आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijit Kulkarni Article About Politics, Divya Marathi

ज्येष्ठांची अस्तित्वासाठी,तर तरुणांची उदयासाठी धडपड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणात चांगल्या प्रकारे स्थिरस्थावर झालेल्या ज्येष्ठ नेतेमंडळींच्या अस्तित्वाचा प्रश्न आणि प्रस्थापित राजकारणी घराण्यांतीलच युवा नेत्यांच्या उदयाची धडपड असे द्वंद्व सध्या उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश मतदारसंघांमध्ये पाहावयास मिळत आहे. परिणामी, येथील लढतींना एक वेगळेच परिमाण प्राप्त झाले आहे.

लोकसभेतील सध्याचे सर्वाधिक ज्येष्ठ खासदार माणिकराव गावित, राज्याचे दोनदा उपमुख्यमंत्रिपद भूषवलेले छगन भुजबळ आणि आपल्या ‘शिरपूर पॅटर्न’चा दबदबा निर्माण केलेले अमरीशभाई पटेल या तिघा ज्येष्ठांची प्रतिष्ठा अनुक्रमे नंदुरबार, नाशिक आणि धुळे मतदारसंघातून पणाला लागली आहे. तर दुसरीकडे हिना गावित, रक्षा खडसे, डॉ. भारती पवार आणि मनीष जैन या नव्या दमाच्या नेत्यांची आपले बस्तान बसविण्यासाठीची धडपडदेखील खूपच परिणामकारक ठरत आहे.

राष्ट्रवादीने आपल्या ज्येष्ठ मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरविण्याचा इरादा जाहीर केल्यानंतर त्याला सर्वप्रथम प्रतिसाद देत भुजबळ नाशकातून मैदानात उतरले. शिवसेनेचे हेमंत गोडसे व मनसेचे प्रदीप पवार या दोन तरुण चेहर्‍यांचे त्यांना फारसे आव्हान नसेल, असे सुरुवातीचे वातावरण होते. पण, जसजशी निवडणूक वेग घेऊ लागली तसतसे हे आव्हान तगडे बनत चालल्याचे दिसते. विशेषत: गोडसे यांच्या प्रचारातील सर्वसमावेशकतेमुळे लढत एकतर्फी तर सोडाच उलट प्रचंड चुरशीची बनली आहे. अशीच स्थिती नंदुरबारमध्ये माणिकराव गावित यांची आहे. सलग दहाव्यांदा लोकसभेत निवडून येण्याच्या त्यांच्या विश्वविक्रमी इराद्याला नवख्या हिना गावितांच्या उमेदवारीने करकचून ब्रेक लागले आहेत. मुलगी हिनाच्या भाजप उमेदवारीसाठी आपल्या मंत्रिपदावर पाणी सोडून विजयकुमार गावित यांनी येथे साम, दाम, दंड, भेदासह कंबर कसली असल्याने माणिकरावांची न भूतो अशी दमछाक होत आहे. त्या तुलनेत लगतच्या धुळे मतदारसंघात अमरीशभाई गतवेळपेक्षा ‘प्लस’मध्ये दिसत आहेत. या मतदारसंघात निम्मा भाग नाशिक जिल्ह्यातला आहे. गेल्यावेळी या भागातील गठ्ठा मतदानामुळे अमरीशभार्इंना विजयाने अगदी थोडक्यात हुलकावणी दिली होती. ते पाहता यंदा त्यांनी या भागावर सुरुवातीपासून लक्ष केंद्रित केले आहे.

भाजपचे नवखे सुभाष भामरे ही उणीव कशी भरून काढतात, त्यावर निवडणुकीचे गणित बर्‍याच अंशी अबलंबून असेल. रावेरमध्ये मात्र एकनाथ खडसेंची मुलगी रक्षा आणि ईश्वरलाल जैनांचे चिरंजीव मनीष या दोन युवा नेत्यांमध्ये रस्सीखेच आहे. स्थानिक पातळीवरील ‘अंडर करंट्स’ लक्षात घेऊन दोन्ही बाजूने सध्या बेरजेच्या राजकारणावर भर दिला जात आहे. मात्र काँग्रेसचे माजी खासदार उल्हास पाटील किती मते घेतात व त्यात कुणाच्या मतांची वजाबाकी होते त्यामध्ये तेथील गणिताचे उत्तर दडले आहे. दिंडोरी मतदारसंघात माजी मंत्री ए.टी. पवार यांच्या स्नुषा डॉ. भारती यांनी सलग दोन वेळा निवडून गेलेल्या भाजपच्या हरिश्चंद्र चव्हाणांना जेरीस आणले आहे. एटींच्या परिसरातील मजबूत ‘नेटवर्क’चा सामना करताना चव्हाण यांना जंग जंग पछाडावे लागत आहे. जळगाव हा भाजपचा बालेकिल्ला असला तरी यंदा विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांच्याबद्दल पक्षांतर्गत नाराजीचा सूर आहे. राष्ट्रवादीने रिंगणात उतरवलेले माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील त्याचा लाभ कसा उठवतात, त्यावर मुख्यत: निकालाचे चित्र अवलंबून असेल.