शब्दांनी जर मिठी घातली, गाणे गावे...
कलेच्या क्षेत्रात अनुकरणाच्या सीमा ढासळवून टाकत, आपली वाट, शैली निर्माण करणे, हे आव्हानात्मक मानले जाते. जे अनुकरणातच धन
-
कलेच्या क्षेत्रात अनुकरणाच्या सीमा ढासळवून टाकत, आपली वाट, शैली निर्माण करणे, हे आव्हानात्मक मानले जाते. जे अनुकरणातच धन्यता मानतात, त्यांचा वकुब मर्यादितच राहतो आणि ते कायम कुणाची तरी छाप किंवा ठसा घेऊन वावरत राहतात. पण काही मोजके कलाकार मात्र योग्य वेळी अनुकरणाची सरधोपट वाट सोडून, स्वत:च्या वाटा स्वत: निर्माण करतात, आणि कालांतराने त्या वाटांचे राजमार्ग बनून अन्य कलाकार त्यांचे अनुकरण करू लागतात...अशा मोजक्या कलाकारांमध्ये अरुण दाते हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. संगीतमय, कलासक्त घरातील जन्म, जन्मल्यापासून दर्जेदार कलाविष्कारांचे संस्कार, भौतिक सुखसमृद्धी आणि सर्व प्रकारच्या अनुकूलता लाभलेल्या अरुण दाते यांनी मराठी भावगीतांच्या विश्वात आपल्या मखमली स्वरांनी एक हळवे युग निर्माण केले. दाते यांच्या निधनाने या सुकोमल युगाचा अस्त झाला आहे.
मी नशिबवान कलाकार आहे, अशा शब्दांत स्वत:चा उल्लेख स्वत: अरुण दाते यांनीच केला आहे. मी कॉलेजमध्ये दाखल होईपर्यंत केवळ समृद्धी अनुभवली. नंतर काही काळ आर्थिक ओढग्रस्ती, कौटुंबिक समस्या, स्थलांतर..यामध्ये नक्कीच गेला, पण घरातले संस्कार सगळ्याचा सामना करण्यासाठी पुरेसे खंबीर ठरले, असे त्यांनीच म्हटले आहे. अर्थात नशिब बलवत्तर असले तरी कलाकार म्हणून त्यांची गुणवत्ता उत्कृष्ट दर्जाची होती, आणि त्या गुणवत्तेचे श्रेय सर्वस्वी त्यांचे होते, हे लक्षात घेतले पाहिजे. रसिकाग्रणी रामूभय्या दाते यांच्यासारखे वडील लाभणे, हे अरुण दाते यांचे भाग्य होते.
रामूभय्यांमुळे बालवयापासून नामवंत कलाकार, साहित्यिक आणि अन्य समाजधुरिणांचा सततचा राबता घरात होता. ते सारे पाथेय विनासायास दाते यांना लाभत गेले आणि नकळत्या वयापासूनच त्यांच्यातील कलाकाराची सुप्त जडणघडण करत राहिले. त्यांच्यामधील सुप्त कलाकाराला पं. कुमार गंधर्व, बेगम अख्तर, वसंतराव देशपांडे, पु. ल. देशपांडे, किशोरी आमोणकर यांच्यासह अनेकानेक कलाकारांनी उन्मेष पुरवले आणि एका शुभयोगावर दाते यांची भावगीतगायक ही ओळख निर्माण करणाऱ्या शुक्रतारा.. गीताचा जन्म झाला.
आयुष्याच्या नेमक्या टप्प्यावर खुद्द पुलंनी मी गातो, हे माझ्या वडिलांना सांगितले. मला पहिले गाणे पं. कुमार गंधर्व यांनी शिकवले आणि माझ्या आयुष्याची ओळख बनून राहिलेले शुक्रतारा हे माझे पहिले भावगीत मंगेश पाडगावकर, श्रीनिवास खळे अशा महान कलाकारांच्या साक्षीने ध्वनिमुद्रित झाले...असे भाग्य किती कलाकारांना मिळाले असेल? असा प्रश्नच दाते यांनी विचारला आहे.
आपल्या मर्यादांचे रुपांतर बलस्थानात करण्याची किमया अरुण दाते यांनी कलाक्षेत्रात करून दाखवली. अतिशय मखमली, पातळ आवाज, रेंज मर्यादित आणि शास्त्रीय संगीताची रीतसर तालीम नसल्याने आवाजाला भरदारपणा, वजन नसणे...या मर्यादा त्यांनी नेमकेपणाने जाणल्या आणि ‘जो सूर नाही आपुला ते गीत तू गाऊ नको’ यातील मतितार्थ आचरला. आपल्या आवाजातील मार्दव, हळुवारपणा, रेशमी पोत, शब्दांचे प्रासादिक उच्चारण, स्वराला असलेले भिजलेपण...ही सारी भावगीतांसाठीची बलस्थाने ठरवली आणि रसिकांच्या हृदयात शुक्रताऱ्यासारखेच अढळस्थान निर्माण केले.हिंदी चित्रपटसृष्टीत सैगल, किशोरकुमार यांनी ज्या पद्धतीने आधीचे सारे पुसून स्वत:ची शैली प्रस्थापित व लोकप्रिय केली, तेच काम दाते यांनी मराठी भावगीतांच्या क्षेत्रात केले. दात्यांचा शुक्रतारा १९६३ मध्ये उगवला, तर त्याच्या आधीच काही वर्षे भावगीतांचे सम्राट गजाननराव वाटवे यांच्या सायंताऱ्याचा अस्त होत होता. लता मंगेशकर, आशा भोसले, वसंत प्रभु यांनी निर्माण केलेले भावगीतांचे छोटे पर्व थांबले होते.
मराठी भावगीतांचा रंगमंच मोकळा होता आणि त्या नेमक्या क्षणी दाते यांनी शुक्रतारा...च्या रूपाने एंट्री घेतली. सर्वसामान्य रसिकांना तेव्हा आकाशवाणीखेरीज कुठलेही माध्यम उपलब्ध नव्हते. या पृष्ठभूमीवर दाते यांची शुक्रतारा, अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, सखी शेजारिणी तू हसत रहा, भेट तुझी माझी स्मरते..ही सुरवातीची भावगीते आकाशवाणीच्या भावसरगम कार्यक्रमातून श्रोत्यांपर्यंत पोचली आणि या नव्या रेशीमस्वराने रसिकांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले.
दाते यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी सुरवातीपासून स्वत:चीच गाणी गाण्याचा निर्णय घेतला. अगदी प्रारंभीच्या काळात ते तलत मेहमूद यांच्या गजला अप्रतिम गात असत. तलत यांच्या मधाळ आवाजाची मोहिनी पडल्याने हे अनुकरण स्वाभाविक होते. पण तू तुझ्यासारखा गा, हे वडिलांचे उद्गार आदेश मानून दाते यांनी अखेरपर्यंत स्वत:च्याच गीतांचे सादरीकरण केले आणि रसिकांनी दाते यांचीच गाणी हृदयात बाळगली. मराठी भावसंगीतात दुर्मिळ असणारी युगलगीतेही दाते यांनी प्रचलीत केली. शुक्रतारा मंद वारा...हे तर भावगीतांचा सम्राट शोभावा, असे गाणे ठरले. पाठोपाठ हात तुझा हातातून, धुंद ही हवा, श्रीरंग सावळा तू मी गौरकाय राधा, संधिकाली या अशा धुंदल्या दिशा दिशा, पहिलीच भेट झाली पण ओढ ही युगांची, ऊन असो वा असो सावली, सर्व सर्व विसरु दे गुंतवू नको पुन्हा... ही त्यांची युगुलगीतेही प्रचंड गाजली. या सर्व गीतांची लोकप्रियता इतकी अमाप होती, की देशविदेशांत दौरे करताना दाते यांनी सोबत गायिका नेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही.जिथे कार्यक्रम असेल तिथल्या हौशी गायिका त्यांचे प्रत्येक युगलगीत त्यांच्यासोबत गाण्यासाठी उत्सुक असायच्या. अमृत महोत्सवी कार्यक्रमात दाते यांची मुलाखत सुरू असताना, या हौशी गायिकांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता. वय वर्षे सात ते सत्तर, अशा वयोगटांतील सर्व हौशी गायिकांसोबत शुक्रतारा गाणं म्हणताना, मला ‘तू अशी जवळी रहा’ असे म्हणावे लागले आहे, अशी महामिष्किल टिप्पणी दाते यांनी केल्याचे स्मरते. गाण्याचे ध्वनिमुद्रण करण्यापूर्वी भरपूर तालमी करण्याची तेव्हाची पद्धती आचरल्याने वयाच्या ८० व्या वर्षीही दाते यांना आपल्या गाण्यांसाठी तालमी करण्याची गरज भासत नव्हती.
मला कवी, संगीतकार यांनी गायक बनवले, अशी कृतज्ञता दाते सतत व्यक्त करत असत. आपल्याला शास्त्रीय संगीत गाता येत नाही, त्यामुळे टेक्स्टाईल इंजिनिअर आहोत, तेच बरे, या निर्णयाप्रत येत असतानाच मला श्रीनिवास खळे, यशवंत देव, हृदयनाथ मंगेशकर..असे संगीतकार आणि मंगेश पाडगावकर, वा. रा. कांत ..असे कवी भेटले. त्यांच्या कवितेच्या मी आधी प्रेमात पडलो, मग सुरावटीच्या आणि रसिकांनी दिलेल्या प्रेमामुळे आयुष्यभर नव्याने माझ्या गीतांच्या प्रेमात राहिलो, असे त्यांनी म्हटले आहे. दाते यांच्या आवाजाचे वर्णन करायचे तर ‘आमची कुठेही शाखा नाही’ या पद्धतीचा आवाज त्यांना लाभला होता. त्यांच्या मखमली, रेशमी पोताच्या आवाजाने कित्येक गीतांना खऱ्या अर्थाने भावश्रीमंती मिळाली. याबाबतीत वाटवे युग, फडके युग, मंगेशकर युग….यापेक्षा दाते यांचे वेगळेपण स्पष्ट जाणवते.‘सहज चालतेस तू, तेच नृत्य होतसे, सहज बोलतेस तू, तेच भावगीत असे...इतक्या साध्या शब्दांत त्यांच्या गीतांचे वर्णन करता येते. सूर जुळले शब्दही जुळले, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, धुके दाटलेले, दिवस तुझे हे फुलायचे, मान वेळावुनी धुंद बोलू नको, सूर मागू तुला मी कसा, स्वरगंगेच्या काठावरती, डोळ्यात सांजवेळी आणू नकोस पाणी, या जन्मावर या जगण्यावर, दिल्या घेतल्या वचनांची शपथ तुला आहे, अविरत ओठी यावे नाम...अशी दाते यांची भावगीते ऐकताना रसिकांना त्यातील निखळ भाव सहज स्पर्श करून जातो. ती गाणी थेट भिडतात, पोचतात. त्यांच्या व्यक्तिमत्वातील उमदेपणा, दिलदारी, दातृत्व, पारदर्शीपणा, प्रसन्नता, सौंदर्यदृष्टी, रसिकता, विनम्रता, स्वागतशील वृत्ती...यांचे सुस्पष्ट प्रतिबिंब त्यांच्या प्रत्येक गीतात उमटलेले दिसते. त्यामुळेच पार्थिव रूपाने अरुण दाते आता भेटणार नसले तरी रसिकांच्या मनांवर अधिराज्य करणारी त्यांची गीते अंत:करणातील वीणेवर झंकारत राहतील, यात शंका नाही.
- जयश्री बोकील
‘अरविंद’चे अरुण झाले..
शुक्रतारा मंद वारा या गीतामुळे अरुण दाते यांचे नाव भावगीत विश्वात घराघरात जाऊन पाेहचले. परंतु हे नाव घराघरापर्यंत जाण्यासाठी मजेशीर कारण घडले. शुक्रतारा गाणे अाकाशवाणीवरून प्रसारीत करण्यासाठी उद्घाेषणा करायची हाेती. परंतु अाकाशवाणीकडे ए.अार. दाते असे नाव अाले हाेते अाणि अशा नावाने उद्घाेषणा करता येत नव्हती. अाकाशवाणीच्या अधिकाऱ्यांंनी यशवंत देव यांना फाेन केला. त्यावेळी त्यांनाही त्यांचे खरे नाव अरविंद दाते अाहे हे माहिती नव्हते. घरी त्यांना ‘अरु’ या टाेपण नावाने हाक मारायचे. त्यामुळे त्यांनी अाकाशवाणीच्या अधिकाऱ्यांना अरुण नाव सांगितले. अाता अापल्या समाेर पुढचे गाणे सादर करीत अाहेत अरुण दाते अशी घाेषणा झाली. ही घाेषणा एेकून दाते यांनाही अाश्चर्य वाटले. अापले गाणे म्हणणारा दुसरा माणूस काेण असा त्यांना प्रश्न पडला. पण गाणे एेकल्यावर अावाज अापलाच अाहे अशी त्यांची खात्री झाली, निर्माते यशवंत देव यांच्यामुळे ‘अरविंद दाते’चे ‘अरुण दाते’ असे नामकरण त्यावेळी झाले. अाणि अरुण दाते हे नाव चिकटले ते कायमचे.
-किशोर नवाथे, मुंबई
पुढील स्लाईड वर वाचा, गीतकारांनि व्यक्त केलेल्या भावना......
-
सांस्कृतिक पालकत्व हरपले
दाते यांच्या सहवासात शुक्रताराचे ५०० कार्यक्रम करण्याच्या मिळालेल्या सहवासातून अतिशय सात्त्विक अाणि विलक्षण उदात्त हृदयाचा माणूस मी जवळून अनुभवला. कलावंत म्हणून ते असामान्य तर हाेतेच, पण त्यांचा जिव्हाळा, सहृदयता या गाेष्टी त्यांच्यातील माणूसपण अधाेरेखित करतात. माेठ्या पदावरील नाेकरी अाणि नंतर ख्यातनाम कलावंत म्हणून ते माेठे झाले; पण अहंकाराचा वारा त्यांना कधी शिवला नाही. सामान्यातल्या सामान्य रसिकाला अापलेसे करतानाच सहकलाकाराला मान देण्याचा माेठेपणा त्यांच्यात हाेता. तरल अशी विनाेदबुद्धी त्यांच्याकडे हाेती.
- प्रवीण दवणे, गीतकार -
भावगीताचा सार लाेप पावला
अत्यंत प्रसन्न व्यक्तिमत्त्व असलेल्या अरुण दाते यांच्याकडे सर्वांना अापलेसे करण्याची एक वेगळीच खासियत हाेती. अापल्या घरी सगळ्यांना अामंत्रित करायचे. त्यांना अाग्रहपूर्वक जेवण घालणे यात त्यांना मनस्वी अानंद मिळायचा. पण अापण माेठे गायक असल्याची घमेंड किंवा अहंमपणा त्यांना कधीच शिवला नाही. उलट अापुलकीचा झरा त्यांच्यात सतत वाहत राहिला. महाराष्ट्राच्या या लाडक्या गायकाच्या निधनामुळे भावगीताचा सार लाेप पावला असे वाटू लागले अाहे.
- अनुराधा पाैडवाल, पार्श्वगायिका -
संवाद कायमचा तुटला
श्रीनिवास खळे, यशवंत देव, मंगेश पाडगावकर अाणि अरुण दाते या चाैघांनी शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली यासारख्या अनेक अजरामर गाण्यांचे देणे दिले अाहे. अरुण दाते यांनी त्या काळात अाकाशवाणीच्या माध्यमातून अापली गाणी घराघरात नेऊन पाेहोचवली. अाजकाल गाणी एेकली जातात व एखाद-दाेन महिन्यांनंतर विस्मृतीत जातात. मात्र, अरुणदादांच्या बाबत असे झाले नाही. त्यांची गाणी गाजली अाणि ती अाजच्या काळातही एेकली-गायली जात अाहेत. अरुणदादांना अाता भेटता येणार नाही किंवा त्यांच्याशी संवाद साधता येणार नाही हा विचार मनाला खूप त्रास देणारा अाहे.
- रंजना जाेगळेकर, गायिका
-
उत्तम गझल गायकाला मुकलाे
अरुण दाते म्हणजे संगीतातला राजा माणूस हाेता. १९९८ मध्ये अामची पहिली भेट झाली त्या वेळी त्यांची बघितलेली प्रसन्न मुद्रा शेवटपर्यंत तशीच हाेती. एखादे गाणे त्यांना अावडले की त्याला दाद देणे हे त्यांचे वैशिष्ट्य हाेते. ‘अरे यार काय मस्त चाल केली अाहेस तू’, असे ते म्हणत. त्यांची “अरे यार’ म्हणण्याची शैली माझ्या कायम लक्षात राहील. अरुण दाते यांच्यामुळे अनेक चांगली भावगीते अापल्याला मिळाली; पण एका उत्तम गायकाला अापण मुकलाे अाहाेत.
- सलील कुलकर्णी ,गायक- संगीतकार