आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील पहिली महिला क्रिकेट व्हिडिआे विश्लेषक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरती नलगे, व्हिडिआे-परफॉर्मन्स विश्लेषक

जन्म - ४ एप्रिल, १९८३
कुटुंब - वडील-दत्तात्रेय नलगे, आई-निशा (गृहिणी), बहीण-मीनाक्षी, अजय (पती)
शिक्षण - भेगास हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण, बी.कॉम.
चर्चेत का - यांच्या व्हिडिआे विश्लेषणामुळे महिला क्रिकेट संघ २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला हरवू शकला.
ऑस्ट्रेलियन संघाचे व्हिडिआे आरती यांनी सामन्यापूर्वीच संकलित केले होते. कोणती खेळाडू कशी खेळते, त्यातील त्रुटी व बलस्थाने काय आहेत? भारतीय संघाला त्यांनी हे सर्व दाखवले. त्यानुसार क्षेत्ररक्षण व गोलंदाजीची रणनीती आखली. सिरीज सुरू झाली. पूर्वाभ्यासामुळे खेळणे सोपे गेले. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज व इतर खेळाडूंनी आरतीकडून वारंवार विश्लेषण एेकले. अशा पद्धतीने संघाने सिरीजचे जेतेपद पटकावले.

आरती देशातील पहिली महिला व्हिडिआे विश्लेषक आहे. शिवाय एकमात्र वरिष्ठ महिला विश्लेषकही आहे. पालकांच्या प्रोत्साहनामुळे आरती १५ व्या वर्षापासून क्रिकेट खेळते आहे. शाळेत ती बॅडमिंटन खेळत असे. हा क्रीडाप्रकार सांघिक नसल्याने त्यासाठी आरती एकट्याने प्रवास कसा करेल ही चिंता पालकांना होती. वडील हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये आहेत. आईने तिला क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. १९९८ पासून ती हैदराबाद संघाकडून खेळू लागली. ती अष्टपैलू खेळाडू होती. मिडल ऑर्डरवर बॅटिंग व ऑफ स्पिन बॉलिंग करत असे. मात्र २००४ मध्ये सामन्याचा सराव करत असताना गोलंदाजी करताना उजव्या खांद्याला झटका लागला. तेव्हापासून ती खेळू शकत नाही.

त्यानंतर तिने बहुराष्ट्रीय कंपनी जीईमध्ये नोकरी केली. २०१० मध्ये तिने नोकरी सोडली. एकदा रणजी सामना पाहत होती. कॅमेऱ्यात मैदान कसे दिसते. अम्पायर निर्णय कसे घेतात हे तिने पाहिले. आरतीला हे रंजक वाटले. व्हिडिआे विश्लेषकाचे प्रशिक्षण आहे का, याची वडिलांनी चौकशी केली. गोव्यात बीसीसीआयचा प्रॅक्टिकल व थेअरी अभ्यासक्रम असल्याची माहिती मिळाली. आरती तिथे गेली व प्रशिक्षण पूर्ण केले.

२०१० मध्ये एचसीएमध्ये प्रसिद्ध क्रिकेटपटू शिवलाल यादव अध्यक्ष होते. विश्लेषकाचे काम देण्यासाठी त्यांच्याकडे विनंती केली. बीसीसीआयकडून नामांकन आले तर तुझे नाव पाठवू असे त्यांनी सांगितले. मात्र तसे झाले नाही. योगायोगाने एका व्यक्तीने नामांकन परत घेतले. तेथे आरतीला संधी मिळाली.