आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंबडवे गाव; निसर्गाच्या सान्निध्यात, समतेच्या जवळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दापोलीपासून जवळ असलेल्या आंबडवे गावाची वाट तशी सोपी नाही. अतिदुर्गम भागातील या गावात जाण्यासाठी नागमोडी रस्ते, डोंगर-दऱ्यांना भेदत जावे लागते. ज्याप्रमाणे जातीय व्यवस्था नष्ट करून समता प्रस्थापित करणे कष्टप्राय आहे, त्याप्रमाणेच आंबडवे या समतेच्या गावाला जाताना बिकट वाटेतून जावे लागते. समतामूलक समाजरचनेचे स्वप्न पाहणाऱ्या बाबासाहेबांच्या प्रेरणेने आंबडवे गावाची नानाविध वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी काही खास विशेष पुरवणीतील वाचकांसाठी....
पन्नास उंबरठ्यांच्या या गावातील बाबासाहेबांचे राहते घर मोडकळीस आल्यामुळे पाडण्यात आले आहे. येथे डॉ. आंबेडकर स्मारक उभारण्यात आले आहे. स्मारकात त्यांच्या आठवणी साठवतील अशा दुर्मिळ छायाचित्रांचा खजिना आहे. देश- विदेशातील असंख्य आंबेडकर अनुयायी, संशोधकांना खुणावणाऱ्या गावात समता प्रस्थापित झाल्याचे आवर्जून नमूद करावेसे वाटते. अमेरिका विद्यापीठाची एलिनार झेलिएट या संशोधक महिलेने ९ फेब्रुवारी १९६५ रोजी आंबडवे गावाला भेट देऊन येथील संस्कृतीचे चार दिवस मुक्काम ठोकून संशोधन केले आहे. ७५ वय असलेल्या बाबासाहेबांचे चुलत नातू सुदाम भागूजी सकपाळ-आंबेडकर यांनी अनेक प्रसंग सांगितले. ते म्हणाले, ‘शेतजमिनीच्या वादावरून गावातील काही जमीनदारांचा त्रास असह्य झाल्याने रेल्वेमध्ये नोकरीस असणारे गंगाराम पांडू सकपाळ आणि सीताराम पांडू सकपाळ कधी-कधी खोतांच्या विरोधात तक्रार घेऊन बाबासाहेबांना भेटण्यासाठी दादर येथील राजगृह बंगल्यावर जात होते. बाबासाहेब त्यांना सनदशीर सल्ला देत असत. एके दिवशी अर्जुन गणू, गोविंद दादू, गणू नागू, पांडू नागू, भागू दादू आंबेडकर असे सर्वजण बाबासाहेबांना भेटण्यासाठी भायखळ्याच्या डबक चाळीत गेले. या जागेवर आता स्टेडियम आहे. सर्वांना बघताच पुस्तक वाचण्यात दंग असलेले बाबासाहेब प्रसन्न झाले. म्हणाले : भावांची आस्थेवाईकपणे चौकशी करत आपली शेती कोण कसतंय..? झाडांची हारडे कोण जमा करत आहे..? जमीन कुणी एकाने कसण्याचा प्रयत्न करू नका. अदलून बदलून कसा, म्हणजे सर्वांना त्याचा लाभ मिळेल. एवढ्यात अर्जुन गणू म्हणाले, केळशी गावचे गोपाळ लक्ष्मण वर्तक यांच्यापासून आम्हाला खूप त्रास आहे. त्यांचा काहीतरी बंदोबस्त करा. ही तक्रार त्यांनी गांभीर्याने ऐकली आणि थोडे अस्वस्थ होऊन म्हणाले, वर्तकांचे काय करायचे ते मी बघतो, तुम्ही घाबरू नका. सोबत जेवण केल्यानंतर सर्वांना प्रवासखर्च देऊन रस्त्यापर्यंत सोडायला आल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...