Home | Divya Marathi Special | uttam khobragade interview in divya marathi

अाठवले भाजपला ‘सरेंडर’ झाल्याने अांबेडकरवाद्यांची मुस्कटदाबी: उत्तम खोब्रागडे

शेखर मगर | Update - May 08, 2018, 03:00 AM IST

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राजकीय पक्ष म्हणजे एक दुकान आहे. भाजपसोबत त्यांनी केलेली आघाडी ही

 • uttam khobragade interview in divya marathi

  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा राजकीय पक्ष म्हणजे एक दुकान आहे. भाजपसोबत त्यांनी केलेली आघाडी ही आघाडी नसून दुकानदारी आहे. स्वतंत्र विचाराचा पक्ष असल्यामुळेच प्रवेश केला होता. पण प्रत्यक्षात आठवले भाजपला पूर्णपणे सरेंडर असल्याचे कळल्यामुळेच आपण रिपाइंला (ए) सोडचिठ्ठी दिली, असे मत सेवानिवृत्त ज्येष्ठ सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी व्यक्त केले. काँग्रेस प्रवेशानंतर ते पहिल्यांदाच शहरात आले होते. त्या वेळी ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने त्यांच्याशी केलेली खास बातचीत प्रश्नोत्तरांच्या स्वरूपात….

  * प्रश्न : आठवलेंच्या पक्षात प्रवेशाचे कारण काय..?
  उत्तर : अमेरिकेतील वाणिज्यदूत तथा माझी मुलगी देवयानी खोब्रागडे यांच्यावर अमेरिकेत अन्याय झाल्यानंतर आपण जागतिक पातळीवर यासंदर्भात खुलासा करणारी अनेक विधाने केली होती. त्या वेळी प्रसिद्धीच्या झोतात असल्यामुळे जगात माझे नाव झाले होते. माझी ‘इमेज’ कॅश करण्यासाठी रामदास आठवलेंनी मला विनंती करून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये आणले होते. मला व माझ्या कुटुंबीयांना आंबेडकरी चळवळीत काम केल्याची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवनात राहून चांगले काम करण्यासाठी मी होकार दिला होता. असे वाटले होते की, रिपाइंची (ए) भाजपसोबत आघाडी आहे, पण तसे काहीच नाही. आठवले पूर्णपणे भाजपला सरेंडर असून त्यांचा पक्ष म्हणजे एक राजकीय दुकान आहे.


  * प्रश्न : चूक लक्षात आली तरीही दोन वर्षे पक्षात का राहिले..?
  उत्तर : नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आंबेडकर अनुयायी-अल्पसंख्याक समुदायाची मोठ्या प्रमाणात मुस्कटदाबी होत असल्याचे मी त्यांच्या वारंवार निदर्शनास आणून देत होतो. पण त्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नव्हते. तरीही त्यांच्यात मतपरिवर्तन होईल, राज्यातील अत्याचारावर भूमिका घेतील, संसदेत भाषणे करतील, अशी मला अपेक्षा होती. पण मंत्रिपदानंतर त्यांनी समाजाच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली. त्यामुळे आपण त्यांची साथ सोडली अन् फक्त आंबेडकर अनुयायींच्या हितासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


  * प्रश्न : आठवलेंनी कमिटमेंट पाळली नाही म्हणून त्यांना सोडले. काँग्रेसने आता कमिटमेंट दिली म्हणून काँग्रेसमध्ये प्रवेश केला हे खरे आहे का..?
  उत्तर : अजिबात नाही, आठवलेंनी मला काहीच कमिटमेंट दिलेली नव्हती. किंबहुना मी अटी व शर्ती ठेवून पक्षात गेलो नव्हतो. आयएएस होण्यापूर्वी आपण दलित पँथरमध्ये काम केलेले आहे. त्यामुळे बाबासाहेबांच्या विचाराने चालणाऱ्या पक्षातच प्रवेश करावा, असे वाटत होते. म्हणून गेलो होतो, स्वार्थासाठी नव्हतो गेलो. मी ४० वर्षे लाल दिव्याच्या गाडीत फिरलो आहे. मला मंत्री ‘टरकत’ होते, त्यामुळे पदांचे अप्रूप तसे काहीच राहिले नाही. आताही १० फेब्रुवारी २०१८ रोजी काँग्रेसमध्ये प्रवेश करताना काहीच कमिटमेंट घेतलेली नाही. आंबेडकर अनुयायींना न्याय मिळवून देण्याची धमक फक्त काँग्रेसमध्ये आहे. बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा राजकीय पक्ष एकटाच असून तो काँग्रेस असल्याने प्रवेश घेतला.


  * प्रश्न : आठवले सरेंडर आहेत, हे कशाच्या अाधारावर म्हणता..?
  उत्तर :
  मोदींचे सरकार आल्यापासून फक्त मुस्कटबादी सुरू आहे. ५६ लाख विद्यार्थ्यांची फेलोशिप आणि शिष्यवृत्ती मागील दोन वर्षांपासून केंद्र सरकारने दिलेली नाही. स्पेशल कंपोनंट प्लॅन (एससीपी) जवळपास बंद करून टाकला आहे. पूर्वी या अंतर्गत लोकसंंख्येच्या प्रमाणात १६.९ टक्के खर्च मागासवर्गीयांवर खर्च केला जात होता. आता हे गुंडाळून समाजकल्याणच्या नावाखाली दहा टक्क्यांनी घटवून ६.९ टक्यांवर ही तरतूद आणली आहे. पदोन्नतीतील आरक्षण बंद करून टाकले आहे. मागासांचे नोकऱ्यांमधील प्रतिनिधित्व हळूहळू कमी केले जात आहे. अॅट्रॉसिटी अॅक्टमध्ये हस्तक्षेप केला जात आहे. समाजाचे नेते म्हणवणारे आठवले यावर काहीच बोलत नाही. त्यांना फक्त मंत्रिपदाचे पडले आहे. त्यांच्या अशा गप्प बस‌ण्याला सरेंडर नाही तर काय म्हणायचे..? भाजपचे धोरण आहे, गुलाम बनून राहिले तर आम्ही देऊ, अन्यथा मुस्कटदाबी करत राहणार, असे सरकारचे धोरण आहे. रोहित वेमुला प्रकरणात काहीच बोलले नाही.


  * प्रश्न : तुम्ही काँग्रेसमध्ये गेला अाहात, पण मोदींच्या तुलनेत काँग्रेसचे नेतृत्व तर खूपच कमकुवत आहे. मग आंबेडकर अनुयायी आणि अल्पसंख्याकांना काँग्रेसच न्याय देईल, असा विश्वास का वाटतोय..?
  उत्तर : अजिबात नाही, राहुल गांधी सक्षम नेतृत्व आहे. मोदींप्रमाणे एका विशिष्ट वर्गाचा ते विचार करत नाहीत. माझे आणि त्यांचे या विषयावर अर्धा तास बोलणे झाले आहे. राहुल प्रो-अॅक्टिव्ह आहेत. त्यांनी रोहित वेमुला प्रकरणात भूमिका घेतली. उना, सहारनपूर दंगलग्रस्त भागांना भेट दिली. काँग्रेस पक्षाचे आंबेडकर प्रेम भाजपप्रमाणे बेगडी नाही. काँग्रेस पक्ष आंबेडकरी विचारावरच चालतो आहे. त्यामुळे मोदींचे सरकार उलथून फेकणे आता राहुलची एकट्याची जबाबदारी नाही. धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येणे गरजेचे आहे. फक्त सर्व रिपाइंचे गट-तट एकत्र येऊन काहीच फायदा होणार नाही. काँग्रेस त्यासाठी पुढाकार घेणार असून समाजवादी पार्टी, बहुजन समाज पक्ष आदींसह समान विचारांचे लोक एकत्र आले तर मोदींचा मुकाबला करता येणे सहज शक्य आहे.


  * प्रश्न : तुम्ही बॅलेट पेपरवर मतदान घेण्याच्या भूमिकेत आहात, ईव्हीएमवर तुमचाही विश्वास नाही का..?
  उत्तर : ईव्हीएममध्ये घोटाळा करून निवडणुका जिंकल्या जातात, यावर माझा अजिबात विश्वास नाही. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून दोन, तर निरीक्षक म्हणून मी ७ निवडणुकांमध्ये काम केले आहे. फक्त लोकांना ईव्हीएमवर विश्वास नसल्याचे वातावरण असेल तर मुख्य निवडणूक आयुक्त ईव्हीएमसाठी आग्रही का आहेत..? सर्वसामान्यांसाठी बॅलेट पेपरवरील मतदान घ्यावे. एकाही प्रगत देशात ईव्हीएमद्वारे मतदान घेतले जात नाही. मग भारतातच का..?

  देवयानी भारतात अजिबात खुश नाही
  देवयानीच्या संदर्भात उत्तम खोब्रागडे यांना बोलते केले असता ते म्हणाले, भारतीय वंशातील उच्चवर्णीय अधिकाऱ्यांनी देवयानी खोब्रागडे यांना मुद्दाम छळले होते. मुलीला शाळेत सोडायला जात असताना अटक करण्यासह झडती घेणे नियमबाह्य तर होतेच. शिवाय देवयानी कट्टर आंबेडकर अनुयायी असल्याचे त्यांना माहिती होते. त्यामुळे जातीय द्वेषातून तिला त्रास देण्यात आला होता. तेथील अधिकारी भरारा आता बडतर्फ आहेत. आताही देवयानीला विदेश सचिवालयात आणण्यात आले आहे. पण ती भारतात अजिबात खुश नाही.. तिला पुन्हा विदेशात तिच्या मूळ पदावर नोकरी करण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी म्हटले.

Trending