आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन विशेष; महाराष्ट्रातील सर्व बोलीकोश ‘सांस्कृतिक’ लालफितीत कैद!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वऱ्हाड, मराठवाडा, खान्देश, कोकणातील बोलींचे कोश चार वर्षांपासून साहित्य,संस्कृती मंडळाकडे धूळखात;लाखो शब्द, हजारो वाक्प्रचार आणि म्हणींचे कोश तयार असूनही अभ्यासकांपासून दूर  


मराठी भाषेच्या संवर्धनासाठी राज्यातील अनेक विद्यापीठांनी परिसरातील बोलींचे कोश निर्माण करून महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाकडे सादर केल्यानंतरही गेल्या चार वर्षांपासून ते सांस्कृतिक खात्याच्या लालफितीत खितपत पडले आहेत. बोलीकोशांचे संशोधक आणि संबंधित विद्यापीठांच्या प्रकल्प प्रमुखांनी मंडळाकडे वारंवार विचारणा करूनही बोलीकोशांचे काय केले, याबाबत कोणतेही उत्तर अद्यापपर्यंत  त्यांना देण्यात आले नाही. एकीकडे मराठी वाचवण्याचे आवाहन केले जात असताना महाराष्ट्रातील ज्या बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली त्या बोलींचे, संशोधकांनी तीन वर्षे कित्येक जिल्हे पालथे घालून, अपार परिश्रम घेऊन लाखो शब्द, हजारो वाक्प्रचार आणि हजारो म्हणी असलेले कोश तयार केले.  ते २०१४ मध्ये साहित्य व संस्कृती मंडळाकडे सादर करण्यात आले. मात्र २०१८ उजाडले तरी हे कोश प्रकाशित करण्यात आलेले नाही.  


वऱ्हाडीचे तीन कोश तयार, पण अप्रकाशित !  
मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाचे तत्कालिन अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांच्या पुढाकाराने राज्यातील सर्व विद्यापीठ परिसरातील बोलींतील शब्द, म्हणी आणि वाक्प्रचारांचे प्रत्येकी एक असे तीन कोश तयार करण्याचे पत्र एप्रिल २०११ मध्ये मुंबई, पुणे, औरंगाबाद, जळगाव, अमरावती आणि नागपूरसह काही विद्यापीठांना पाठवण्यात आले. यापैकी नागपूर विद्यापीठाने या प्रकल्पास प्रतिसाद दिला नाही. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठासह  इतर विद्यापीठांच्या मराठी विभाग प्रमुखांनी परिसरातील बोलींचे प्रत्येकी तीन कोश २०१४ मध्ये मंडळास सादर केले. यात पश्चिम विदर्भाच्या वऱ्हाडी बोलीचे २२ हजार शब्द, १० हजार म्हणी अन् १४ हजार वाक्प्रचार असलेल्या तीन कोशांचाही समावेश आहे.   मंडळाच्या नियमानुसार संबंधित विद्यापीठातील मराठी विभाचा प्रमुख हा प्रकल्प प्रमुख होता. या विभागप्रमुखाने त्या परिसरातील निवडलेला मराठी साहित्यातील दिग्गज व्यक्ती हे मुख्य संशोधक होते. प्रत्येक विद्यापीठ परिसरातील जिल्हे, त्यातील ग्रामीण भागात फिरून लोकांशी संवाद साधून, लोकांच्या बोलीतील शब्दांना कोशात स्थान दिलेले आहे.  त्यासाठी प्रत्येक विद्यापीठाला साडेसहा ते सात लाखांचा निधी दिलेला होता. 


या विषयावर दिव्य मराठीशी बोलताना वऱ्हाडी बोली कोशांचे मुख्य संशोधक प्रख्यात साहित्यिक विठ्ठल वाघ संतप्त झाले. ते त्वेषाने उद्गारले, वाघांनी ढोर मेहनत केली, पण आता असे वाटते की ही ढोर मेहनत वाया गेली. या प्रकल्पावर मी तीन वर्षे काम केले. वऱ्हाडच्या सहा जिल्ह्यांत पायाला भिंगरी लागल्यागत मी फिरलो. गावागावातून शब्द गोळा केले. १० हजार म्हणींच्या अर्थासह २२ हजार शब्द अन् १४ हजार वाक्प्रचारांचे तीन कोश मी मंडळाला दिले. बाबा भांड यांच्याशी बोललो. ते म्हणाले, सांस्कृतिक खात्याने आता ते काम दुसऱ्या मंडळाकडे दिले आहे.


बोली कोशांचे काम विश्वकोश मंडळाकडे दिले  : बाबा भांड
राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे विद्यमान अध्यक्ष बाबा भांड म्हणाले,  बोली कोशांचे काम गेल्या अडीच वर्षांपूर्वी मराठी विश्वकाेश मंडळाकडे सोपवण्यात आलेले आहे. पवार मॅडम या मंडळाच्या प्रमुख आहेत. परंतु त्या येत्या २८ तारखेला सेवानिवृत्त होत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...