Home | Divya Marathi Special | Sudha Karmarkar: The Chairman of the Balatattya Movement

सुधा करमरकर : बालनाट्य चळवळीच्या अध्वर्यू

दिव्‍य मराठी | Update - Feb 06, 2018, 06:33 AM IST

मराठी बालरंगभूमीची चळवळ स्थापन करणाऱ्या अाणि प्रत्यक्षात या रंगभूमीसाठी अविरत झटणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांच

 • Sudha Karmarkar: The Chairman of the Balatattya Movement

  मराठी बालरंगभूमीची चळवळ स्थापन करणाऱ्या अाणि प्रत्यक्षात या रंगभूमीसाठी अविरत झटणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी सुधा करमरकर यांचे साेमवारी पहाटे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. अभिनेता, दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या त्या सख्ख्या मावशी होत्या. बालरंगभूमीसाठी थेट अमेरिकेत जाऊन अभ्यास करणाऱ्या सुधाताईंना नाटकाचे बाळकडू घरातूनच मिळाले हाेते. वडील तात्या अामाेणकर हे गिरगावातील साहित्य संघाशी निगडित हाेते. वयाच्या १८ व्या वर्षीच त्या भरतनाट्यममध्ये परंगत झाल्या. त्यानंतर मो. ग. रांगणेकरांच्या ‘रंभा’ या पुनर्जन्मावर आधारित नव्या नाटकात त्यांना नृत्यकुशल नायिकेची म्हणजे रंभेचीच भूमिका मिळाली आणि ती भूमिका गाजली. नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधा करमरकर परदेशात गेल्या. त्यांनी अमेरिकेत जाऊन ‘बालरंगभूमी’ या संकल्पनेचा अभ्यास केला. साहित्य संघाच्या सहकार्याने ‘बालरंगभूमी-लिट्ल थिएटर’ सुरू केलं. त्याचप्रमाणे आविष्कार, छबिलदास चळवळीतही अग्रस्थानी होत्या. दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे, दिग्दर्शक-अभिनेते विजय केंकरे यांच्यासोबत त्यांनी रंगभूमीची सेवा केली.

  अल्पपरिचय

  - सुधा करमरकर यांचं घराणं मूळ गोव्याचं असलं तरी त्यांचा जन्म मुंबईत १८ मे १९३४ राेजी झाला.
  - सुधाताईंनी मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमधून पदवी घेतली.
  - त्यानंतर दामू केंकरे यांनी त्यांना मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये दाखल करून घेतले. त्या वेळी भारतीय विद्याभवनच्या आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धेत दामू केंकरे दिग्दर्शित ‘उद्याचा संसार’ हे नाटक सादर केले गेले. त्या स्पर्धेत सर्व नाटकांमधून निवड होऊन सर्वोत्कृष्ट अभिनयाचे पारितोषिक मिळाले.
  - पार्श्वनाथ अाळतेकरांच्या कला अकादमीमध्ये नाट्य शिक्षण
  - पर्वतीकुमार यांच्याकडे भरतनाट्यमचे धडे, वयाच्या १८ व्या वर्षीच त्या पारंगत झाल्या.
  - नाटकाचे अधिक शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत गेल्या. तेथे त्यांनी बालरंगभूमीचाच अभ्यास अधिक केला.
  - त्यांनी २ अाॅग्सट १९९५९ राेजी बालनाट्याला वाहिलेली वेगळी नाट्य संस्था ‘लिट्ल थिएटर- बालरंगभूमी’ची स्थापना केली.
  - साहित्य संघात नटवर्य केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दत्ताराम, दुर्गाबाई खोटे अशा नाट्यक्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन
  - रंगभूमीवर सुधा करमरकरांनी अनेक नाटकांतून भूमिका केल्या.
  गाजलेली नाटके
  - अनुराधा (विकत घेतला न्याय)
  - उमा (थँक यू मिस्टर ग्लॅड)
  - ऊर्मिला (पुत्रकामेष्टी)
  - कुंती (तो राजहंस एक)
  - गीता (तुझे आहे तुजपाशी)
  - चेटकीण (बालनाट्य-मधुमंजिरी)
  - जाई (कालचक्र)
  - दादी (पहेला प्यार-हिंदी दूरदर्शन मालिका)
  - दुर्गाकाकू (भाऊबंदकी?)
  - दुर्गी (दुर्गी)
  - धनवंती (बेइमान)
  - बाईसाहेब (बाईसाहेब)
  - मधुराणी (आनंद)
  - मामी (माझा खेळ मांडू दे)
  - यशोधरा (मला काही सांगायचंय)
  - येसूबाई (रायगडाला जेव्हा जाग येते)
  - रंभा (रंभा)
  - राणी लक्ष्मीबाई (वीज म्हणाली धरतीला)
  - सुमित्रा (अश्रूंची झाली फुले)
  दिग्दर्शित केलेली बालनाट्ये:
  - चिनी बदाम {कळलाव्या कांद्याची कहाणी (नाटककार रत्नाकर मतकरी)
  - मधुमंजिरी (नाटककार रत्नाकर मतकरी)
  - हं हं आणि हं हं हं (नाटककार दिनकर देशपांडे)
  - गणपती बाप्पा मोरया
  - अल्लाउद्दीन आणि जादूचा दिवा
  - जादूचा वेल (नाटककार सुधा करमरकर)
  - अलीबाबा आणि चाळीस चोर
  - आनंद {काही वर्षे हरवली आहेत { मंदारमाला
  लेखन : ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘वळलं तर सूत’ या दाेन नाटकांसह, ‘कन्याकुमारीची कथा’ अाणि ‘गणपतीची हुशारी’ ही पुस्तके त्यांनी लिहिली अाहेत.
  पुरस्कार : सुधाताईंना अनेक पुरस्कार मिळाले त्यातील झी दूरचित्रवाणीने ३ मार्च २०१२ला दिलेला जीवनगौरव पुरस्कार अाणि महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने २१ फेब्रुवारी २०१३ राेजी देण्यात अालेला नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार हे विशेेष उल्लेखनीय.
  पहिलं बालनाट्य ‘मधुमंजिरी’

  सुधाताईंनी साहित्य संघातूनच ‘मधुमंजिरी’ हे मराठी रंगभूमीवरील पहिलं बालनाट्य सादर केलं. रत्नाकर मतकरी यांनी हे नाटक लिहिलं होतं. सुधा करमरकर या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती. १९५९ मध्ये रंगमंचावर आलेल्या या पहिल्या बालनाट्याने रंगभूमीवरील एका नव्या प्रवाहाची सुरुवात झाली.

  ‘दिव्य मराठी’ लिट फेस्टमध्ये सुधाताईंच्या बालनाट्य चळवळीवर प्रकाश

  दिव्य मराठीतर्फे ३ ते ५ नाेव्हेंबर २०१८ राेजी नाशिकमध्ये लिटरेचर फेस्टिव्हल झाले. त्याचा समाराेप ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्या मुलाखतीने झाला. या मुलाखतीत बालरंगभूमीविषयी बाेलताना मतकरी यांनी सुधा करमरकर यांच्या नाट्यचळवळीवर विशेष भाष्य केले. कारण सुधाताईंच्या नाट्य चळवळीतील पहिले नाटक लिहिले ते मतकरी यांनीच. ते म्हणाले, ‘बालनाट्य हे रंगभूमीवरचं एक वेगळं दालन अाहे. रंगभूमीवरचं नाटक तुम्हाला किती प्रकारे सादर करता येतं अाणि ते किती प्रकारे लाेकांपर्यंत पाेहाेचतं हे समजून घेण्याच्या प्रयत्नातून बालरंगभूमी घडली. माझ्याबाबतीत एक याेगायाेग असा झाला की, म्हणजे मला अायुष्यात काेणीतरी स्वत: विचारलं किंवा पाठिंबा दिला असं एकमेव नाव म्हणजे सुधा करमरकर. मी तेव्हा एल्फिन्स्टन काॅलेजमधून ग्रॅज्युएट झालाे हाेताे. सुधा माझ्या एक- दाेन वर्षे पुढे हाेती. तिने माझ्या काही श्रुतिकांमध्ये काम केलं हाेतं. विशेषत: मला एक अाठवते कहाणी नावाची श्रुतिका. ती अमेरिकेला जाऊन त्या प्रांतातील मुलांचं थिएटर बघून अाली हाेती अाणि तिला नव्याने या विचाराचं काेणीतरी लिहिणारं हवं हाेतं की, अडीच-तीन तासांचं मुलांसाठीच पूर्ण नाटक. चांगले नट घेऊन केलेलं नेपथ्य, संगीत सगळं माेठ्यांच्या नाटकात जसं असतं तसं. असं मुलांचं नाटक करायला माणूस काेण असेल तर मी. म्हणून ती त्या वेळेला माझ्याकडे अाली. तिने अचानकपणे मला निराेप पाठवला की, मी काॅलेजमध्ये लायब्ररीत येऊन भेटते, तशी अामची भेट झाली. मग तिनेे मला तिची कल्पना सांगितली. त्यानुसार मी तिच्यासाठी ‘मधुमंजिरी’ लिहिलं. त्यानंतर ‘कळलाव्या कांद्याची कहाणी’. यानंतर मला असं वाटायला लागलं की, सुधाची दिग्दर्शनाची पद्धत खूप छान अाहे, अवघड अाणि खर्चिक अाहे. पण तरीही ती मुलांच्या मानाने अधिक वास्तववादी नाहीये का? असं मला वाटायला लागलं. मुलांच्या कल्पनाशक्तीवर अापल्याला काही गाेष्टी साेडता नाही का येणार? मग रंगभूमीच्या संदर्भात विचार केला. पण ते सुधाकडून शक्यच नव्हतं. कारण तिच्या काही कल्पना हाेत्या. त्यात ती त्या कम्फर्टेबल हाेती अाणि विशेष म्हणजे लाेकांनाही ते अावडत हाेतं. म्हणून पुढेही ती ते करत गेली अाणि बालरंगभूमीची चळवळ सुरू राहिली.’

Trending