आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी भाषा दिन विशेष; ‘अभिजातता समजून घेण्याची गरज’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुळातच अभिजात म्हणजे काय? मग त्यापुढे जाऊ न मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळणे म्हणजे काय? ताे मिळाल्यावर भाषेत काही फरक पडणार अाहे का? हा दर्जा काेण देणार? हा दर्जा ठरविण्याचे निकष काय? असे अनेक प्रश्न ‘अभिजात मराठी’च्या संदर्भात निर्माण हाेतात. खरंच मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्याची गरज अाहे का? इथपासून ते ती अभिजात झालीच तर काय हाेईल अाणि मराठी भाषा दिन साजरा करण्याची गरज पडेल की नाही इथपर्यंत मग हा अभिजाततेचा विषय जाताे. अाजच्या मराठी दिनानिमित्त दाेन भाषातज्ज्ञांचे या विषयावर साधे-साेपे भाष्य...


मराठीचा स्वच्छंद अधिक फुलला तर बरे 
जागतिकीकरण ही प्राय:बाजाराशी जोडलेली संकल्पना आहे.महाराष्ट्रात बाजाराची भाषा मराठी असेल तर अभिजात दर्जापेक्षा ती मोठी गोष्ट होईल. मात्र, त्यासाठी मराठी माणूस बाजाराच्या केंद्रस्थानी यावा लागेल.

मराठीला अभिजात दर्जा दिला तर आणखी दोन डझन भाषांना तो द्यावा लागेल असे कारण देत केंद्रीय गृहमंत्र्यांनी हा प्रस्ताव बासनात ढकलल्याची  चर्चा यंदाच्या मराठी दिनाच्या पूर्वसंध्येला सुरू झाली आहे. या विषयावर आजवर बरीच चर्चा झाली आहे.सांस्कृतिक पटलावर आपली नावनोंदणी व्हावी म्हणून काही चळवळे अशा फांद्यांना लटकून झोके घेत-देत असतात त्यातला हा एक झोका. मराठी अभिजात झाली तर  राज्याला ५०० कोटी मिळतील. त्यातून एक-दोन अध्यासने, पुरस्कार जन्माला येऊन मराठीचे गोमटे होईल म्हणतात. हा दर्जाचा विषय अस्मिताजन्य आणि मिळणे न मिळणे राजकीय निर्णय असेल.उद्या ती समीकरणे बदलून तमिळ, संस्कृत, कन्नड, मल्याळमप्रमाणे मराठी अभिजात झाल्याने बिघडणार तर काही नाही. पण भाषेच्या लालनपालनासाठी काही घडेल का? काय घडायला हवे? ते कोण घडवील? याचा थोडा विचार, निदान व्यवहार भाषेपुरता आज व्हायला हरकत नाही. 


 सेनापती बापट म्हणायचे ‘मराठी असे आमुची मायबोली परंतु ती राजभाषा नसे.’ महाराष्ट्र जन्मल्यावर ती राजभाषा झाली आता सांप्रतकाळी ‘मराठी असे आमुची राजभाषा परंतु ती लोकभाषा नसे’ असे म्हणण्याची वेळ आली असेल तर अभिजातता ज्याच्या बळावर मागायची (लोकभाषा म्हणून प्राचीनत्व ) तेच आपण गमावतो आहोत का? हे पाहायला हवे. खुद्द तात्यासाहेब शिरवाडकर यांनी ही भीती जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून व्यक्त केली आहे.मराठीवरील संकट शब्दकोशावरील संकट नसून लोकभाषेवरील संकट आहे असे तात्यासाहेब म्हणाले होते. वृत्तपत्रांच्या मथळ्यात जाऊन बसण्यासाठी ते असे बोलण्याचा प्रश्नच उद‌्भवत नाही. तात्यांना हे संकट जाणवले. या मुद्याचाही बराच खल झाला आहे. अभिजाततेचा दर्जा मिळण्याबरोबर किंवा त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे हे की, ही भाषा मराठी म्हणून लोकभाषा राहिली पाहिजे. मराठीचा लोकभाषा म्हणून व्यवहार वाढवण्यात वृत्तपत्रांचा मोलाचा वाटा आहे. मार्क्सबाबाचे तत्त्वज्ञान मराठी पत्रकारांनी रयतेला सोप्या शब्दात सांगितले. पां. वा. गाडगीळ यांच्यासारख्यांनी जे केले ते अर्थशास्त्राच्या शिक्षकांनी अपवाद वगळता केलेले नाही. मराठीतून क्रिकेटचे समालोचन केले गेले. ८० च्या दशकात शेअर बाजाराची परिभाषा मराठीत आणण्याचे प्रयत्न झाले. त्यावेळी अनेक जाहिरातींचा मसुदा मराठीतून लिहिला जायचा. या सगळ्यावर जागतिकीकरणाच्या काळात बोळा फिरवला गेला. गेल्या दोन-अडीच दशकांत इंग्रजी शाळांनी मराठीला मागे ढकलले. शहरी बूट पाटलोणी, कंठ लंगोट्या घालणाऱ्यांनी नव्हे तर गावाकडच्या धोतर, टोपीवाल्या  नेताजींनी, कारखान्याच्या अध्यक्षांनी या शाळा आणल्या. इंग्रजी जागतिक व्यवहार भाषा म्हणून यायला हवी पण त्यासाठी सर्व शिक्षण  त्या माध्यमातून करण्याची गरज होती का?आज त्याचे परिणाम दिसू लागले आणि माध्यमे दावा करू लागली की तरुण वर्ग आमचा ग्राहक असेल तर आम्हाला त्यांचीच इंग्रजी मिश्रित भाषा वापरावी लागेल.दूरचित्रवाणीने तर पार्टीसिपेट, अवॉर्ड, फंक्शन,असा भडीमार करून मराठीचा लहेजा बिघडवून टाकला. हे रोखता आले असते.अपवाद वगळता मराठी वृत्तवाहिन्यांचे मराठी भयावह नव्हे तर रक्तदाब वाढवणारे असते.हा जो अपघात झाला,त्यात जे जखमी झाले,त्यांच्यावर जे उपचार,जे डॉक्टर करत आहेत हे मराठीला जोजवणे कुठून आले? (राजकारण्यांचा इतका प्रभाव? ) अमराठी नेता, नट मराठीत बोलला की आपला उर भरून येतो.अभिजात दर्जा मिळाल्यावर हे बंद होईल?राधिकाचे रॅड, दमयंतीचे डॅम  अशी रूपे भाषेचा मूळ स्वभाव पाहता स्वीकारावी लागतील.प्रश्न आहेत तो त्या भाषेमागील संस्कृतीचा.त्यामुळे एखाद्या गावाकडच्या सत्तरी ओलांडलेल्या आजी-आजोबांचे मराठी आणि माध्यमांनी ताबा मिळवलेल्या आयाबायांचे मराठी यात फरक दिसतो. या विषयांचा मूलभूत अभ्यास यूजीसीचे प्रकल्प मिळवणाऱ्या कितीजणांनी केला? अभिजन मराठीचे शत्रू आणि बहुजन मित्र अशी मांडणी सोपी म्हणून दुर्लक्षिली जाणे घातक ठरेल.गावाकडचे लोकच मराठी लोकभाषा म्हणून जागवत आहेत हे खरेच आहे. त्यांनाही अभिजन व्हायचेय. त्या संक्रमणात भाषेचा गळा कापला जातो का हे पहायला हवे. मराठी अभिजात जाहीर होण्यापेक्षा तिच्यातला स्वच्छंद अधिक फुलला तर भाषा म्हणून ती सळसळेल आणि तिच्या नावे दिन वगैरे साजरे करण्याची गरज उरणार नाही.
 

- प्रा. अनंत येवलेकर 

बातम्या आणखी आहेत...