आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन विशेष; अडचण लघुरूपाची...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 समाज माध्यमात मराठीचा वापर करताना मला येणारी एकमेव अडचण म्हणजे मराठीत मी शॉर्ट फॉर्म वापरू शकत नाही कारण ते अद्याप रुजलेले नाहीत. उदाहणार्थ इंग्रजीत ‘Thx’  किंवा ‘Ths’ हे रुजले आहे, परंतु मराठीत ‘आभार’ यासाठी ‘आ’ हे अद्याक्षर रुजलेले नाही. त्यामुळे समाज माध्यमावर इंग्रजी वापरणाऱ्यांपेक्षा मला टाईप करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो एवढेच.
 
 प्रत्येक प्रदेशानुसार कोकणी, वैदर्भीय, कोल्हापूरी अशी मराठी भाषेची धाटणी ठरलेली असते. त्याप्रमाणेच समाज माध्यमांमधील मराठीचीही वेगळी धाटणी ठरत आहे. कोकणी, वैदर्भीय किंवा तत्सम भाषांमधील बऱ्याच वाक्यरचना किंवा शब्द हे प्रमाण मराठीच्या मापदंडात बसणारे नसतातही अनेकदा, परंतु त्यामुळे ते मराठीच नाहीत असे आपण मानत नाही किंवा त्यावर आक्षेप घेत नाही. तसेच समाज माध्यमांमधील मराठीबाबतही असावे असे माझे मत आहे. समाज माध्यम हे आधुनिक समाजाचे, नव्याने घडणारे माध्यम आहे. त्यामुळे त्याच्या नवीन परिभाषा रुजत आहेत, रुजणार आहेत. त्या अनुषंगाने मराठीतही वेगळे बदल होत जातील. भाषा वेगळ्या अर्थाने विकसित होत जाईल असा मला विश्वास वाटतो.


मी स्वत: सुरुवातीपासून समाज माध्यमांमध्ये मराठीचाच वापर करीत आलो. परंतु, त्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागले नाहीत, कारण मी मराठीतच विचार करतो, मराठीतच व्यक्त हाेताे आणि म्हणून त्याच ओघवत्या पद्धतीने समाज माध्यमांवरही मराठीचा वापर करतो. मला वाटते, ज्यांना भाषाच तोकडी पडते त्यांना शब्द अडतात किंवा अन्य भाषेतून काही शब्द उसने शब्द घ्यावे लागतात. पण याचा अर्थ त्यांची मराठीच बिघडलेली असते असे नाही तर मूळ व्यक्त होण्याची प्रक्रियाच बिघडलेली असते. मराठी शब्द सुचला नाही म्हणून किंवा सूचण्याची तसदीही न घेता समाज माध्यमांवर इंग्रजी किंवा हिंदी भाषेचा वापर करणाऱ्यांच्या इंग्रजी किंवा हिंदी या भाषा समृद्ध असतात असेही नाही. त्यांची मूळ भाषाच कमजोर असते आणि अभिव्यक्त होणे अपूर्ण. त्यामुळे कोणत्याच भाषेत ते धड बोलू शकत नाहीत. मी मराठी भाषेत जन्मलो, मराठी शाळेत शिकलो, मराठीतून चांगले अभिव्यक्त करू शकतो म्हणून समाज माध्यमांमध्येही तेवढ्याच सहजपणे मराठीचा वापर करतो. त्यासाठी मला वेगळे प्रयत्न करावे लागले नाही, लागत नाहीत. एखादा पूर्णत: नवीन शब्द किंवा संकल्पना असेल तर मात्र मला त्यासाठी मराठीतील प्रतिशब्द काय यासाठी थोडे चाचपडावे लागते. उदाहरणार्थ, क्रोनी कँपीटँलिझम. यासाठी बरेच शोधून मला मराठी प्रतिशब्द सापडलेेला नाही. कारण शेवटी या संकल्पनाही नवीन आहेत. त्यामुळे त्यांना मराठी प्रतिशब्द मिळणेही कठीण आहे. तसा अट्टाहासही धरू नये. आपण ‘चौरंगा’वर किंवा ‘पाटा’वर बसत होतो, त्यामुळे ‘टेबल’ ही संकल्पनाच मराठी जगतासाठी नवीन होती. त्यामुळे आपण ‘टेबल’ हा इंग्रजीतील शब्द तसाच स्वीकारला आणि मराठीत रुढ झाला. असे अनेक शब्दांची देवाणघेवाण होवून भाषा त्यांच्या त्यांच्या स्तरावर समृद्ध होत असतात. अन्य भाषांप्रमाणे मराठीही या प्रक्रियेतून जात असते. त्यासाठी कृत्रिम अवसायानाची किंवा अतिरेकी दुराग्रहाची, अट्टाहासाची गरज नसते. समाज माध्यमातही मी मराठीचा वापर करू लागलो तो याच ओघवतेपणातून. परंतु, माझ्यासोबतच मराठीत शिकलेल्या आणि एरवी मराठी बोलणाऱ्या मित्रांच्या ग्रुपमधील सदस्य मात्र माझ्या मराठीबद्दल दचकून असतात. मी मराठीत व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेस किंवा प्रश्नास ते इंग्रजीतून उत्तर देतात हे विशेष. शेवटी भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे. तिच्या वापराने ती बिघडत नसते. पूर्वी अभिव्यक्त होण्याची माध्यमे आणि व्यासपीठेच  म र्यादित होती. बदलत्या काळाने, शिक्षणाच्या संधीमुळे ती अधिकाधिक विकेंद्रीत होत गेली. त्यामुळे लोकांचा जेवढा सहभाग वाढतो तेवढी भाषा  आणि व्यक्त होण्याची प्रक्रिया अधिकाधिक विकेंद्रित आणि विकसित होत जाते असे मला वाटते. समाज माध्यमांच्या वापरामुळे यास गती आली. मराठीबाबत मला हे महत्त्वाचे वाटते. भाषा बिघडते यावर माझा विश्वासच नाही. ती विकसित होत आहे. उलट, जात, धर्म, भाषा या अभिमान बाळगण्याचा नाही तर अपघाताने आलेले विषय मी मानतो. एक मात्र खरे की, भाषेच्या रोजच्या वापरानुसार तिला दिशा मिळत असते. समाजात जसे व्यायाम न करणारे आळसावलेलेे लोक असतात, त्यांची शरीरे बेढब होत जातात, त्याप्रमाणेच भाषिक आळशीपणामुळे स्वत:ची भाषा बेढब करून घेतलेलेही लोक असतात. समाज माध्यमात मराठीचा वापर करताना मला येणारी एकमेव अडचण म्हणजे मराठीत मी शॉर्ट फॉर्म वापरू शकत नाही कारण ते अद्याप रुजलेले नाहीत. उदाहणार्थ इंग्रजीत ‘Thx’  किंवा ‘Ths’ हे रुजले आहे, परंतु मराठीत ‘आभार’ यासाठी ‘आ’ हे अद्याक्षर रुजलेले नाही. त्यामुळे समाज माध्यमावर इंग्रजी वापरणाऱ्यांपेक्षा मला टाईप करण्यासाठी थोडा अधिक वेळ लागतो एवढेच. 


- लाेकेश शेवडे

बातम्या आणखी आहेत...