आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shiv Sena Chief Balasaheb Thackeray Second Death Anniversary News In Marathi , Read On Divyamarathi.com

दिलखुलास, मोकळ्या मनाचा नेता बाळासाहेब ठाकरे!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही महिन्यांपूर्वीच बांद्र्यात ‘मातोश्री’वर बाळासाहेब ठाकरे यांना भेटण्याचा योग आला होता. दुस-या मजल्यावरील खोलीत रोझ-पिंक वाइनच्या साथीने गप्पा सुरू झाल्या. भगव्या रंगाची रेशमी कफनी परिधान केलेले बाळासाहेब विविध विषयांवर दिलखुलास बोलत होते. इंदिरा गांधी ते राहुल गांधी, नेहरू-गांधी घराण्याबद्दलचा त्यांचा तिरस्कार आणि (त्यांच्याच शब्दांत) सोनिया गांधीची चमचेगिरी करणा-या अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर नेत्यांबाबतच्या स्वत:च्या ‘खास’ भावना व्यक्त केल्या होत्या. काँग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांबाबत बोलताना ते खास ‘ठाकरी’ विशेषणे वापरत होते. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस या दैवतांबद्दल ते भरभरून बोलले. सरदार वल्लभभाई पटेल, गोविंद वल्लभ पंत आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दल त्यांनी विशेष गौरवोद्गार काढले. असे नेते देशाला आज हवे आहेत असे त्यांनी ठासून सांगितले.

आपल्या मुलाने स्वत:साठी सत्तेच्या मागे न धावता किंगमेकर झालेले मला आवडेल. मी सत्तेची पदे टाळली, असे या अनौपचारिक गप्पांमध्ये त्यांनी म्हटले होते. ‘मी उद्धवला सांगितले आहे की, त्याने सत्तेवर राहण्यापेक्षा समाजसेवा करावी, पक्ष बळकट करावा आणि इतरांना सत्ता द्यावी,’ असे त्यांनी स्पष्ट सांगितले. बाळासाहेबांनी एखाद्या पत्रकाराशी अखेरच्या दिवसांत केलेला हा कदाचित शेवटचा मनमोकळा संवाद असावा. बाळासाहेब म्हणाले, ‘सत्तेच्या मागे धावू नकोस, त्यापेक्षा समाजासाठी, लोकांसाठी काम कर, पक्ष चांगला चालव आणि इतरांना सत्तेची फळे चाखू दे, जनतेला न्याय दे असे मी उद्धवला सांगितले आहे.’

त्यांची प्रकृती तेव्हा ब-यापैकी ठणठणीत नव्हती; परंतु ते खूप आजारीही नव्हते. मला फक्त 10 मिनिटांसाठी बाळासाहेबांनी अपॉइंटमेंट दिली होती, पण गप्पा रंगत गेल्या. त्या दिवशी बाळासाहेब मनसोक्त गप्पांच्या मूडमध्ये होते. स्पष्ट आणि रोखठोक मराठीत आपल्या शैलीत ते भाष्य करीत होते. ते चांगले तासभर बोलत राहिले. ज्या विषयांवर ते पूर्वी कधी जाहीरपणे बोलले नाहीत, असेही काही विषय निघाले. शरद पवारांसोबतच्या त्यांच्या खास घनिष्ठ मैत्रीबद्दल, मराठीविषयी भूमिकेबद्दल आणि जहाल हिंदुत्वाबद्दल ते बोलले आणि खूप भरभरून बोलले होते. ‘शरद पवार मला ‘जेपी’ नावाने संबोधायचे आणि ते स्वत: वेगळ्या पक्षात असले तरी माझ्या राजकीय भूमिकेचा त्यांनी नेहमी मान राखला. ’

आपल्या आक्रमक राजकारणाबाबतही ते बोलले. मराठी माणूस आणि हिंदूदेखील पूर्णपणे पाठीशी नसल्याची आणि आपल्या विचारांना आक्षेप घेत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली. ‘ते माझ््याबाबतीत काहीही विचार करोत, मी माझे राजकारण बदलणार नाही. जे आहे ते बोलणारच. कुणी अंगावर आले तर शिंगावर घेऊ आणि देशहिताच्या आड येणा-या प्रत्येक गोष्टीला विरोध करू’ असे त्यांनी ठणकावून सांगितले. 1950-60च्या दशकातील संयुक्त महाराष्‍ट्राच्या लढ्याची आठवण निघताच ते हळवे बनले. भाषिक आधारावर केलेल्या राज्यनिर्मितीचा हेतू सफल झाला नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

ठाकरे यांनी लेखक आणि कलावंतांचा कायम आदरच केला. लता मंगेशकर आणि पु.ल. देशपांडे यांच्याबद्दल त्यांच्या मनात नितांत आदर आणि प्रेम होते. याविषयी त्यांनी अनेक किस्से सांगितले. मनोहर जोशींच्या नेत्तृत्वाखाली राज्यात सत्तेवर आलेल्या शिवसेना-भाजप युतीच्या सरकारने बाळासाहेबांना ‘महाराष्‍ट्र भूषण पुरस्कार’ देण्याचा निर्णय घेतला तेव्हा बाळासाहेबांनीच त्याला नकार दिला आणि पु.ल. देशपांडे यांचे नाव सुचवले. साहित्यिक, कलावंत म्हणून पुलंनी जे योगदान महाराष्‍ट्रासाठी दिले त्यापेक्षा माझे काम छोटे आहे असे दिलदारपणे बाळासाहेबांनी सांगितले. तो पुरस्कार नंतर पु.लं.नाच घोषित झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा मोकळेपणा, आक्रमक आणि निर्धास्त शैली विलक्षण होती. त्यांनी वाइन लपवली नाही, उलट ते हेल्थ ड्रिंक असल्याची मिश्कील कॉमेंटही त्यांनी केली आणि पहिल्याच (व शेवटच्या) भेटीत मला वाइन पाजली. वाइनचे अप्रूप नाही, पण लपवाछपवी हे बाळासाहेबांचे क्षेत्रच नव्हते याची त्यांनी किती सहजगत्या माझ्यासारख्या नवख्याला जाणीव करून दिली. जे आत तेच बाहेर ही बाळासाहेबांच ख्याती मला त्या दिवशी अगदी जवळून बघता आली.