आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदरांजली: सच्चा राष्ट्रभक्त हरपला!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. अब्दुल कलाम यांचे अकस्मात निधन अतिशय दु:खद आणि वेदनादायी आहे. भारत महासत्ता व्हावी, यासाठी सातत्य चिंतन करणा-या एक सच्च्या राष्ट्रभक्ताला, कर्मयोग्याला आपण मुकलो आहोत. भारताला २०२० पर्यंत महासत्ता म्हणून पुढे आणण्याचा आराखडा त्यांनी निश्चित केला होता. तरुणाईची ताकद ओळखणारे नेतृत्व आपण गमावले आहे. डॉ. कलाम यांनी नव्या पिढीला सातत्याने मार्गदर्शन करण्याचे काम केले. स्वातंत्र्यानंतरच्या काळात जवळपास सर्वच वयोगटातील जनमानसावर प्रभाव असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून डॉ. कलाम यांचेच नाव घ्यावे लागेल. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

खरा देशभक्त, ज्ञानी माणूस
अब्दुल कलाम यांनी देशाला विज्ञानाचा मंत्र तर दिलाच पण तो देताना त्याला अाध्यात्मिक बाजूही दिली. स्वत:ला जे समजलंय ते बाकीच्यांना सांगण्याची विलक्षण उर्मी त्यांच्यात होती. त्यांना भेटण्याची एकदाच संधी मिळाली. राष्ट्रपती असलेल्या माणसानं कसं राहावं ह्याचा खरा आदर्श त्यांनी घालून दिलेला मी त्यावेळी पाहिला... ते खरे ‘भारतरत्न’ होते. भारत एक महासत्ता बनू शकतो आणि आपण जगाचं नेतृत्व करू शकतो ह्याचा एक विश्वास त्यांनी आपल्या सर्वांना दिला. स्वप्न पाहायला शिकवलं. २०२० साली भारत कुठे जाईल, कुठे जावा हे सांगून त्यांनी आपल्याला एक रस्ता दाखवला.
राज ठाकरे, मनसे अध्यक्ष

कर्तृत्व आणि विचारांनी महान
डाॅ. कलाम यांच्या रूपात भारताने एक महान व्यक्तिमत्त्व गमावले. वयाची ८० वर्षे पार केल्यानंतरही ते एखाद्या तरुणाला लाजवणा-या उत्साहात वावरायचे. त्यांनी भारताला अंतराळ व अणू विज्ञान तसेच क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात जगातील महासत्ता केले. राष्ट्रपती म्हणूनही त्यांचे योगदान मोठे होते. राष्ट्रपती भवन आणि सामान्य नागरिकांमधील संवाद वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढाकार घेतला होता. कर्तृत्वाने व विचाराने महान असलेले कलाम वैयक्तिक आयुष्यात अतिशय साधे होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात त्यांना प्रचंड गोडी होती. भारतासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.
अशाेक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

...अन‘अग्निपंख’मराठीत आले!
डॉ. अब्दुल कलाम यांच्यावर लिहिलेले ‘व्यक्तिवेध' हे पुस्तक एकाचवेळी अकरा भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणार होते. कार्यक्रम झाल्याच्या दुस-या दिवशी कलामसाहेबांनी राष्ट्रपती भवनात सकाळी ११ वाजता आम्हा सर्वांना चहापानासाठी बोलावले होते. दिलेल्या वेळेला आम्ही त्यांची वाट पाहत होतो. पण ते कधी, कुठून आले आणि आमच्यात मिसळले हे कळलेदेखील नाही. त्यांच्या वर्तनात पदाचा डामडोल, अभिनिवेश तसूभरही दिसला नाही. त्यावेळी थेट डॉ. कलाम यांच्याशी २० ते २५ मिनिटे संवाद साधता आला. कलामसाहेबांचे अत्यंत साधे वर्तन लक्षात राहणारे होते. पुढे आमच्या प्रकाशनातर्फे त्यांचे आत्मचरित्र ‘अग्निपंख' या नावाने मराठीत आले. मोजक्या ‘बेस्टसेलर' आत्मचरित्रांमध्ये ‘अग्निपंख'चा समावेश करावा लागतो. दिलीप माजगावकर, राजहंस प्रकाशन.

कुलगुरूंना दिले महासत्तेचे व्हिजन
भारत २०२० मध्ये महासत्ता व्हावा हे स्वप्न उराशी बाळगून १३० कोटी भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत तेवत ठेवणारा महासत्तेच्या स्वप्नाचा जन्मदाता हरपला आहे. मुंबई विद्यापीठात जानेवारी २०१५ मध्ये झालेल्या इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सर्व कुलगुरूंशी संवाद साधला होता. त्यावेळची आठवण माझ्या कायम स्मरणात राहील. देशासाठी सर्व जीवन अर्पण करणारे डॉ. कलाम देशाचे महान सुपुत्र होते.
डॉ. बी. ए. चोपडे, कुलगुरू,

सुसंस्कृत विद्वान, व्यासंगी शास्त्रज्ञ
त्यांच्या जाण्याने एक सुसंस्कृत, विद्वान व व्यासंगी तत्वनिष्ठ शास्त्ररज्ञ हरपला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ५३ वा दीक्षांत समारंभास त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्याचे भाग्य मला लाभले. १९८३ पासून माझे त्यांच्याशी स्नेहाचे संबंध होते. डीआरडीओमध्ये त्यांच्यासोबत काम करताना त्यांच्यातील प्रेरणादायी शास्त्रज्ञ मनाला भावला. त्यांची राष्ट्रभक्ती, देशाला स्वयंपूर्ण करण्याची जिद्द नेहमीच मार्गदर्शक ठरेल.
डॉ. विजय पांढरीपांडे, माजी कुलगुरू