Home | Divya Marathi Special | 95th anniversary of Vidarbha Sahitya din

सृजनशील प्रतिभेला मुक्त स्वातंत्र्य हवेच!

दिव्‍य मराठी | Update - Jan 23, 2018, 05:39 AM IST

लेखकांनी स्वत:वर बंधने लादून घेऊ नयेत, असे अावाहन विदर्भ साहित्य संघाच्या ९५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे

 • 95th anniversary of Vidarbha Sahitya din

  लेखकांनी स्वत:वर बंधने लादून घेऊ नयेत, असे अावाहन विदर्भ साहित्य संघाच्या ९५ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बाेलताना न्या. नरेंद्र चपळगावकर यांनी केले. अाज सहिष्णुतेची खरी गरज अाहे. लेखकाला संपवण्याचे प्रयत्न हाेत अाहेत. अशा वातावरणात काेणत्या न्यायालयात दाद मागावी हेच समजत नाही; म्हणूनच उदारमतवादी लाेकशाहीचे मूल्यशिक्षण देण्याची गरज निर्माण हाेत अाहे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या भाषणाचा संपादित भाग येथे देत अाहाेत.


  स्वातंत्र्य हा मानवी जीवनाचा प्राणवायू अाहे. स्वातंत्र्य ही एक मूलभूत प्रेरणा अाहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर केवळ सरकारच बंधने अाणते असे नव्हे, तर ज्यांना अापल्या घटनात्मक चाैकटीत काेणताही अधिकार नसताे असे गट किंवा समाजातील लहानसा वर्गदेखील हा अावाज दडपून टाकण्यासाठी झुंडशाहीचा अवलंब करताे. सरकारच्या विरुद्ध न्यायालयात तरी दाद मागता येते. झुंडशाहीच्या विरुद्ध ताबडताेब करण्यासारखे फारसे काही नसते. लेखकाला अाणि साहित्याला बांधिलकी हवी, असे अापण नेहमी म्हणताे. अर्थात बांधिलकी म्हणजे एखाद्या विचाराचे अंधानुकरण नव्हे, किंवा तसा प्रचार करणेदेखील नव्हे. अापल्या जीवनदृष्टीला झापडे लावणे म्हणजे बांधिलकी नव्हे. दुर्गाबाई भागवतांनी लेखकाच्या स्वातंत्र्याची फार चांगली व्याख्या केली अाहे, त्या म्हणतात ‘माझं स्वातंत्र्य म्हणजे माझ्या निर्माणशील दृष्टीचं स्वातंत्र्य, माझ्या जीवनदृष्टीचं स्वातंत्र्य.’


  लेखकावर येणारी बाह्य दडपणे, नियंत्रणे अापल्याला उघड दिसतात. काही नियंत्रणे, दडपणे मात्र स्पष्ट दिसत नाहीत. कित्येक वेळा खुद्द लेखकाला ती जाणवत नाहीत. अापल्या सृजनशील प्रतिभेला मुक्तपणे नवा विचार करण्याचे स्वातंत्र्य ताे देत नाही. जाे अाशय त्याने हाताळलेला असताे, त्याच यशात स्वत:ला गुरफटून घेताे. मराठी साहित्यातील याचे उत्तम उदाहरण म्हणजे ना. सी. फडके यांचे देता येईल. लेखकाची माणूस म्हणून वाढ जशी सेंद्रिय असते, तशीच त्याच्यातल्या लेखकाची वाढदेखील सेंद्रिय असते. वेगवेगळे अनुभव अाणि त्यांचे नित्य-नूतन रूप त्यास नव्या दृष्टीने जगाकडे पाहण्यास प्रवृत्त करते. पण काही वेळा असे हाेत नाही. अशी अात्मसंतुष्टता अाजसुद्धा अनेक लहान-माेठ्या लेखकांत पाहावयास मिळते. प्रेमाचा त्रिकाेण जसा लाेकप्रिय ठरताे, तसाच सामाजिक संघर्षाचा त्रिकाेणदेखील. पुन्हा पुन्हा तसेच लिहावेसे वाटू लागते. याचा अर्थ लेखक त्याच मर्यादांना अापले सामर्थ्य समजत असताे.


  मराठी लघुकथेला ज्यांनी माणसाच्या मनाचा वेध घेण्याची शक्ती मिळवून दिली, नवकथेला समृद्ध केले. त्या गंगाधर गाडगीळांनी एका क्षणी अापले कथालेखन थांबवले. हा त्यांचा निर्णय हाेता, त्यांच्या वाचकांना नव्हता. ‘गारंबीचा बापू’ ही कादंबरी वाचकांना खूपच अावडली, परंतु श्री. ना. पेंडसे यांनी स्वत:च केलेल्या अात्मपरीक्षणात ती रंजकप्रधान ठरली. अाणखी एक उदाहरण विंदा करंदीकरांचे. त्यांनी एकेदिवशी कविता लेखन थांबवले. अनेकांनी अाग्रह केला तरीही ते लिहिते झाले नाहीत. यशस्वी लेखकाला असे अात्मसंयमन किती अवघड असेल याची कल्पना अापण करू शकताे. अरुण साधू यांनी ‘सिंहासन’ अाणि ‘मुंबई दिनांक’ या कादंबऱ्यांतून मराठीत नवा मानदंड तयार केला. दाेन्ही कादंबऱ्या वाचकांना अावडल्या. नंतरच्या काळात राजकारण अाणखी पुढे गेले. साधूंनी त्याबाबत काही लिहिले नाही.


  चांगला लेखक नेहमी अापल्या लेखनाचे स्वत:च परीक्षण करत असताे. ललित साहित्याची तटस्थपणे किंबहुना निर्भीडपणे, गांभीर्याने केलेली समीक्षा अलीकडच्या काळात कमी वाचावयास मिळते. लेखक किंवा त्यातला अाशय याबद्दलचे पूर्वग्रहच समीक्षेचे स्वरूप निश्चित करतात अाणि बहुतेक वेळा शेरेबाजीवर भागवून नेले जाते. एखाद्याने अभ्यासपूर्ण समीक्षा लिहिली अाणि त्यात लेखकाला अप्रिय वाटणारे काही असेल तर समीक्षकाच्या हेतूबद्दल शंका घेतली जाते.


  भाेवतालच्या वातावरणाने समाजात एक प्रकारची असहिष्णुता निर्माण केली अाहे. असहिष्णुता म्हणजे केवळ सामाजिक दाेष ठरत नाही. तिचा प्रादुर्भाव व्यक्तिमनात हाेताे. लेखकांच्या अाणि वाचकांमध्येही हाेताे. चांगल्या साहित्यकृतीचा अास्वाद घेण्याचे माझे स्वातंत्र्यसुद्धा माझ्या मनात असहिष्णुता असेल तर गमावून बसताे. अापली संवेदनशीलता व्यापक असेल तर जगाच्या पाठीवर दूर असलेल्या माणसाचे दु:खही लेखकाला हेलावून टाकते. सर्व प्रकारच्या भाैगाेलिक मर्यादा अाेलांडलेल्या असतात. कवी अनिल यांची ‘निर्वासित चिनी मुलास’ ही कविता अापल्या सर्वांच्या स्मरणात असेलच. जगातल्या सुख-दु:खाचे, द्वेष-प्रेमाचे स्तिमित करणारे दर्शन झाले म्हणजे त्याच्या तुलनेत अापल्या दु:खाचा, वेदनेचा अापण विचार करताे. अापले अनुभव वैयक्तिक असतात हे खरे; पण ताे अनुभव साहित्यकृतीचे रूप घेत असताना हे वैश्विक वास्तव अापल्या मनाच्या पडद्यावर असते का? नसेल तर अापले साहित्य वैश्विक कसे हाेणार?


  - वा. ल. कुलकर्णी यांनी समीक्षेत वारंवार ‘स्व उन्मळून पडणे’ असा शब्दप्रयाेग करतात. त्या अर्थाने स्वत:पासूनही मुक्त असलेला लेखकच खरे स्वातंत्र्य उपभाेगू शकताे. ज्या अात्मबंधनांचा मी उल्लेख केला अाहे ती बंधने बाह्य व्यक्तित्वाची, शारीर अस्तित्व असलेल्या लेखक नावाच्या माणसाची अाहेत. ती बंधने लेखकापर्यंत पाेहोचू न देता त्याचे स्वातंत्र्य अबाधित कसे राखायचे हा सगळ्यांसमाेरचा प्रश्न अाहे.

Trending