Home | Divya Marathi Special | Honoring the poems of Shrikant Deshmukh

श्रीकांत देशमुख यांच्या कवितांचा अकादमीचा टिळा लावून सन्मान

प्रवीण देशपांडे | Update - Dec 22, 2017, 02:00 AM IST

प्रसिद्ध मराठी कवी व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्

 • Honoring the poems of Shrikant Deshmukh

  प्रसिद्ध मराठी कवी व ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी श्रीकांत देशमुख यांच्या ‘बोलावे ते आम्ही..’ या काव्य संग्रहास सर्वोत्कृष्ट मराठी कलाकृतीचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील प्रसिद्ध कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी देशमुखांच्या काव्यलेखनाबाबत ‘दिव्य मराठी’च्या वाचकांसाठी व्यक्त केलेले मत त्यांच्याच शब्दात...

  ‘बोलावे ते आम्ही’ या श्रीकांत देशमुख यांच्या कवितासंग्रहाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याची बातमी ऐकली आणि आभाळमाती कवेत घेणारा आनंद मला झाला. श्रीकांतच्या कवितेचा सुरुवातीपासून मी साक्षीदार आहे. तो शेतकऱ्याच्या मुलगा असल्यापासून ते आज उच्च अधिकारी म्हणून वावरतांना मी त्याचा आणि त्याच्या कवितेचा प्रवास पाहिलेला आहे.


  त्याचे या आधीचे ‘बळीवंत’ आणि ‘आषाढ माती’ हे दोन कविता संग्रह आणि ‘बाेलावे ते अाम्ही’ हा तिसरा कविता संग्रह मिळून त्याने शेतकऱ्याच्या जीवनाची गाथाच लिहिलेली आहे. अगदी शेतकऱ्याची परंपरा ते आजचं शेतकऱ्याचं मरण, इथपर्यंत शेतकरी जीवनाचा व्याप श्रीकांतच्या कवितेने कवेत घेतलेला आहे.


  संपूर्ण भूमिनिष्ठ आणि कृषीनिष्ठ अशी श्रीकांतची कविता आहे. या निमित्ताने प्रथमच भूमिनिष्ठ कवितेचा अकादमीचा टिळा लावून सन्मान होत आहे. शेतकरी जीवनाचं आजचं वास्तव, मातीत गाडून घेणारा शेतकरी, मातीतचं आपल अस्तित्व विरघळून टाकणाऱ्या शेतकरी बाया, जागतिकीकरणानं वनवासाच्या १२ वाटांना लावलेली शेतकऱ्याची पोरं, हेच श्रीकांतच्या कवितेचे विषय आहेत. कुठलाही भडकपणा टाळून कवितेच्या आणि शेतकऱ्याच्या खोल अंत:करणात शिरून श्रीकांतने आपल्या कवितेत त्यांना जागा दिलेली आहे.


  अगदी पहिल्या कवितासंग्रहापासून त्याच्या कवितेची हीच प्रकृती आहे. ‘बोलावे ते आम्ही’ या तिसऱ्या संग्रहात तर तो आणखीच सखोल झालेला आहे. मागच्या वर्षी मराठवाड्यातल्या कृषीनिष्ठ कथेला आणि यावर्षी मराठवाड्यातल्या कृषीनिष्ठ कवितेला हा पुरस्कार मिळाल्यामुळे मला आणखीच आनंद झालेला आहे.


  श्रीकांत देशमुख याचं नातं, जन्मानं जरी विदर्भाशी असलं तरी त्याच्या आयुष्याचा पुढचा सगळा प्रवास मराठवाड्याशी संबंधित आहे. शिक्षणाच्या निमित्ताने आणि पुढे नोकरीच्या निमित्ताने त्याचा सर्व काळ मराठवाड्यात गेलेला आहे. त्याच्या कवितेने एका अर्थाने भूमिनिष्ठांचा सन्मान केलेला आहे. आणि साहित्य अकादमीने त्याला पुरस्कार देवून भूमीनिष्ठांचा सन्मान केलेला आहे.


  - शब्दांकन : प्रवीण देशपांडे

Trending