आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रंजक: सी. शिवशंकरन, व्यावसायिक, संगणक ८० हजारांना होता, तेव्हा ३३ हजारांतच विक्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चेन्नईत जन्मलेले शिवशंकरन त्यांच्या वडिलांसोबत फॅब्रिकेशन आणि इंजिनिअरिंगचे काम करायचे. ऐंशीच्या दशकात प्रसिद्ध टेनिस खेळाडू विजय अमृतराज यांचे वडील रॉबर्ट यांची स्टर्लिंग कॉम्प्युटर्स ही कंपनी विकत घेतल्याने ते चर्चेत आले. हा तोच काळ होता ज्या वेळी राजीव गांधी हे सॅम पित्रोदा यांना सोबत घेऊन मिळून संगणकास चालना देत होते. तेव्हा संगणकाची किंमत ८० हजार रुपये होती. त्या वेळी शिवशंकरन यांनी केवळ ३३ हजारांत संगणकाची विक्री करत एका सृजनशील उद्योगपतीच्या रूपात ते पुढे आले.

एखाद्या करारासाठी ते अगदी काही क्षणांतच देशातून अमेरिकेसाठी रवाना व्हायचे. म्हणून त्यांना देशातील सर्वात चतुर डीलमेकर म्हटले जाऊ लागले. हळूहळू त्यांनी चेन्नई सोडत सिंगापूरच्या रिट्झ कार्लटन आणि पॅन पॅसिफिक हॉटेलच्या प्रेसिडेन्शियल सुइटमध्ये कार्यालय थाटले. रोलेक्सची घड्याळे आणि मोब्लांचे पेन बाळगणे त्यांचा छंद होता. संगणक कंपनी विकत घेतल्याच्या पाच वर्षांच्या आतच ते तामिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री एम. के. करुणानिधी आणि मुरासोली मारन यांचे निकटवर्तीय बनले. मात्र, २ जी स्पेक्ट्रम प्रकरणानंतर दयानिधी मारन यांनी त्यांच्याशी फारकत घेतली.

मारन बंधूंनीच आपल्यावर दबाव टाकत मॅक्सिसला एअरसेल विकण्यास सांगितल्याचा त्यांनी २०११ मध्ये दूरसंचार घाेटाळ्यात सीबीआयसमोर दावा केला. यासाठी त्यांनी १० साक्षीदारांची एक यादीही सीबीआयला सोपवली होती. टाटा टेलिसर्व्हिसेसला स्वस्तात उपकरणे देऊन मदत करणारेही शिवशंकरन हेच होते. १९९२ मध्ये एमटीएनएलकडून त्यांना दिल्ली आणि मुंबईसाठी पिवळी डायरी बनवण्याचा ५ वर्षांचा करार मिळाला. यात पक्षपातीपणा झाल्याचे आरोपही झाले. मात्र, तसे काहीच निघाले नाही. दूरसंचार क्षेत्र लवकरच खासगी क्षेत्रांसाठी खुले होण्याच्या शक्यतेने ते चेन्नईहून दिल्लीला आले आणि येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करू लागले. त्यानंतर त्यांच्या कंपनीस दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा आणि राजस्थानात काम करण्याचा परवाना मिळाला. हा परवाना त्यांनी लागलीच एस्सार समूहाच्या शशी रुईया यांना विकून टाकला. दिल्लीतील ज्या पंचतारांकित हॉटेलच्या खोलीत ते थांबले होते त्यात दोन ट्रेडमील ठेवलेले होते. त्यांना भेटायला येणारे बरेच जण याचा उपयोग करायचे.

यावरूनच त्यांना चेन्नईत जिम सुरू करण्याची योजना सुचली. सध्या या जिममध्ये अनेक क्रिकेटपटू येतात. शिवशंकरन यांच्याच आर्थिक मदतीमुळे थायलंडमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे स्पा डेस्टिनेशन तयार झाले असून त्यास शिवा सोम असे नाव देण्यात आले आहे.
-जन्म- २९ जुलै १९५६
-वडील- चिन्नकनन (उद्योगपती)
-शिक्षण - बीई, ओपीएम हार्वर्ड बिझनेस स्कूल
-कुटुंबीय-पत्नी जयलक्ष्मी, मुलगा श्रवण
-चर्चेचे कारण- यांच्या टेलिकॉम कंपनीला ३३८ कोटींचा परतावा मिळाला आहे.
तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांना पत्र लिहून शिवशंकरन यांनी १७०० कोटी रुपये परत मागितले हाेते.