Home | Divya Marathi Special | Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

'शेर शिवा का छावा था..' असे होते पराक्रमी पिता-पुत्रामधील काही महत्त्वाचे साम्य-भेद

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 14, 2018, 10:56 AM IST

शिवाजी महाराजांना पाहतच शंभुराजे मोठे झाले. त्यामुळे त्या दोघांमध्ये अनेक प्रकारची साम्य होती.

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला, त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्याच्या दिशेने आगेकूच केली होती. विविध मोहिमा आखणे, राज्यकारभाराची घडी बसवणे या प्रकारची कामे सुरू होती. सईबाईंच्या निधनानंतर जिजाऊंच्या देखरेखीखाली संभाजी महाराज लहानाचे मोठे होत होते. त्यामुळे वडील शिवाजी महाराजांना पाहतच शंभुराजे मोठे झाले. त्यामुळे त्या दोघांमध्ये अनेक प्रकारची साम्य होती. त्याचप्रमाणे दोघांमध्ये काही फरकही होते.

  छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज यांच्यातील मतभेदांच्या अनेक कथा रंगवण्यात आल्या आहेत. पण या पराक्रमी पिता पुत्रांमध्ये स्वभाव गुणांची तुलना केल्यास त्यांच्यात अनेक मुद्द्यावर साम्य असल्याचे समोर येते. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र संभाजी महाराज यांच्यातील अशाच काही साम्य भेदांबाबत आपण माहिती घेणार आहोत. इतिहासाचे अभ्यासक डॉ. बालाजी जाधव यांच्याशी केलेल्या चर्चेतून याठिकाणी ही माहिती देत आहोत.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घेऊयात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातील काही साम्य आणि फरक..

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  इतिहासकारांनी केलेले वर्णन.. 
  छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन करताना इतिहासकारांनी उंची कमी पण करारी, तेजस्वी रुप असलेला राजा असे वर्णन केले आहे. दुसरीकडे संभाजी राजांचे वर्णन करताना उंचपुरा, तगडा, पिळदार शरीरयष्टी असलेला तेजस्वी राजा असे केले आहे. त्यावरून प्रामुख्याने देहयष्टीच्या बाबतीत या दोघांमध्ये काही फरक असल्याचा अंदाज येतो. 

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  स्वभाव .. 
  छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या स्वभावामध्ये बऱ्याच अंशी साम्य असल्याचे अभ्यासक डॉ. बालाजी जाधव यांनी सांगितले आहे. म्हणजे दोघांची रयतेशी असलेली जवळीक आणि रयतेला त्यांच्याबाबत असलेले प्रेम हे त्याचे प्रमुख उदाहरण म्हणता येईल. शिवाजी महाराजांचे संभाजींवर विशेष प्रेम होते. संभाजी राजांच्या लहानपणीच सईबाई गेल्याने संभाजी महाराज पोरके झाले, अशी सहानुभुती शिवरायांच्या मनात होती. त्यामुळे ते संभाजी राजांवर विशेष प्रेम करायचे. या काळात शिवरायांचे संस्कार संभाजी राजांवर होत गेले, त्यामुळे त्यांचे स्वभाव बऱ्याच अंशी सारखे होत गेले. 

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  वय-कालावधी 
  छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द जवळपास 53 वर्षांची होती. त्यामानाने ही कारकिर्द छोटीच होती, पण संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 32 वर्षांची म्हणजे अगदीच छोटी होती. हा महत्त्वाचा फरक होता. पण या छोट्याशा कारकिर्दीतही शिवारायांचा पुत्र शोभावा अशी कामगिरी संभाजी महाराजांनी केली. 

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  शिवरायांनी राज्य तयार केले तर संभाजी जन्माने राजपुत्र 
  शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांची तुलना केली असता संभाजी महाराज अधिक आक्रमक होते असे समोर येते. त्यामागचे कारणही डॉ. जाधव यांनी सांगितले. शिवाजी महाराजांच्या जन्मानंतर बालपणापासून जिजाऊंनी त्यांच्या मनात स्वराज्याचे स्वप्न रुजवले. शिवरायांनी स्वतः पूर्ण स्वराज्य उभे केले. ते राजपुत्र नव्हते. संभाजी महाराज मात्र राजपुत्र म्हणूनच जन्माला आले होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये सुरुवातीपासूनच काहीशी आक्रमकता होती. पण ती आक्रमकता त्यांनी कधी नकारात्मक कामांसाठी वापरली नाही. 

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  जीवनकार्य..
  शिवाजी महाराज यांनी अगदी बालपणापासून स्वराज्याच्या कार्याला सुरुवात केली होती. त्यामुळे त्यांचे संपूर्ण जीवन स्वराज्याची स्थापना आणि त्याचा विस्तार यातच गेले. पर्यायाने ते जीवनातील अधिक काळ लढतच होते असेही म्हणता येईल. त्याविरुद्ध संभाजी राजांची कारकिर्द छोटी असली तरी त्यांनी रणांगणावरील पराक्रमाबरोबरच विविध भाषा शिकणे, संस्कृत शिकणे, ग्रंथ-काव्य लिखाण हेही केले.

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  रयतेचे राजे..
  शिवाजी महाराज रयतेचे राजे होते. त्याचप्रमाणे रयतेमध्ये संभाजी महाराजांची लोकप्रियतादेखिल प्रचंड होती. विशेषतः शिवरायांच्या उपस्थितीत राज्यकारभार सांभाळताना संभाजी महाराजांनी अनेकवेळा दरबारातील मंत्र्यांच्या विरोधात जाऊन रयतेची बाजू घेतल्याच्या नोंदी आहेत. करमाफीला मंत्र्यांचा विरोध असायचा पण नैसर्गिक संकटांसारख्या स्थितीत संभाजीराजे जनतेचा कर अनेकदा माफ करायचे, त्यावरून अनेक वादही झालेले नमूद आहे. 

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  गृहकलहाचा फटका 
  शिवाजी महाराजांच्या तुलनेत संभाजी महाराजांना गृहकलहाचा अधिक फटका बसला. विशेषतः जिजाऊंचे नसणे हेही त्यामागचे कारण ठरले. कारण शिवाजी महाराज मोहिमांवर असताना जिजाऊ राज्यकारभारावर करडी नजर ठेवत. त्याचप्रमाणे त्यांचा कुटुंब आणि दरबारातील मंत्री सर्वांवर वचक असायचा. पण संभाजी महाराजांना बाहेरच्या शत्रूप्रमाणेच गृहकलहाचाही मोठा सामना करावा लागला. त्यामुळेच त्यांची कारकिर्दी आणखी कमी झाली. 

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  एकावेळी अनेक शत्रू
  छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा स्वराज्याचा विस्तार करत होते, त्यावेळी एक एक शत्रू त्यांच्यावर चाल करायचा. शिवाजी महाराजही आदिलशहाशी तह करायचे आणि त्याच्या साथीने मोगलांशी लढायचे, अशा प्रकारच्या निती वापरून ते इतरांना सोबत घेऊन एका शत्रूला नेस्तनाबूत करण्याच्या योजना आखायचे. संभाजी राजांच्या बाबतीत मात्र तसे घडले नाही. संभाजी राजांच्या विरोधात मोगल, इंग्रज, डच असे अनेक शत्रू एकाचवेळी त्यांच्यावर चोहोबाजुंनी हल्ले चढवत होते. त्यामुळे संभाजी महाराजांना चौफेर शक्ती पणाला लावाली लागत होती.

   

 • Comparison Between Shivaji Maharaj And Sambhaji Maharaj

  दरबारातील राजकारण..
  शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेकानंतर आणि आधीही त्यांचे मंत्रिमंडळ त्यांच्या विरोधात नव्हते. त्यामुळे शिवरायांना बाहेरच्या शत्रूवर पूर्ण लक्ष केंद्रीत करता येत होते. त्याउलट संभाजी महाराज युवराज झाले, तेव्हापासूनच त्यांचे दरबारातील मंत्र्यांबरोबर खटके उडत होते. त्यामुळे जेव्हा संभाजी महाराज गादीवर बसले तेव्हा या मंत्र्यांच्या नाराजीमुळे स्वराज्याचे मोठे नुकसान झाले. 

Trending