आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhijit Randive Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

निबंधाला ‘नेट’बंधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून इंटरनेटचा भारतातला प्रसार वाढतो आहे. पूर्वी केवळ कॉम्प्युटरवरून मिळणारं इंटरनेट आता मोबाइल, टॅब्लेट अशा माध्यमांतून उपलब्ध होत आहे. वापरकर्ते वाढताहेत तशाच इतर काही सुविधादेखील उपलब्ध होत आहेत.

युनिकोड प्रणालीतून देवनागरीत टाइप करणं आता सोपं झालं आहे. बर्‍याचशा लोकप्रिय स्मार्टफोनवरही आता देवनागरीत टायपिंग करता येतं. इंग्रजीपेक्षा मराठीत संवाद साधणं ज्यांना अधिक पसंत आहे, अशांसाठी ही मोठी सोय आहे.‘निबंध’ किंवा ‘लघुनिबंध’ म्हणता येईल इतपत दीर्घ लिखाणासाठी ब्लॉग आणि ‘मायबोली’, ‘मिसळपाव’, ‘ऐसी अक्षरे’ वगैरे मराठी संवादस्थळं हेच उपलब्ध पर्याय म्हणता येतील. कोणत्याही ब्लॉग सिंडिकेशनच्या आकडेवारीनुसार मराठीत ब्लॉग लिहिणार्‍यांची संख्या हजार-दोन हजार एवढीच भरते. म्हणजे इंटरनेटवर मराठीतल्या निबंधरूपी लिखाणाचं प्रमाण कमीच आहे, असं असलं तरीही दर्जात सातत्य असलं तर ती चांगलीच गोष्ट आहे.

निबंधाच्या व्याख्येत बसणारं मराठी लेखन इंटरनेटवर फारसं पाहायला मिळत नाही. इंग्रजी किंवा इतर पाश्चात्त्य भाषांमध्ये ते पुष्कळ होताना दिसतं. त्यात एखाद्या विषयाबद्दल सांगोपांग विवेचन असतं. पाश्चात्त्य भाषांमध्ये गेल्या काही वर्षांत एक नवीन पध्दत रूढ झालेली दिसते. तिथली अनेक पारंपरिक वृत्तपत्रं, नियतकालिकं यांना जेव्हा ब्लॉग्ज आणि सोशल नेटवर्क्सच्या क्षमता आणि लोकप्रियतेचा अंदाज आला तेव्हा त्यांनी आपल्या स्तंभलेखकांना ब्लॉग लिहिण्यासाठी उत्तेजन दिलं. ह्या लेखकांनी आपलं स्तंभलेखन तर ब्लॉगमधून सार्वजनिक केलं, शिवाय शब्दमर्यादेची अडचण नसल्याने विस्तारानं मांडलं. मराठी पारंपरिक वृत्तपत्रं किंवा नियतकालिकांच्या जगात असे थोडे प्रयोग झालेले दिसतात.

मराठीतलं लिखाण लघुनिबंधाच्या चौकटीतून पाहण्याचं मुख्य कारण म्हणजे लेखनातली मी-त्व किंवा मी-केंद्री वृत्ती. या पार्श्वभूमीवर मराठी ब्लॉग किंवा संवादस्थळांवरचं लिखाण पाहिलं तर काही ब्लॉग हे निबंधात न मोडणार्‍या लेखनप्रकारांना वाहिलेले असतात. इंग्रजीसारख्या भाषांत जी निबंध परंपरा आहे तिच्याशी परिचय करून घेतला, त्या लिखाणाच्या दर्जाशी आणि प्रकृतीशी आपलं लिखाण ताडून पाहात काही प्रमाणात लेखक अंतर्मुख झाले तर ह्या परिस्थितीत फरक पडू शकेल. पण, साहित्याच्या इतिहासाविषयी उदासीनता तरी असते किंवा आपल्या परिचित विश्वाबाहेर पडून वेगळ्या प्रकारचं लिखाण शोधणं आणि वाचणं याविषयी लोकांना फारसा उत्साह नसतो. कोणत्याही नव्या माध्यमाच्या सुरुवातीच्या काळात त्याचं स्वरूप पुरेसं स्पष्ट झालेलं नसतं. त्या काळात त्या माध्यमाविषयी आशा बाळगायला वाव असतो. इंटरनेट आणि त्यामुळे उपलब्ध झालेले ब्लॉग, संवादस्थळं किंवा सोशल नेटवर्क्ससारख्या प्लॅटफॉर्म्सबद्दल आशा बाळगायला हरकत नाही.

अभिजित रणदिवे, पुणे
भाषांतरकार
संपर्क : ९९६०६४९४०६