अण्णाभाऊ साठे जयंती विशेष: सांगली ते मुंबई केला पायी प्रवास; पोहोचले मॉस्को, तळागाळातील हृदयापर्यंत
'पृथ्वी ही शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे', हे तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्
-
भारत स्वातंत्र्य होण्याआधी देशात दलितांची काय अवस्था होती, हे नव्याने सांगण्याची गरज नाही. त्याकाळी सांगलीच्या एका खेड्यातील एक मुलगा मुंबईच्या मायानगरीत येतो आणि मुंबईचाच होऊन जातो. नंतर तो केवळ मुंबई किंवा महाराष्ट्राचा नाही तर या विश्वाचाही होतो. ती व्यक्ती म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंची आज (1 ऑगस्ट) जयंती आहे.
'पृथ्वी ही शेषाच्या फणावर नाही तर कामगारांच्या तळहातावर तरली आहे', हे तत्वज्ञान मांडणारे अण्णाभाऊ साठे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत सक्रिय सहभागी झाले होते. शाहीर अमर शेख आणि अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात अनेक पोवाडे लिहून सरकारवर असूड ओढले होते. लाखोंच्या जनसमुदायाला खिळवून ठेवण्याची ताकद या शाहीरात होती. लौकीकार्थाने दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंनी शेकडो कथा, नाटके, प्रवासवर्णने आणि 35 हून अधिक कादंबर्या लिहिल्या.
पुढील स्लाइडवर वाचा, कोणकोणत्या कादंबर्यावर तयार झाले चित्रपट... -
घरगड्यापासून सोंगाड्यापर्यंत केले काम
अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या खेड्यात मातंग कुटुंबात झाला. वडील भाऊ शिदोजी साठे यांच्यासोबत ते पायी मुंबईत आले. दोनच दिवस शाळेत गेलेल्या अण्णाभाऊंचे खरे शिक्षण हे मुंबईतील रस्त्यांवर आणि झोपडपट्यांमधील गल्ल्यांमध्ये झाले. येथे त्यांनी कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंगारी, मजूर, सोंगाड्या अशी एक ना अनेक कामे केली. मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कँपमध्ये ते राहात होते. येथेच त्यांच्या लेखणीला धार चढत गेली. श्रृगांरिक लावण्यांपासून चळवळीसाठीचे पोवाडे त्यांनी त्याच ताकदीने लिहिले.35 हून अधिक कादंबर्या
अण्णाभाऊंनी 35 हून अधिक कादंबर्या लिहिल्या. त्यांच्या कादंबरीचा नायक हा मुख्यतः विद्रोही आणि बंडखोर राहिलेला आहे. 'फकिरा' ही त्यांची अजरामर साहित्यकृती आहे. त्यांच्या अनेक कादंबर्यांवर चित्रपटही तयार झाले आहेत. अजूनही या कादंबरीची भूरळ अनेकांना पडते. -
तमाशा ते लोकनाट्य
14 तमाशे लिहिणार्या अण्णाभाऊंनी तमाशा हा गण आणि गवळणी शिवायही होऊ शकतो हे दाखवून दिले. गण आणि गवळण हद्दपार करून त्यांनी तमाशाला लोकनाट्य हे नाव दिले. हा कलाप्रकार लोकशिक्षणासाठी सर्वाधिक प्रभावी आहे, हे या अशिक्षित व्यक्तीने शिक्षीत समाजाला दाखवून दिले आहे.अण्णाभाऊंच्या कादंबर्यांवर तयार झाले हे चित्रपट
समाजातील खालच्या स्तरातील आणि गरीबाला केंद्रबिंदू ठेवून अण्णाभाऊंनी लिखाण केले. त्यांच्या प्रत्येक साहित्यकृतीतून दलित-पददलितांच्या आयुष्यातील संघर्षाचे दर्शन घडते. त्यांच्या सात कादंबर्यांवर चित्रपट तयार झाले आहेत.
'वैजयंता' या कादंबरीवर 'वैजयंता' हा चित्रपट 1961 मध्ये रुपेरी पडद्यावर आला. 'आवडी' या कादंबरीवर आधारीत 'टिळा लाविते मी रक्ताचा' (1969), 'माकडीचा माळ' वर 'डोंगरची मैना' (1969), 'चिखलातील कमळ' कादंबरीवर आधारीत 'मुरळी मल्हारी रायाची' (1969), त्यानंतर 1970 मध्ये 'वारणेचा वाघ' या कादंबरीवर त्याच नावाचा चित्रपट आला होता. यात त्या काळातील आघाडीचे कलाकार होते. 'अलगूज' कादंबरीवर 'अशी ही साताऱ्याची तऱ्हा' (1974) हा चित्रपट तयार करण्यात आला होता. 16 आवृत्या प्रकाशित झालेल्या 'फकिरा' या कादंबरीवर आधारित त्याच नावाचा चित्रपटही प्रदर्शित झाला होता.
त्यांनी नाटकही लिहिले होते. 'इनामदार', 'पेंग्याचे लगीन', 'सुलतान' ही त्यांनी लिहिलेली तीन नाटके आहेत. -
'माझी मैना गावाकडे राहिली...' ही त्यांची लावणी अतिशय लोकप्रिय आहे. त्यांचा 'मुंबईचा पोवाडा' मुंबई शहराचे वास्तव सांगणारा आहे. अण्णाभाऊंनी कथा, कादंबर्या आणि तमाशेही लिहिले. मात्र, तमाशा हे खर्या अर्थाने लोकजागृतीचे आणि लोकशिक्षणाचे माध्यम ठरू शकते हे अण्णाभाऊंनी दाखवून दिले.
माझी मैना गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती काहिली....
वरवर पाहाता ही लावणी नवरा-बायकोच्या नात्यातील हळूवार भाष्य वाटते. दोघांच्या दुराव्यामुळे हळव्या झालेल्या पतीची ही कथा वाटते. पण ही लावणी लिहिली गेली आहे, संयुक्त महाराष्ट्र चळवळीवर. त्याकाळी मुंबई महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा घाट सरकार घालत होते. त्याशिवाय बेळगाव, निपाणी महाराष्ट्रापासून दूर होते. त्यांची व्यथा या लावणीतून अण्णाभाऊंनी मांडली होती. -
मुंबईत गिरणी कामगारांमुळे डाव्या चळवळीकडे वळलेल्या अण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे. अण्णाभाऊंना कार्ल मार्क्सचे तत्वज्ञान जवळचे वाटत होते. त्यांनी 1944 मध्ये लालबावटा कला पथक स्थापन केले होते. हे नाव त्यांनी मार्क्स तत्वज्ञानावरुनच घेतले होते. त्यांना कॉर्मेड म्हटलेले आवडायचे. त्यांच्या डाव्या चळवळीकडील ओढ्यामुळेच ते 1963 साली मॉस्कोला गेले. ते तिथे जाण्याआधी त्यांचे साहित्य, त्यांचे पोवाडे तिथे पोहचलेले होते. अण्णाभाऊ मॉस्कोमध्ये गेल्यानंतर त्यांचे मोठे स्वागत झाले. तिथेही त्यांनी आपली कला सादर केली.
-
कार्ल मार्क्स आणि डाव्या चळवळीकडे अण्णाभाऊ झुकलेले असले, तरी त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी येथील दबलेल्यांचा आवाज डॉ. बाबासाहेब आंबेडकरच आहेत असे सांगितले. शोषित, दलितांच्या उद्धारासाठी आंबेडकरी तत्वज्ञानाशिवाय पर्याय नाही हे त्यांनी सांगितले. 'जग बदल घालूनी घाव, सांगून गेले मला भीमराव...' या त्यांच्या कवनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे तत्वज्ञानच महत्त्वाचे असल्याचे सर्वसामान्यांच्या मनावर बिंबवले. त्यांची प्रसिद्ध आणि अनेक आवृत्या निघालेली फकिरा ही कादंबरी त्यांनी डॉ. बाबासाहेबांना अर्पण केली आहे.
-
- अण्णाभाऊ साठे यांनी 35 हून अधिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
- अण्णाभाऊ साठेंच्या कथा आणि कादंबरीमधील नायक हा परिस्थितीशी दोन हात करणारा राहिला आहे.
- मुंबईत झालेल्या पहिल्या दलित साहित्याचे ते उदघाटक होते.
-
संयुक्त महाराष्ट्र चळवळीसह दलित शोषितांच्या चळवळीत आणि जातीअंताच्या लढ्यातील ते सक्रिय कार्यकर्तेही होते. त्यामुळे एका जातीपूरते किंवा समाजामध्ये ते कधीच अडकले नाही. अनेक भाषांमध्ये भाषांतरित झालेले त्यांच्या साहित्यामुळे अण्णाभाऊ देखील वैश्विक झाले आहेत.
-
अण्णाभाऊ साठेंच्या कादंबऱ्या
१ आग
२ आघात
३ अहंकार
४ अग्निदिव्य
५ कुरूप
६ चित्रा
७ फुलपाखरू
८ वारणेच्या खोऱ्यात
९ रत्ना
१० रानबोका
११ रुपा
१२ संघर्ष
१३ तास
१४ गुलाम
१५ डोळे मोडीत राधा चाले
१६ ठासलेल्या बंदुका
१७ जिवंत काडतूस
१८ चंदन
१९ मूर्ती
२० मंगला
२१ मथुरा
२२ मास्तर
२३ चिखलातील कमळ
२४ अलगुज
२५ रानगंगा
२६ माकाडीचा माळ
२७ कवड्याचे कणीस
२८ वैयजंता
२९ धुंद रानफुलांचा
३० आवडी
३१ वारणेचा वाघ
३२ फकिरा
३३ वैर
३४ पाझर
३५ सरसोबत -
अण्णाभाऊंचे साहित्य 27 भाषांमध्ये भाषांतरीत झाले आहे.
-
अण्णाभाऊंचे दुर्मिळ छायाचित्र