आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अांध्रलता : गाेड गायकीचा दरवळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे आशाताईंचा जन्म झालेला. आशालता हे नावच किती अर्थपूर्ण! आशा (श्रीमती आशा भोसले) व लता (श्रीमती लता मंगेशकर)  यांच्या नावांचा समन्वय म्हणजे आशालता. या दोघींचा आशीर्वाद जन्मत:च लाभावा म्हणून ही सहज घडलेली किमया. संगीताचा पदर हाच आशाताईंचा सर्वाधिक आवडता. त्यामुळे त्याची वीण घट्ट करण्याचा त्यांनी आयुष्यभर मनोभावे प्रयत्न केला. 
 
सन १९५२-५३ चा काळ. आशाताई १२ वर्षांच्या. त्या वेळी हैदराबादेत गणेशोत्सवात मेळे होत. त्यातून त्यांना मिळालेली गायनाची संधी. मग आपल्यापाशी गोड गळा आहे, याची झालेली जाणीव. पुढे शारदोत्सवात पाच हजार श्रोत्यांसमोर गाणे म्हणण्याची संधी त्यांना मिळाली. “अनारकली’ या हिंदी चित्रपटातील “ये जिंदगी उसी की है’ हे गीत त्यांनी हुबेहूब लता मंगेशकरांसारखे म्हटले. यातून त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वडिलांना त्यांच्या गायनाकडे लक्ष द्यावेसे वाटले व त्यांच्यामुळेच पुढे संगीत महामहोपाध्याय पं. स. भ. देशपांडे, डॉ. एन. के. कऱ्हाडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. मधुसूदन भावे यांसारख्या दिग्गज गुरूंचे मार्गदर्शन त्यांना लाभले. मूळच्या सुंदर व गोड गायकीला पैलू पडत गेले.    


आशाताईंच्या जीवनात हेवा वाटावा असे भाग्ययोग जुळून आले. त्याची येथे फक्त नोंद करतो. त्यातून या गायिकेचे श्रेष्ठत्व सहज उमजेल. वयाच्या १४ व्या वर्षी सन १९५४ मध्ये हैदराबाद येथे झालेली श्रीमती  लता मंगेशकर यांची पहिली भेट व त्यांचे लाभलेले आशीर्वाद. पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हैदराबाद येथे आले होते. आशाताईंचे भक्तिसंगीत आठ ते दहा दिवस रोज त्यांना ऐकण्यास मिळाले. या मुलीच्या गाण्याने प्रसन्न झालेले डॉ. राजेंद्र प्रसाद तिथे उपस्थित असलेल्या राज्यपाल मेहंदी नवाबजंग व अन्य मंडळींसमोर म्हणाले, अाता त्या अांध्रलता म्हणून अाेळखल्या जातील. पंडित नेहरू, लालबहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, पी. व्ही. नरसिंह राव, यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या राजकीय क्षेत्रातील ज्येष्ठांसमोर त्यांनी सादरीकरण केले. 


पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या लग्नात प्रख्यात कवी राजा बढे यांनी रचलेली मंगलाष्टके त्यांनी गायली. जगप्रसिद्ध गायक बडे गुलाम अली खान साहेब यांच्या मैफलीत आशाताईंनी “मारू बिहाग’ पेश केला. बडे गुलाम अली साहेबांनी आशाताईंना मनापासून दाद दिली. अन्नपूर्णा प्रॉडक्शनच्या तेलगू चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले. या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक होते राजेश्वर राव अाणि निर्माते डी. मधुसूदन राव. या चित्रपटातील गाण्यांमुळे आशाताई संपूर्ण आंध्र प्रदेशात लोकप्रिय ठरल्या.  भारत सरकारच्या सांस्कृतिक विभागातर्फे जुलै १९६३ मध्ये काबूलला त्या गेल्या. सांस्कृतिक कला पथकात उपशास्त्रीय गायनासाठी आशाताईंची निवड झाली होती. या कला पथकात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतासाठी पं. भीमसेन जोशी, सतारवादक पं. उस्ताद विलायत खाँ, तबल्यासाठी पं. सामता प्रसाद, नृत्यासाठी श्रीमती इंद्राणी रेहमान (त्या वेळच्या मिस इंडिया) या दिग्गज प्रभृती हाेत्या. १५ दिवसांचा हा दौरा आशाताईंचे कलाजीवन किती समृद्ध करून गेला असणार.  


औरंगाबादच्या वसंतराव करलगीकर यांच्याशी आशाताईंचा विवाह झाला, या घटनेला पन्नास वर्षे उलटून गेली आहेत. वसंतराव लघुउद्योग महामंडळात अधिकारी. त्यांनाही संगीताची आवड. ते उत्तम तबलावादक आहेत. विवाहानंतर आशाताईंच्या आयुष्याला आणखी एक नवा पदर प्राप्त झाला. 


आधीचे दोन पदर होतेच. एक संगीत साधनेचा, दुसरा १९६३ मध्ये सुरू झालेल्या भारतीय अायुर्विमा महामंडळातील नाेकरीचा. विवाहानंतरचा प्रपंचाच्या पदराला नोकरीचा पदर पोषकच ठरला. संगीताचा पदर हाच आशाताईंचा सर्वाधिक आवडता. त्यामुळे त्याची वीण घट्ट करण्याचा त्यांनी आयुष्यभर मनोभावे प्रयत्न केला. 


त्या आकाशवाणीवरील मान्यताप्राप्त कलाकार होत्या. त्यांचे संगीत क्षेत्र हळूहळू विस्तारत गेले. भारतरत्न पं. भीमसेन जोशी, श्रीमती गंगुबाई हनगल, माणिक वर्मा, बसवराज राजगुरू यांच्यासारख्या दिग्गजांचे मार्गदर्शन लाभले. आता मात्र हा प्रवास थांबला आहे. पण आपल्या गोड गायकीचा सुगंध अाणि स्मृती त्या मागे ठेवून गेल्या.  


- प्रा. डॉ. उल्हास रत्नपारखी

बातम्या आणखी आहेत...