आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंब नियाेजनाचा भार महिलांवरच का?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांच्या पलीकडे महिलांसाठी सुरक्षित व दर्जेदार कुटुंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता होण्याची गरज आहे. पुरुषांची साधने, पुरुषांच्या शस्त्रक्रिया आणि पुरुषांची यातील भूमिका याबाबतची जबाबदारी पुरुषांनी स्वीकारणे गरजेचे आहे. 


प्रत्येक वर्षी जागतिक महिला दिनानिमित्ताने महिलांची समता आणि समान न्याय याची चर्चा होते. हा दिवस साजरा करणाऱ्या प्रत्येक महिलेला वाटते, आता तरी महिलांना समान दर्जा मिळाला आहे, पुरुष बरोबरीची वागणूूक देतात. आतापर्यंत महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण या प्रवासात अनेकांनी अनेक परिवर्तने पाहिली. परंतु थोडे खोलवर शिरले की, लक्षात येते अजूनही काही क्षेत्र अशी आहेत जिथे स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळालेले नाही. हे क्षेत्र म्हणजे कोणतेही दूरवरचे लांब पल्ल्याचे नाही, तर तुमच्या-माझ्या सर्वांच्या शरीराशी निगडित असलेले, अनेक राष्ट्रीय चर्चांचा आणि राजकारणाचा विषय ठरलेले - अर्थात कुटुंब नियोजनाचे. आज २०१८ सालात आपण उभे असताना, आजही भारतात दर १२ व्या मिनिटास गर्भधारणा किंवा प्रसूतीदरम्यान झालेल्या गुंतागुंतीमुळे एका महिलेचा मृत्यू होतो ही भयावह आकडेवारी कोणत्या समानतेचे लक्षण आहे? आजही महाराष्ट्रात कुटुंब नियोजनाचे साधन म्हणून निराेधकांचा फक्त ७% वापर होतो ही टक्केवारी काय सांगते? किती महिलांना कुटुंब नियोजनाच्या साधनांची माहिती आहे आणि किती पुरुष कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्वत:कडे घेतात?  या प्रश्नांची उत्तरे स्वत:पुरती शोधत, महिला दिनाच्या अनुषंगाने महिलांचा त्यांच्या शरीरावरील, त्यांच्या लैंगिकतेवरील हक्क आपण मान्य केला, समजून घेतला तरच आपण स्वत:ला माणूस म्हणवून घेण्यास पात्र ठरू. 


आज आपण माहितीच्या महाजालात वावरतो. गर्भनिरोधकांचा वापर करणाऱ्यांचे प्रमाण किती आहे या प्रश्नाच्या उत्तरादाखल मात्र सगळ्यांची बोलती बंद होईल. एकट्या महाराष्ट्रात गर्भनिरोधकांचा वापर फक्त ७ % टक्के आहे. संपूर्ण भारताचा विचार करता हे प्रमाण किती नगण्य असेल याची मला कल्पनाही करवत नाही. गर्भनियोजनाची साधने हा आजच्या काळात लपवून ठेवण्याचा किंवा दबक्या आवाजात कुजबुजण्याचा विषय राहिलेला नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरातील दिवाणखान्यातील टीव्हीच्या लार्ज स्क्रीनवर गर्भनिरोधकांच्या जाहिराती झळकत असतात. परंतु, आपल्यापैकी किती स्त्री-पुरुष या साधनांबद्दल, त्यांच्या वापरामुळे स्त्रियांच्या शरीरात होणाऱ्या परिणामाबद्दल खुलेपणाने चर्चा करतात? जर गर्भनिरोधकांचा वापर फक्त ७ टक्के आहे, तर उर्वरित ९३% भार हा स्त्रीच्याच शरीरावर लादण्यात येत असल्याचे सिद्ध होते. हाच मूलभूत मुद्दा आहे. स्त्रियांचा त्यांच्या शरीरावर हक्क आहे आणि त्यांच्या शरीराबाबतचे निर्णय घेण्याचा अधिकार तिचा आहे हे जोपर्यंत आपण स्वीकारत नाही, तोपर्यंत लैंगिक आरोग्य आणि कुटुंब नियोजन याबाबत आपण काहीही सुधारणा करू शकणार नाही. आजही भारतीय स्त्री कुटुंब नियोजनाबाबत खुलेपणाने बोलू शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. तिचे म्हणणे मांडू शकत नाही. तिने मांडले तरी ते ऐकून घेतले जाईल याची शाश्वती नाही. गर्भनिरोधक किंवा कुटुंब नियोजन ही स्त्रीचीच जबाबदारी आहे हे गृहीतक आपण सर्वांनी मान्य केले आहे, घराघरातील प्रत्येक स्त्रीला याबाबत गृहीत धरले आहे, आणि महिलांनीही ही आपलीच जबाबदारी समजत स्वत:च्या शरीराला आणि आरोग्याला गृहीत धरले आहे. हे अजून किती वर्षं चालणार आहे? 

 
एकीकडे सुरक्षित गर्भनिरोधकांची उपलब्धता नाही आणि दुसरीकडे खोलवर रुजलेल्या सांस्कृतिक रूढी, रीतिरिवाज यामुळे स्त्रियांचे लैंगिक जीवन, गर्भधारणा, प्रसूती, कुटुंब नियोजन आणि गर्भनिरोधक साधने-त्यांची सुरक्षितता, त्यांची पसंती, त्यांचा परिणाम याबाबत खुलेपणाने आणि प्राधान्याने चर्चा होत नाही तोपर्यंत भारतीय स्त्री समान आहे असे म्हणता येणार नाही.  उलटपक्षी, अन्य कौटुंबिक जबाबदाऱ्यांप्रमाणे कुटुंब नियोजन हीदेखील स्त्रीचीच जबाबदारी समजण्याचा रिवाज आपल्याकडे तयार झाला आहे. एका अर्थाने हा रिवाज तिच्यावर लादलाच जात आहे. किमान स्वत:ला आधुनिक म्हणवून घेणाऱ्या नवीन पिढीतील पुरुषांनी तरी कुटुंब नियोजनाची जबाबदारी स्वत:कडे घेण्याची गरज आहे. तेव्हाच पुरुषांनी वापरण्याच्या गर्भनियोजनाच्या साधनांची संख्या वाढेल, त्यावरील संशोधनाची व्याप्ती वाढेल.  


कुटुंब नियोजनाचे साधन म्हणून भारतात प्रचलित दुसरी पद्धत म्हणजे कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया. याबाबत तर अधिकच भयानक परिस्थिती आहे. कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया म्हटले की भारतात पहिले चित्र डोळ्यासमोर उभे राहते ते स्त्रियांच्या शस्त्रक्रियेचेच. कुटुंबांच्या पातळीवर या शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला जात असेल तर तेथेही स्त्रीचीच शस्त्रक्रिया हा एकमेव पर्याय असल्यागत सारे व्यवहार केले जातात. पुरुषांच्या शस्त्रक्रियेचाही पर्याय आहे आणि स्त्रियांच्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेपेक्षा पुरुषांची शस्त्रक्रिया अधिक सोपी आहे हे अनेकांना माहीतही नाही. भारतातील १५ ते २९ या वयोगटातील सुमारे ३६% स्त्रियांनी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया केली; तर पुरुषांच्या शस्त्रक्रियेचे प्रमाण ०.३ % एवढे नगण्य आहे.  महाराष्ट्रात हे प्रमाण महिलांच्या शस्त्रक्रियांसाठी ५१ % तर पुरुषांच्या शस्त्रक्रियेसाठी ०.४ % एवढे नगण्य आहे.  


कुटुंब नियोजनाची साधने आणि कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांबाबत भारतीय महिलांवर किती अतिरिक्त भार टाकण्यात आला आहे, हे या आकडेवारीतून सिद्ध होते. यातूनच नको असलेल्या गर्भधारणा आणि असुरक्षित किंवा धोकादायक गर्भपात या जाळ्यात महिला अडकल्या जातात. असे धोकादायक गर्भपात करताना आजही आपल्या देशात, आपल्या राज्यात अनेक महिला जिवानिशी जातात किंवा कुपोषित अथवा व्यंग असलेल्या बालकांना जन्म देेतात. सुरक्षित लैंगिक संंबंधांच्या माहिती अभावी अनेक महिला एचआयव्ही-एड्ससारख्या संसर्गाच्या बळी ठरतात.  


प्रत्येक महिलेला सुरक्षित आणि दर्जेदार कुटुंब नियोजनाचे साधन उपलब्ध व्हायला हवे, ते तिच्या हिताच्या आणि स्वायत्ततेच्या दृष्टीने गरजेचे आहे. तेव्हाच सामाजिक आरोग्य आणि राष्ट्रीय विकास यास हातभार लागू शकतो. संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाअंतर्गत मानवी विकास अहवाल २०१६ नुसार लैंगिक असमानतेबाबत १८८ देशांमध्ये भारताचा १३१ वा क्रमांक लागतो. हे निश्चितच आधुनिक आणि विकसित भारतासाठी अभिमानास्पद नाही. परिस्थिती बिकट आहे, परंतु अशक्य नाही. थोडेसे प्रयत्न आणि चिकाटी यामुळे आपण बदल घडवू शकतो. कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियांच्या पलीकडे महिलांसाठी सुरक्षित व दर्जेदार कुटुंब नियोजनाच्या साधनांची उपलब्धता होण्याची गरज आहे. पुरुषांची साधने, पुरुषांच्या शस्त्रक्रिया आणि पुरुषांची यातील भूमिका याबाबतची जबाबदारी पुरुषांनी स्वीकारणे गरजेचे आहे. आजही खेड्यापाड्यात पुरेशी व सुरक्षित कुटुंब नियोजनाची साधने उपलब्ध होत नाहीत.  त्यामुळे महिलांच्या आरोग्याशी खेळ खेळला जातो. त्यासाठी सुरक्षित गर्भनिरोधकांची वितरण साखळी मजबूत  होण्याची गरज आहे. गर्भनिरोधक आणि कुटुंब नियोजन याच्या यथायोग्य निर्णयांसाठी समुपदेशन, उचित मार्गदर्शन आणि सुरक्षित व खात्रीशीर साधनांची उपलब्धता हे कळीचे मुद्दे आहेत. हे झाले सरकारी धोरणांच्याबाबत. सोबतच प्रत्येक कुटुंब पातळीवरही कुटुंब नियोजन किंंवा गर्भनिरोधक ही फक्त स्त्रियांचीच जबाबदारी समजून, त्याचाही भार त्यांच्यावरच टाकण्याऐवजी पुरुषांनी स्वत:हून, संवादातून व चर्चेतून यातील आपला वाटा उचलणे ही काळाची गरज आहे.


- आजही भारतीय स्त्री कुटुंब नियोजनाबाबत खुलेपणाने बोलू शकत नाही, ही अत्यंत दुर्दैवी वस्तुस्थिती आहे. तिचे म्हणणे मांडू शकत नाही. तिने मांडले तरी ते ऐकून घेतले जाईल याची शाश्वती नाही. कुटुंब नियोजन ही स्त्रीचीच जबाबदारी आहे हे गृहीतक आपण सर्वांनी मान्य केले आहे, घराघरातील प्रत्येक स्त्रीला याबाबत गृहीत धरले जाते, आणि महिलांनीही ही आपलीच जबाबदारी समजत स्वत:च्या शरीराला आणि आरोग्याला गृहीत धरले आहे. हे अजून किती वर्षं चालणार आहे? 


- सई ताम्हणकर, अभिनेत्री 

बातम्या आणखी आहेत...