Home | Divya Marathi Special | Marathi language day special

मराठी भाषा दिन विशेष; 10 ते 25 वयोगटातील विद्यार्थ्यांचे मराठीचे ज्ञान चिंताजनक

देविदास लांजेवार | Update - Feb 27, 2018, 08:36 AM IST

अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची खंत, इंग्रजी शाळांत पहिल्या वर्गापासूनच मराठी भाषा सक

 • Marathi language day special

  अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांची खंत, इंग्रजी शाळांत पहिल्या वर्गापासूनच मराठी भाषा सक्तीची करण्याचा अाग्रह


  मराठी दैनिकांचा खप वाढत आहे. मराठी टीव्ही मालिका मोठ्या प्रमाणात बघितल्या जात आहेत. पुस्तकांचे वाचकही वाढत आहे. तथापि, ज्यांच्या खांद्यावर मराठी संवर्धनाची जबाबदारी आहे, अशा १० ते २५ वर्ष वयोगटातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची मराठी अत्यंत चिंताजनक असून त्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे अाहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांनी चिंता व्यक्त केली.


  मराठी राजभाषा दिनानिमित्त युवा वर्ग, तरुणाईचा मराठी भाषेकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, याबाबत त्यांनी दिव्य मराठीकडे वरील भावना व्यक्त केली. ते म्हणाले, मराठी अभिरुची असलेल्यांची संख्या वाढत आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट झळकत आहेत. मराठी भाषेबाबतचे एकूणच चित्र चांगले आहे. मात्र ज्या पिढीने हा वारसा पुढे न्यायचा आहे, त्या इंग्रजी माध्यमात शिकणाऱ्या १० ते २५ वर्ष वयोगटातील युवा, तरुणांची मराठी भाषा चिंताजनक आहे आणि त्यासाठी इंग्रजी शाळांच्या पहिल्या वर्गापासून दहावीपर्यंत मराठी भाषा सक्तीची करणे आवश्यक आहे.


  मुलांवर घरातच करावे वाचनाचे संस्कार : इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या मुलांवर पालकांनी घरीच मराठी बोलणे आणि वाचन करण्याबाबतचे संस्कार करायला हवेत, असे नमूद करताना ते म्हणाले, मुले वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाला शिकताना त्यांचा मराठीशी संबंध राहत नाही. मुलगा एमबीबीएसला गेला. त्याच्यावर मराठीचे ओझे कशाला, अशी भावना पालकांचीच असते. परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की साहित्य आणि कला माणसावर संस्कार करत असतात. डाॅक्टर, इंजिनीअरवर अशा संस्कारांची गरज नाही काय? असा सवाल करत नवी पिढी मराठीपासून तुटत आहे. हा धोका ओळखायला हवा. मुलांमध्ये वाचनाची आवड पालकांनी लावली पाहिजे, असा आग्रह डहाके यांनी पालकांना केला.


  बोली शब्द वापरले तर गुण कापू नयेत

  भिन्न प्रदेशातील भिन्न बोली भाषांमुळे प्रमाण भाषा समृद्ध होत असते. बोलीतील कित्येक शब्द मुख्य साहित्यिकांच्या साहित्यातून येत असतात. त्यातून प्रमाण भाषा आणखी समृद्ध होत असते. मराठी भाषा सल्लागार समितीवर असताना अकरावी व बारावीच्या अभ्यासक्रमात मी दोन-तीन बोलींचा समावेश केला होता. राज्यात सर्वत्र समान बोली नसली तरीही मिश्र बोली म्हणून घ्यावयास हरकत नाही, असे सांगताना प्रमाण भाषेचे उत्तर लिहिताना विद्यार्थ्यांनी बोलीतील शब्द वापरले तर त्याचे गुण कापू नयेत, असे आवाहन डहाके यांनी पेपर तपासनिसांना केले.


  पत्रकारांसाठी मराठीचा कोश तयार करावा
  प्रसारमाध्यमं ही समाजप्रबोधनाचे काम करत असतात. वर्तमानपत्रांवरही प्रचलित बोली-भाषांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे त्यांच्यासाठी स्वतंत्र कोश तयार करावा, असे मत डहाके यांनी व्यक्त केले.


  मराठीलाही मिळेल अभिजात भाषेचा दर्जा
  मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेल का याबाबत वसंत डहाके बरेच आशावादी आहेत. तेलगू, तामिळ आणि कन्नड या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. मराठी भाषेला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. सातवाहनांच्या कालखंडापासून मराठी भाषा प्रवाहीत होत समृद्ध झाली आहे. अभिजात दर्जासाठी आवश्यक असलेले निकष मराठी पूर्ण करत असल्याने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा नक्कीच मिळेल.


  शास्त्रांचे शिक्षण घेताना साहित्य निवडीची मुभा हवी
  विदेशात पदार्थ विज्ञानासोबतच साहित्याचा विषयसुद्धा घेता येतो, त्यामुळे तिकडे त्यांच्या साहित्याची अशी केविलवाणी अवस्था नाही. आपल्याकडे अशी सोय नाही. ती व्हायला हवी. विदेशातील धर्तीवर आपल्या देशातही इतर शास्त्र शिकताना साहित्याच्या विषय निवडीची मुभा विद्यार्थ्याला द्यायला हवी, अशी अपेक्षा वसंत अाबाजी डहाके यांनी व्यक्त केली.


  - देविदास लांजेवार, अमरावती

Trending