी, चालकाच्या मुलांना शिक्षण; अरुण जेटलींचे विद्यादान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुप्तपणे केले जाते तेच खरे दान. त्यात एका हाताचे दुसऱ्या हाताला ठाऊकही नसते. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली देखील काहीसे असेच करतात. जेटली यांनी आपल्या खासगी कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या उचलल्या आहेत. त्यांच्या कुटुंबाची देखरेखही ते आपल्या कुटुंबासारखीच करतात. कारण ते त्यांना आपल्याच कुटुंबाचा एक भाग मानतात. दुसरीकडे कर्मचारी देखील कुटुंबातील सदस्यासारखीच जेटली यांची देखभाल करतात. त्यांना वेळोवेळी आैषधी देणे किंवा भोजन आणि इतरांची चांगली बडदास्त ठेवतात.  


जेटली यांनी एक धोरण तयार केले आहे. त्यांची मुले चाणक्यपुरी येथील कार्मल कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिक्षण घेतात. त्याच ठिकाणी घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करून दिली आहे. हे त्यांचे जणू अघोषित धोरणच बनले आहे. कर्मचाऱ्यांची मुले परदेशात शिक्षणासाठी इच्छुक असल्यास ते त्यांना आपली मुले जेथे शिकली तेथेच व्यवस्था करून देतात. गाडी चालक जगन व सहायक पद्मसह सुमारे १० कर्मचाऱ्यांचे जेटली कुटुंबाशी गेल्या दोन-तीन दशकांपासून असेच माणुसकी आणि स्नेहाचे नाते जुळलेले आहे.  त्यापैकी ३ मुले आता परदेशात शिक्षण घेत आहेत. जेटली कुटुंबाच्या भोजनाची सर्व व्यवस्था पाहणारे जोगेंद्र यांच्या दोन मुलींपैकी एक लंडनमध्ये शिक्षण घेत आहे. 


संसदेत सावलीसारखी साथ देणारे जेटली यांचे सहकारी गोपाल भंडारी यांचा मुलगा डॉक्टर व दुसरा अभियंता बनला आहे. त्याशिवाय संपूर्ण कर्मचाऱ्यांत सर्वात महत्त्वाचा चेहरा म्हणून सुरेंद्रकडे पाहिले जाते. ते जेटली यांच्यासोबत वकिलीच्या प्रारंभीपासून आहेत. ज्या कर्मचाऱ्यांच्या मुलांना एमबीए किंवा इतर व्यावसायिक अभ्यासक्रम करायचा आहे, अशांना जेटली अभ्यास शुल्कापासून नोकरीपर्यंतची सर्व व्यवस्था करतात. जेटली यांनी २००५ मध्ये आपले सहकारी व विद्यमान आमदार आे.पी. शर्मा यांचे पुत्र चेतनच्या विधी अभ्यासक्रमादरम्यान त्यास आपली ६६६६ क्रमांकाची असेंट कार भेट दिली होती. 


जेटलींची आर्थिक शिस्त ठेवतात. एकेकाळी ते आपली मुले (रोहन आणि सोनाली) यांना हात खर्चासाठी धनादेश देत. एवढेच नव्हे तर कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन व मदत सर्वकाही धनादेशाद्वारे देतात. त्यांनी वकिली करतेवेळीच मदतीसाठी जनकल्याण निधीची स्थापना केली होती. या निधीचे व्यवस्थापन ते एका विश्वस्त संस्थेमार्फत करतात. ज्या कर्मचाऱ्यांची मुले चांगले गुण संपादन करतात. त्यांना जेटली यांच्या पत्नी संगीता भेटवस्तू देऊन प्रोत्साहन देतात.                
- संतोष कुमार