आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईने मुलांना सीए केले, आता मुले आईला सीए करणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांना वाढवताना अनेकदा आई-वडिलांची स्वप्ने विरून जातात. शेवटी मुलांच्या स्वप्नातच आपली स्वप्ने पाहिली जातात. राजस्थानमधील भिलवाड्याच्या रहिवासी अनिता नौलखा यांची मुले मात्र यास अपवाद ठरली आहेत. लग्नानंतर शिक्षणावर पाणी सोडावे लागणाऱ्या आपल्या आईला अमित अजय या मुलांनी सीएचे अर्धवट राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

या वर्षी दोघे सीएच्या शेवटच्या वर्षाची परीक्षा देतील. आईही सीए व्हावी, अशी दोघांची इच्छा आहे. त्यांनी आई अनितांना सीपीटी द्यायला लावली. विशेष म्हणजे पहिल्याच प्रयत्नात परीक्षा क्लिअरही झाल्या. आता मोठ्या मुलासोबत त्या मे महिन्यात सीएची अंतिम परीक्षा देतील. एमएस्सीपर्यंत शिकलेल्या अनिता यांचा विवाह १९९१ मध्ये अशोक नौलखा यांच्याशी झाला. लग्नानंतर शिक्षण सुटले होते.

आणि त्या संसारात रमल्या. अमित आणि अजय ही मुले झाल्यानंतर त्यांची स्वप्नपूर्ती करण्याचेच स्वप्न त्यांनी पाहिले. दोघे वाणिज्य शाखेत अव्वल ठरल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी सीपीटी दिली. या परीक्षेत मिळालेल्या यशाचे श्रेय ते आईला देतात. अनितांनी एमएस्सीपर्यंत शिक्षण घेऊनही मुलांना वाणिज्य शाखा दिली. आई आपणाला सीएच्या शेवटच्या वर्षापर्यंत पोहोचवू शकत असेल, तर तीही पदवी का मिळवू शकणार नाही, असा विचार दोघांनी केला. आई शिकवत असताना कोचिंग क्लासेसची कमतरता जाणवत नव्हती. आम्ही सीए व्हावे हे आईचे स्वप्न होते, आता तिने सीए व्हावे हे आमचे स्वप्न असल्याची भावना अमितने व्यक्त केली.

सीपीटी देण्यास पहिल्यांदा नकार
अनिता म्हणाल्या, दोघांनी सीपीटी देण्यास सांगितले तेव्हा सुरुवातीस नकार दिला होता. २० वर्षांपूर्वी शिक्षण सुटले होते. पती आणि मुलांनी आग्रह केला आणि पहिल्याच प्रयत्नात सीपीटी क्लिअर केले. यादरम्यान मुलांनी खूप मदत केली. पतींनीही एमकॉम केले असल्यामुळे त्यांचाही आधार वाटला. सीए हाेऊन गरजू विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनिता यांची इच्छा आहे.

दोन्ही मुले हुशार
अमित २०१० मध्ये बारावी वाणिज्य शाखेत राजस्थानमध्ये अव्वल राहिला. २०१३ मध्ये सीएसमध्ये राष्ट्रीय स्तरावर पहिला आला. लहान भाऊ अजय दहावी बोर्डात २५ वा आला. सीपीटीमध्ये २१ वा, तर सीएस फाउंडेशनमध्येही ऑल इंडिया १२ वी रँक मिळाली.