Home | Divya Marathi Special | Parsharam Patil write about African blacks

गुलामी इथली संपत नाही…

परशराम पाटील | Update - Jan 04, 2018, 02:00 AM IST

कष्ट करण्याची तयारी असतानाही रोजगार मिळत नसल्याने अनेक आफ्रिकन कृष्णवर्णीयांना युरोप जवळचा वाटतो. युरोपमध्ये प्रवेश करण्

 • Parsharam Patil write about African blacks

  कष्ट करण्याची तयारी असतानाही रोजगार मिळत नसल्याने अनेक आफ्रिकन कृष्णवर्णीयांना युरोप जवळचा वाटतो. युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून धगधगत असलेला लिबिया राजमार्गासारखा आहे. लिबियामधून युरोपमध्ये प्रवेश करणे सहज शक्य हाेते आहे. जीवाची पर्वा न करता व वाटेल ती किंमत मोजून हजारो आफ्रिकन कृष्णवर्णीय निर्वासित लिबियामध्ये आहेत. ते लोक भूमध्य समुद्र पार करण्यासाठी तस्करांना हजारो डाॅलर देऊन युरोपमध्ये प्रवेश करतात. निर्वासित म्हणजे तस्करांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी ठरली आहेत.


  पाश्चिमात्य राष्ट्रांसह जागतिक समुदायासाठी नेहमीच अस्पृश्य राहिलेले निर्वासित आफ्रिकन धगधगत्या लिबियामध्ये स्मार्टफोनच्या किंमतीपेक्षाही कमी किमतीत गुलाम म्हणून विकले जात आहेत. मानवी क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घृणास्पद प्रकारानंतर जगातील कुठल्याच मानवी हक्कांसाठी काम करणाऱ्या संघटनांना या गुलामांची दया आली नाही. आफ्रिकी देशांमध्ये मानवी तस्करी, गुलामगिरी हा रानटी प्रकार आजही अस्तित्वात आहे. मानवी मूल्यांची राजरोसपणे चिरफाड होत असताना जागतिक माध्यमांनीही या घटनेची म्हणावी तशी दखल घेतलेली नाही. अवघ्या ४०० डाॅलरमध्ये आफ्रिकन कृष्णवर्णीय निर्वासित तरुणांची गुलाम म्हणून विक्री होत असलेला व्हिडिओ ‘सीएनएन’ने प्रसिद्ध करून या प्रकरणाला वाचा फोडण्याचा प्रयत्न नुकताच केला. अरब स्प्रिंग व पाश्चिमात्य राष्ट्रांच्या ‘नाटो’च्या हस्तक्षेपानंतर राखरांगोळी झालेल्या लिबियामधील वेगवेगळ्या नऊ शहरांमध्ये गुलामांचा बाजार भरला व त्यामध्ये गुलाम विविध कामासाठी विकले गेले.


  जागतिक सुरक्षा परिषदेतील स्थायी सदस्य असलेल्या फ्रान्सकडून गुलाम विक्रीवर तातडीची बैठक बोलाविण्यात आली. पण या बैठकीत दोषींना कठोर शासन करण्यात यावे ही मागणी वगळता कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आलेले नाही. लिबियाची राजधानी असलेल्या त्रिपोलीमध्ये नाटोचा लष्करी तळ आहे पण त्या ठिकाणीच गुलामांची विक्री झाल्याचे समोर आले. त्यामुळे नाटोच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते. ज्या लिबियामध्ये गुलांमाचा व्यापार होत आहे त्याच ठिकाणी आजच्या घडीला तब्बल १३ लाख नागरिक मदतीसाठी विवंचनेत आहेत. हुकुमशहा महंमद गडाफीचा खात्मा करण्यात आल्यानंतर लिबियामध्ये राजकीय अस्थिरता, अंतर्गत यादवी व अर्थव्यवस्थेची पूर्णपणे वाताहत झाली आहे.


  कृष्णवर्णीयांची गुलामीतून सुटका करण्यासाठी प्रदीर्घ लढा सुरू असला तरी त्याची फलश्रुती म्हणावी तशी आजही मिळालेली नाही. पाचवीला पुजलेली गरीबी, बेरोजगारी, निष्क्रीय राजकीय-सामाजिक व्यवस्थेमुळे कृष्णवर्णीयांच्या मरणयातना संपलेल्या नाहीत. पाश्चिमात्य राष्ट्रांमधील छोट्यातील छोट्या घटनेला न्याय मिळवून देण्यासाठी सक्षम व्यवस्था आहे. किंबहुना न्यायनिवाडा करणारी जगाच्या पाठीवरील यंत्रणाही त्यांच्याच ताब्यात आहे. त्यामुळे आफ्रिकन देश न्यायासाठी नेहमीच मुकत आलेले आहेत हे जळजळीत वास्तव आहे. साम, दाम, दंड, भेद व प्रसंगी लष्कर घुसवून अमाप संपत्ती आपल्या ताब्यात ठेवणे अशा पद्धतीची व्यवस्था पाश्चिमात्यांनी आपल्या बळाच्या जोरावर निर्माण केली. सामाजिक माध्यमांमध्येही गुलामीबाबत तुरळकसुद्धा प्रतिक्रिया उमटली नाही.


  गुलाम म्हणून विक्री होत असलेला व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली असली तरी त्यामध्ये नावीन्य असे काहीच नाही, अशीच प्रतिक्रिया आफ्रिकन कृष्णवर्णीयांमधून उमटत आहेत. टीचभर पोटाचा खळगा भरण्यासाठी लाखो आफ्रिकन कृष्णवर्णीयांना संघर्ष चुकलेला नाही. कष्ट करण्याची तयारी असतानाही रोजगार मिळत नसल्याने अनेक आफ्रिकन कृष्णवर्णीयांना युरोप जवळचा वाटतो. युरोपमध्ये प्रवेश करण्यासाठी त्यांच्यासाठी गेल्या पाच वर्षापासून धगधगत असलेला लिबिया राजमार्ग ठरला आहे. कारण लिबियामधून युरोपमध्ये प्रवेश करणे सहज शक्य आहे. त्यामुळे जीवाची पर्वा न करता, वाटेल ती किंमत मोजून हजारो आफ्रिकन कृष्णवर्णीय निर्वासित लिबियामध्ये आहेत. ते लोक भूमध्य समुद्र पार करण्यासाठी तस्करांना हजारो डाॅलर देऊन युरोपमध्ये प्रवेश करतात.


  निर्वासितांकडून हजारो डाॅलर घेऊन त्यांचा युरोपमधील प्रवास अधांतरी व सुरक्षेला चुकवणारा असतो. काहीवेळा तस्करांकडून मारामारी करणे, हातपाय तोडणे असे प्रकारसुद्धा घडले आहेत. सर्वात रानटी व विकृत प्रकार तारुण्यात प्रवेश केलेल्या मुलींसोबत घडतो आहे. प्रवासामध्ये तरुण मुली निर्वासितांमध्ये दिसल्यास त्यांना गर्भनिरोधक साधने सोबत घेण्याची सक्ती केली जाते. त्यामुळे त्या मुली वासनांध तस्करांच्या किती वेळा व कोणत्या पद्धतीने बळी पडत असतील याचा विचार जरी करायचा म्हटलं तरी अंगावर शहारा येतो. या भीषण परिस्थितीमध्ये निर्वासित लाेक तस्करांना मोठा मोबदला देऊन युरोपमध्ये स्थलांतरित होण्याचा मार्ग वापरत आहेत.


  आफ्रिकन कृष्णवर्णीयांना इस्रायलने आसरा दिला, पण गेल्या दोन वर्षापासून त्यांनी कठोर धोरणे राबविण्यास सुरवात केली आहे. स्वतः निर्वासितांचा देश असलेल्या इस्रायलला कृष्णवर्णीय आता जड वाटू लागले आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी इस्रायलचा दरवाजा बंद झाल्यात जमा आहे. भेदरलेले काही निर्वासित एरिट्रीया ते इथिओपिया व तिथून सुदान पुढे लिबिया असा संघर्षमय प्रवास करत आहेत. लिबियाचा हुकुमशहा महंमद गडाफीची २०११ मध्ये हत्या झाल्यानंतर लिबियाची जी काही वाताहत झाली ती आजतागायत भरून आलेली नाही. आफ्रिकन देशांमध्ये मानवी विकास निर्देशांकात लिबिया गडाफीच्या कालखंडात सर्वोच्चस्थानी होता हे नमूद करावे लागेल. आफ्रिकन ऐक्य तसेच एकाच चलनासाठी साद घालणाऱ्या गडाफीने कृष्णवर्णीयांना मायेने आसरा दिला होता व गुलामांच्या विक्रीसारखा घृणास्पद प्रकार घडू दिला नव्हता. वर्णद्वेषाविरुद्ध आवाज उठविणाऱ्या गडाफीच्या हत्येनंतर लिबियातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. जागतिक शांततेसाठी नोबेल पुरस्काराचे मानकरी ठरलेले व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या देदिप्यमान कारकिर्दीमधील लिबियातील राजकीय व सामाजिक अपयश मनाला कुरतडणारे ठरले आहे यामध्ये शंका नाही. लिबियामध्ये नाटो फौजा घुसवणे हा आपल्या कारर्किदीमधील सर्वांत दुर्देवी असा निर्णय होता अशी जाहीर कबुली देणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे आफ्रिकन अमेरिकन आहेत.


  गडाफीच्या कालखंडात लिबियामध्ये मोफत आरोग्यसुविधा व शिक्षणाची सोय होती. गडाफीने अंमलबजावणी केलेल्या योजनांची संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क परिषदेने त्याबाबत कौतुक केल्याची नोंद आहे. नाटोने लिबियामधील फुटीरतावादी गटाला पाठबळ दिले होते. अरब स्प्रिंग चळवळीची पहिली ठिणगी ट्युनिशियामध्ये पडली होती. या चळवळीत सिरिया व लिबियामध्ये सर्वांत मोठा वणवा पसरला. त्यानंतर उसळलेल्या जनभोक्षानंतर हुकुमशहा महंमद गडाफीची हत्या झाली. गडाफीच्या हत्येनंतर देशाच्या अंतर्गत व्यवस्थेत किंचितही फरक पडलेला नाही किंबहुना अत्यंत भीषण अशी परिस्थिती आहे. अगदी पाच वर्षापूर्वी आफ्रिकन देशांमधील लिबिया हा स्थैर्य असलेला देश म्हणून ओळखला जात होता. पण त्या दरम्यानच आलेल्या अरब स्प्रिंग चळवळीत महंमद गडाफीच्या सत्तेसह अंत झाल्याने लिबिया अजून धुसफुसतो आहे. आतापर्यंत तिथे स्थिर सरकार येऊ शकलेलं नाही. तब्बल चार दशके लिबियावर गडाफीची एकहाती सत्ता होती. तेलसंपन्न राष्ट्रांपैकी हा एक देश. राजकीय अस्थैर्यामुळे इसिसला इथे हात पसरण्यास वेळ लागला नाही. भूमध्य समुद्रातून युरोपमध्ये जाण्याच्या प्रयत्नात स्थलांतरितांच्या बाबतीत अनेक विपरित घटना घडल्या, ज्यामध्ये त्यांना जीव गमवावा लागला. मानवी लिलाव पहिल्यांदा उघडकीस आला असला तरी जगभरातून मानवी तस्करी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. एका स्वयंसेवी संस्थेने केलेल्या अहवालानुसार तब्बल ४.५ कोटी लोक गुलामीचे बळी ठरले.


  - परशराम पाटील, दम्माम, सौदी अरेबिया.
  parshrampatil1209@gmail.com

Trending