आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन विशेष; ‘अभिजातता’ ठरवायची कुणी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाषा प्रवाही आणि संवादी ठेवण्यात बोली भाषांचा वाटा महत्त्वाचा आहे. तेव्हा लिखित प्रमाण भाषेचे मापदंड प्रमाण भाषेच्या व्याख्येतून आपण बाद करू शकत नाही.  आज मराठीतीलही अनेक प्रादेशिक घटकांना मराठी ऐवजी इंग्रजी जवळची व सोपी वाटते ती याचमुळे.


१९७३ च्या सुमारास पुना कॉलेज या मुस्लिमबहुल शिक्षण संस्थेत अध्यापनाचे काम करीत असताना माझ्या लक्षात आले की, आपली केशवसुतांची आणि बालकवींची प्रमाणभूत मराठी भाषा आणि गावखेड्यातून आलेल्या त्या विद्यार्थ्यांची मराठी भाषा यात खूप फरक होता. भाषा ही जीवनानुभवांची अभिव्यक्ती असते. त्यानुसार त्यांच्या जगण्यात हिरवे हिरवेगार गालिचे नसल्याने, ती भाषा त्यांना समजणे आणि आपली वाटणे शक्यत नव्हते. त्याचसोबत त्यांची मराठी ही मराठी नाही असेही आपण म्हणून शकत नाही हेही मला जाणवले. तेव्हापासून मराठीच्या अभिजात दर्जाबद्दलचा विचार करताना, ‘अभिजात’ ही व्याख्या कोणी आणि कशी ठरवावी हे तपासून बघावे लागेल असे मला वाटते. 


मराठी भाषा दर कोसावर बदलते. एखाद्या भाषेच्या विकासासाठी तिचे प्रवाही असणे, तिचे संवादी असणे हा महत्त्वाचा निकष आहे. त्यानुसार प्रदेशनिहाय बदलणाऱ्या मराठीने मराठीस  खऱ्या अर्थाने जिवंत ठेवले आहे. कुठे ती खान्देशी आहे, कुठे अहिराणी, कुठे माणदेशी, कुठे ती वऱ्हाडी. मग, प्रमाण भाषा ती ‘अभिजात’ आणि या सर्व उपभाषा असे कसे मानायचे?  संस्कृतोद्भव शब्द असलेली ती ‘अभिजात’ मराठी आणि  प्रादेशिक बाज असलेली ‘बोली मराठी’ हे कोणी ठरवायचे? शिवाय दलित, आदिवासी, मराठी-गुजराती संकरातून तयार झालेली गुजर इत्यादी अठरापगड भाषांचे काय? असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतात. मराठीच्या अभिजाततेचा विचार या प्रश्नांना वगळून किंवा बाजूला सारून करता येणार नाही. सर्व मराठीजन महाराष्ट्राचेच समान पातळीवरील नागरिक आहेत. त्यामुळे मराठीच्या अभिजाततेचा विचार करताना, त्यांच्या भाषांचाही समान पातळीवरूनच विचार होणे न्याय्य आहे. 


प्रादेशिक भाषांसोबतच आता बदलत्या काळाची अशी भाषा घडत असते. ती प्रस्थापित भाषेची तोडफोड करूनच तयार होत असते. नव्या पिढीच्या या कट्ट्यावरच्या भाषेतूनच भाऊ पाध्येंची ‘राडा’ , नेमाडेंची कोसला किंवा किरण नगरकरांची सात सक्कंम या कादंबऱ्या मराठीची तोडफोड करणाऱ्या कट्ट्यावरच्या भाषांमधून लिहिल्या गेल्या आणि या साहित्यकृती जागतिक निर्मिती ठरल्या. लोकहितवादी किंवा राजवाडेंची मराठी आजच्या मराठी विद्यार्थ्यांनाही कळत नाही.  मग अभिजातपणाच्या मोजमापात आपण कट्ट्यावरच्या भाषेची दखल कशी घेणार हा आजचा कळीचा प्रश्न आहे. भाषा प्रवाही आणि संवादी ठेवण्यात या बोली भाषांचा वाटा महत्त्वाचा आहे. तेव्हा लिखित प्रमाण भाषेचे मापदंड प्रमाण भाषेच्या व्याख्येतून आपण बाद करू शकत नाही.  आज मराठीतीलही अनेक प्रादेशिक घटकांना मराठी ऐवजी इंग्रजी जवळची व सोपी वाटते ती याचमुळे. 


जगभरातील विद्यार्थ्यांना मराठी शिकवत असताना माझ्या लक्षात आले की फ्रेंच, जर्मन या अन्य युरोपीय भाषांच्या तुलनेत मराठी भाषा साधी सोपी नाही. अन्य भाषिकांना ती समजून घेेणे कठीण आहे. तेव्हा मराठी जागतिक पातळीवर पोहोचायची असेल तर तिचे सुलभीकरण गरजेचे आहे. भाषा शास्त्रज्ञ ना. गो. कालेलकर यांच्या मते प्रादेशिक संचित घेऊन येणाऱ्या, मूळ भाषेची तोडमोड करणाऱ्या भाषाच मराठीला जिवंत ठेवत आहेत. त्यांची दखल न घेता किंवा त्याचे भान न ठेवता एकाच उच्चभ्रू वर्गाच्या भाषेस प्रमाण भाषा मानून अभिजात भाषेची व्याख्या केली गेली तर ती पुन्हा मूठभरांच्याच हातात राहील.  


- प्रा. विद्युत भागवत

बातम्या आणखी आहेत...