Home | Divya Marathi Special | meghana bhuskute write about Marathi language day special

मराठी भाषा दिन विशेष; विक्रम अाणि वेताळ

मेघना भुस्कुटे | Update - Feb 27, 2018, 08:11 AM IST

प्रमाणभाषेच्या अद्ययावतीकरणाचे आणि प्रसाराचे प्रयत्न म्हणजे बोली भाषांचा अपमान आणि अव्हेर नव्हे, हे आपण कधी समजून घेणार

 • meghana bhuskute write about Marathi language day special

  प्रमाणभाषेच्या अद्ययावतीकरणाचे आणि प्रसाराचे प्रयत्न म्हणजे बोली भाषांचा अपमान आणि अव्हेर नव्हे, हे आपण कधी समजून घेणार आहोत? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, की मग हे सगळे प्रश्न आपोआप विरून जाणार आहेत आणि ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ मराठी आपोआप जगावर राज्य करणार आहे, असा तर आपला गोड गैरसमज नाही ना?


  ‘फेसबुक - व्हॉट्सॅप - ब्लॉग आणि मराठी संकेतस्थळं अशा समस्त ठिकाणी देवनागरी अक्षरांचा कल्लोळ उसळलेला पाहून मायबोली मऱ्हाठीचं सगळं काही सुरळीत-यथास्थित चाललेलं असणार असं कुणालाही वाटेल. भाषेचं तथाकथित लोकशाहीकरण झालेलं बघून काही जणांचा आनंद गगनात मावत नसेल. कुणाच्या तीर्थरूपांनाही न जुमानता वाट्टेल ते वाट्टेल तेवढं खरडता नि बिनबोभाट छापता आल्यामुळे कुणी सातव्या अस्मानात विहरत असेल. पुस्तका-अंकांच्या नि वर्तमानपत्रांच्या पीडीएफ फायली इंटरनेटवर चढवून ‘झालं बॉ एकदाचं डिजिटलाझेशन!’ म्हणून कुणी नुकतंच हुश्श करत असेल... एकुणात अवघा आनंदीआनंद उसळलेला असेल... अशा आनंदात प्रश्नरूपी मिठाचा खडा टाकणं जिवावर येतं आहे खरं. पण थोडी झाडाझडती आवश्यक आहे.


  अशी प्रस्तावना करत मराठी भाषा दिनाच्या आदल्या रात्री वेताळ राजा विक्रमादित्याला आपली नवी कहाणी सांगता झाला - ‘आपण मोठमोठ्या भाषिक वादांकडे तूर्तास वळणं टाळू. मराठी प्रमाणलेखनाचे नियम अद्ययावत आहेत की नाहीत, ते संस्कृतनुसार असावेत की नसावेत, मुळात असले काही नियम असावेत की तो निव्वळ बामणी कावा आहे, मराठीत इंग्रजीची घुसखोरी होते आहे की नाही, असल्यास त्यावर भाषाशुद्धी हा उपाय आहे की भाषेनं कूस बदलणं हा उपाय आहे... इत्यादी वाद जाणकारांसाठी सोडून देऊ आणि मूलभूत गोष्टींकडे वळू.


  मराठीची वर्णमाला आज किती जणांना माहीत असते? उच्चारानुसारी वर्णांची शास्त्रशुद्ध मांडणी असलेली आपली वर्णमाला (अ-आ-इ-ई-उ-ऊ-ऋ-लृ-ए-अ‍ॅ-ऐ-ओ-ऑ-औ, अं-अः, क-ख-ग-घ-ङ, च-छ-ज-झ-ञ, ट-ठ-ड-ढ-ण, त-थ-द-ध-न, प-फ-ब-भ-म, य-र-ल-व-श, ष-स-ह-ळ, क्ष-ज्ञ) आणि त्यानुसार वाचता येणारे अकारविल्हे आपण अंकलिपीत तरी शिकलेले असतो का? त्यातल्या अनुनासिकांचा नक्की कसा नि कधी वापर करायचा असतो, असा प्रश्न आपल्याला कधी पडतो का? या वर्णमालेत शासनानं वेळोवेळी घातलेली भर आणि केलेले बदल आपल्यापर्यंत पोचतात का? मग त्यानुसार कोश पाहता येणं लांबच राहिलं. मुदलात आपले किती कोश काळानुरूप अद्ययावत आहेत आणि ते इंटरनेटवर शब्दाचा सहजी शोध घेता येतील अशा स्वरूपात चढवलेले आहेत? समजा, असलेच; तर त्यांत शासकीय प्रमाणलेखनाचे नियम पाळलेले दिसतात का? सामान्यरूप या मराठीच्या खास वैशिष्ट्यामध्ये र्‍हस्वदीर्घात होणारे बदल दाखवणारे किती कोश आपल्याला माहीत आहेत आणि जर ते नसतील, तर आपण प्रमाणलेखन कुठे नि कसं तपासणार आहोत? बरं, हेही जाऊ द्या. ‘शब्दाला जोडून लिहिलं जाणारं ते शब्द-योगी अव्यय’ अशा साध्यासरळ, समजायला सोप्या असलेल्या शब्दयोगी अव्ययाचा आपल्याला काही पत्ता असतो का? ‘सुद्धा’, ‘मुळे’, ‘साठी’, ‘ऐवजी’, ‘पासून’, ‘पर्यंत’, ‘कडे’, ‘देखील’, ‘प्रमाणे’, ‘च’ या शुद्ध शब्दयोगी अव्ययांचा वापर आपण युगानुयुगे करत आलो आहोत आणि ती शब्दाला जोडूनच लिहीत आलो आहोत, हे आपण का विसरतो आहोत? ‘माझ्या मुळे’, ‘तुझ्या साठी’ अशी भयंकर तोडमोड तर आपण करायला लागलोच आहोत; शिवाय विभक्तिप्रत्ययासारखी शब्दाला जन्मोजन्मी चिकटून असलेली गोष्टही हिंदीच्या प्रभावातून शब्दापासून खुडत चाललो आहोत आणि ‘करीना ने तैमूर ला जन्म दिल्या मुळे टीव्ही वाहिन्यां ची भलती च चंगळ झाली’ या वाक्यात आपल्याला काही म्हणता काही खटकत नाही यात काळजी करण्यासारखं काहीच नाही का? देवनागरी लिपीबद्दल आपल्याला काय माहिती असते? त्यात जोडाक्षरं लिहिता येण्याच्या तीन निरनिराळ्या (उभी जोडणी, आडवी जोडणी, पाय मोडून जोडाक्षर दर्शवणे) पद्धतींमुळे देवनागरी लिपीमध्ये अनेक वैविध्यपूर्ण मनोरम अक्षरं तयार होत गेली आहेत, ती आपल्याला ठाऊक असतात का? क्ष आणि ज्ञ ही अशीच जोडाक्षरं आहेत हे आपल्याला कुणी कधी शिकवतं का? वर्णमालेतली अनुनासिकं (ङ, ञ, न, म) वापरून अनुस्वारयुक्त शब्द जोडाक्षरांसह लिहायला (कंकण : कङ्कण) आपण कोणत्याही यत्तेत का शिकत नाही? श आणि ल लिहिण्याच्या काही पद्धती शासनानं वर्णमाला धोरणानुसार मान्य केल्या आहेत, हे आपल्या गावी तरी असतं का? श आणि र या अक्षरांचा जोडाक्षरात वापर करताना त्यांच्या स्वरूपात किती प्रकारे बदल होऊ शकतो हे कोणत्याही पाठ्यपुस्तकात कधीच का नसतं? इंग्रजी पीडीएफ फायली एका क्लिकसरशी वर्ड किंवा इतर प्रकारांत बदलून घेता येतात.


  स्कॅन केलेल्या अशा फायलींचंही संपादन सुलभ प्रकारांत रूपांतरित हाेतं. त्यांतल्या मजकुराचं यांत्रिक वाचन करून ते ऐकता येतं. मराठीत या सोयी करण्यासाठी नक्की काय करावं लागेल याचा विचार तरी कुणी करतं आहे का? जर करत असेल, तर त्या कामाला नक्की किती वर्षं लागणार आहेत आणि या उशिरावर काय उपाय करता येईल, असे प्रश्न आपण कधी विचारतो का? सगळ्या प्रकारच्या देवनागरी कळपाटांवर सगळ्या प्रकारची मराठी जोडाक्षरं लिहिण्याचा पर्याय का दिला जात नाही?


  प्रमाणभाषेच्या अद्ययावतीकरणाचे आणि प्रसाराचे प्रयत्न म्हणजे बोली भाषांचा अपमान आणि अव्हेर नव्हे, हे आपण कधी समजून घेणार आहोत? साहित्य आणि भाषा या दोन निरनिराळ्या गोष्टी असून एका प्रांतातली जाणकारी हा दुसऱ्याा प्रांतात दादागिरी करण्याचा परवाना नाही, हे आपल्याला कळायचं नक्की कोणत्या साली बंद झालं आहे? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, की मग हे सगळे प्रश्न आपोआप विरून जाणार आहेत आणि ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ मराठी आपोआप जगावर राज्य करणार आहे, असा तर आपला गोड गैरसमज नाही ना? असो. प्रश्न अनंत भासले, तरी ती एकाच मूलभूत प्रश्नाची रूपं आहेत हे तू जाणतोस. या प्रश्नाचं उत्तर तुला माहीत असूनही जर तू मौन बाळगलंस, तर तुझ्या मस्तकाची शंभर शकलं होतील...” या प्रश्नांची उत्तरं जाणणाऱ्या राजा विक्रमादित्याची मोठी पंचाईत झालेली आहे. तुम्ही कुणी त्याला मदत करू इच्छिता काय?


  - मेघना भुस्कुटे

Trending