Home | Divya Marathi Special | news article on dilip kolhatkar

दिलीप कोल्हटकर: प्रेक्षकांना नाटकांकडे खेचणारा दिग्दर्शक

जयश्री बोकील, पुणे | Update - May 06, 2018, 02:20 AM IST

मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा जमाना ओसरल्यावर आणि बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ज्या मोजक्या दिग्दर्शकांनी आपल्या कामाने

 • news article on dilip kolhatkar

  मराठी रंगभूमीवर संगीत नाटकांचा जमाना ओसरल्यावर आणि बोलपटांचे युग सुरू झाल्यावर ज्या मोजक्या दिग्दर्शकांनी आपल्या कामाने दुरावलेला प्रेक्षक पुन्हा रंगभूमीकडे वळवला, त्यातील दिलीप कोल्हटकर हे महत्त्वाचे नाव. भालबा केळकर, राजा नातू, विजया मेहता, पं. सत्यदेव दुबे..अशा दिग्दर्शकीय प्रभावळीच्या मुशीतून घडलेला कोल्हटकर यांच्यातील दिग्दर्शक मराठी प्रेक्षकांनी व्यावसायिक मराठी रंगभूमीवर अनुभवला आणि त्यांच्या नाटकांना उदंड प्रतिसाद देऊन त्यांच्या दिग्दर्शकीय योगदानाला मनमुराद दाद दिली. दिग्दर्शक म्हणून कलाकारांची एंट्री आणि एक्झिट ठरवून देणाऱ्या कोल्हटकरांची जगातील एक्झिट मात्र प्रेक्षकांना हुरहूर लावणारी आहे...

  मराठी रंगभूमीवर प्रायोगिक आणि व्यावसायिक, अशा दोन्ही सादरीकरणांत सारख्याच समरसतेने आणि सहजतेने वावरणारे मोजकेच दिग्दर्शक दिसतात. त्यात दिलीप कोल्हटकर हे प्रमुख नाव होते. नाटककार बाळ कोल्हटकर, नटवर्य चित्तरंजन कोल्हटकर असा रंगभूमीचा खणखणीत वारसा दिलीप कोल्हटकरांकडे होता. त्यामुळे उपजीविकेसाठी बँक ऑफ बडोदामध्ये तब्बल तीस वर्षे नोकरी करत त्यांनी मराठी रंगभूमीसह चित्रपट आणि छोट्या पडद्यावरही मुशाफिरी केली.

  नाटक आणि चित्रपट ही संपूर्णपणे दिग्दर्शकाची मानली जाणारी माध्यमे आहेत...हे विधान आपल्या कर्तृत्वाने ज्यांनी वारंवार सिद्ध केले, ते नाव दिलीप कोल्हटकरांचे आहे. सांगलीत जन्मलेले कोल्हटकर अर्थशास्त्र विषयाचे पदवीधर झाले आणि बँकेत काम करू लागले. जोडीला विजया मेहता आणि पं. सत्यदेव दुबे यांच्यासारख्या भिन्न प्रकृतीच्या, शैलीच्या दिग्दर्शकांसोबत त्यांनी प्रकाशयोजनाकार आणि नेपथ्यकार, या भूमिकांतही ठसा उमटवला. विजयाबाईंच्या तर बहुतेक नाटकांची प्रकाशयोजना कोल्हटकरांची होती. ‘बॅरिस्टर’, महासागर या नाटकांसाठी ते विजयाबाईंचे सहायक होते. ‘उभं दार आडवं घर’ नावाच्या नाटकातल्या हळूहळू कोसळत जाणाऱ्या त्यांच्या नेपथ्याची आठवण बुजुर्ग रंगकर्मी अाजही काढतात. बँकेतील नोकरीच्या निमित्ताने आंतरबँक स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा हे सारे कोल्हटकरांनी गाजवलेच होते.

  राज्य नाट्य स्पर्धेत त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘ययाती’ नाटक कमालीचे चर्चेत होते. पाच अंकांचे आणि सहा तासांचे हे नाटक पाच वेगवेगळ्या नाटककारांच्या लेखनाचे संकलन होते. मूळ संस्कृत नाटकातील एक अंक, गिरीश कर्नाड यांच्या नाटकातील एक अंक, खाडिलकरांच्या विद्याहरण नाटकातील एक अंक, वि. वा. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या नाटकातील एक अंक आणि अच्युत वझे यांच्याकडून लिहून घेतलेला एक अंक, असे कोल्हटकरांच्या ययाती नाटकाचे सादरीकरण आठवणारेही अनेक नाट्यरसिक आहेत. उन्मेष युवक प्रायोगिक रंगमंच, आविष्कार, बहुरूपी, एनसीपीए, नेहरू सेंटर, पृथ्वी थिएटर...यांच्यासाठी त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन केले.


  व्यावसायिक रंगभूमीवरचे सर्वाधिक यशस्वी दिग्दर्शक असा कोल्हटकरांचा सार्थ लौकिक होता. ‘मोरूची मावशी’सारखं तुफान विनोदी नाटक आणि आई रिटायर होतेय, आणि मकरंद राजाध्यक्ष, आसू आणि हसू..ही भिन्न जातकुळीची नाटकं त्यांनी दिग्दर्शित करून टाइपकास्ट न होण्याची दक्षता घेतली. नाटकाचा संहितेपासूनचा ‘प्रयोग’ रूपात होईपर्यंतचा प्रवास कोल्हटकर अक्षरश: जगत असत. सारे काही विसरून नाटकाचाच विचार त्यांच्या मनात असे. प्रत्यक्षात नाटक बसवताना त्यांचे नाते थेट जुन्या काळातील ‘तालीम मास्तरा’शी असे. पराकोटीची शिस्त ते स्वत: पाळत आणि नट मंडळींनाही पाळायला लावत. यामुळेच कोल्हटकरांनी दिग्दर्शित केलेल्या बहुतेक नाटकांनी प्रयोगांची किमान शंभरी सहज पार केलेली दिसते. हे भाग्य फार क्वचित दिग्दर्शकांच्या वाट्याला येतं..विनोदी नाटकांचे अलीकडचे अंगविक्षेपी आणि हलक्या विनोदाचे स्वरूप कोल्हटकरांनी दिग्दर्शित केलेल्या मोरूची मावशीच्या प्रयोगांना आले नाही, याला त्यांची शिस्त कारणीभूत होती.

  अनेक नटांना त्यांनी आपल्या नाटकांतून प्रमुख व्यक्तिरेखा दिल्या आणि ते नट प्रस्थापित झाले. काही नटांची कारकीर्द नव्याने प्रस्थापित झाली, याची अनेक उदाहरणे आहेत. मोरूची मावशी – विजय चव्हाण, सोनचाफा, सुख पाहता – यशवंत दत्त, वय लग्नाचं – आदिती शारंगधर, लेकुरे उदंड झाली – प्रशांत दामले, आई रिटायर होतेय – भक्ती बर्वे यांची नवी इनिंग, आणि मकरंद राजाध्यक्ष – विक्रम गोखले..अशी काही नावे पुरेशी आहेत. व्यावसायिक रंगभूमीवरील सुमारे पन्नास यशस्वी नाटकांचे दिग्दर्शन कोल्हटकरांचे होते, एवढे म्हटले तरी त्यांच्या यशस्वी दिग्दर्शकीय कारकीर्दीची कल्पना येईल. पण यशस्वी दिग्दर्शक म्हणून तेच ते करण्याचा प्रयत्न त्यांनी टाळला.

Trending