आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजन चांगले असेल तर पुस्तक विक्रीही चांगली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सासवड येथे मराठी साहित्य संमेलन आणि पंढरपुरातील नुकत्याच झालेल्या नाट्यसंमेलनात अनेक नामवंत आणि नवोदित पुस्तक प्रकाशकांचे स्टॉल्स लावले गेले होते. या स्टॉल्सना मिळालेल्या वाचकांच्या प्रतिसादाबाबत संयोजकांनी नियोजन चांगले केले तरच त्याच फायदा प्रकाशकांना होतो, असे प्रातिनिधिक मत सर्वच प्रकाशकांनी व्यक्त केले.
सोलापूर—अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सासवड येथे पार पडले. साहित्य संमेलनात वाचकांना आकर्षण असते ते पुस्तक प्रदर्शनाचे. या सहित्य संमेलनात शंभरावर स्टॉल्स होते. धार्मिक, ऐतिहासिक, चरित्रात्मक तसेच बेस्टसेलर पुस्तकांना चांगली मागणी होती. त्या तीन दिवसांमध्ये हजारो वाचकांनी पुस्तक प्रदर्शनाला भेट दिली. हजारो रसिक वाचकांचा प्रतिसाद पाहता प्रकाशकांचे अनुभव जाणून घेणे महत्त्वाचे ठरते.
नाट्यसंमेलनात स्टॉल कमी असूनही वाचकांचा प्रतिसाद उत्तमच होता
काही जणांनी पुस्तक विक्रीसाठी उभारण्यात आलेले स्टॉल्स आणखी सुटसुटीत पद्धतीने उभारले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. पंढरपुरात नुकत्याच झालेल्या नाट्यसंमेलनातही पुस्तक प्रकाशक आले होते. साहित्य संमेलनाच्या तुलनेत नाट्यसंमेलनातील पुस्तक स्टॉल्सची संख्या कमी असली तरी वाचकांचा प्रतिसाद काही कमी नव्हता,हे येथे जाता जाता नमूद करावेसे वाटते.
स्टॉल्सची रचना नीट हवी होती
सासवडला झालेल्या साहित्य संमेलनात वाचकांचा प्रतिसाद चांगला होता. तरुणांची गर्दीही चांगली होती. नेहमीच्या बेस्ट सेलर, ऐतिहासिक, चरित्रात्मक पुस्तकांनाही चांगली मागणी होती. पण पुस्तकांच्या विक्रीसाठी स्टॉल्सची रचना चांगली नव्हती. कोणता स्टॉल कुठे आहे, रसिक वाचकांनी कसे कोठून यायचे, कसे जायचे हेही समजत नव्हते. योग्य ठिकाणी बॅनर हवे होते. नकाशाही लावणे आवश्यक होते. तेव्हा पुढील साहित्य संमेलनात पुस्तक विक्री स्टॉल्सची रचना करताना ती लोकांना सुटसुटीत वाटेल, अशी असावी.
- उमेश पाटील, ज्ञानगंगा पुस्तक प्रदर्शन, पुणे,
आणखी सोयी हव्या होत्या
डायमंड पब्लिकेशन्सच्या पुस्तक प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळाला. स्टीव्ह जॉब्ज यांचे मूळ आत्मचरित्र, मॅनहंट या पुस्तकांना चांगला प्रतिसाद होता. पंडित विद्यासागर यांच्या ओव्यांच्या माध्यमातून विज्ञान या पुस्तकालाही चांगला प्रतिसाद होता. पण पुस्तक विक्रीसाठी जे स्टॉल्स उभारण्यात आले होते,त्या दोन स्टॉल्समधील अंतर कमी होते. कुपननुसार जेवणपाण्याची सोय हवी होती, पण तसा प्रतिसाद मिळाला नाही. पुढचे साहित्य संमेलन जेव्हा भरविले जाईल तेव्हा स्टॉल्सची रचना सर्वांना सोयीची पडेल अशीच असावी.
- दत्तात्रय पाष्टे, डायमंड पब्लिकेशन्स, पुणे
फ.मुं.च्या पुस्तकांना चांगला प्रतिसाद
आमचे दोन स्टॉल्स सासवड साहित्य संमेलनात होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ.मुं . शिंदे यांच्यावर आधारित फ.मुं.-एक गजबजलेले या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला. स्टॉल्सची रचना चांगली होती, पण शेवटच्या रांगेपर्यंत लोकांना जाणे शक्य नव्हतं. यापेक्षा चिपळूण साहित्य संमेलनाची व्यवस्था अधिक चांगली होती. आमची आणखी दहा ते बारा पुस्तके येत असली तरी आम्ही यंदापासून नवे अथर्व मासिक सुरू केले, त्यांच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन या साहित्य संमेलनात करण्यात आले होते. यात अनेक प्रकाशकांच्या नव्या पुस्तकांची माहिती आम्ही दिली असून दर्जेदार साहित्यही यात आहे.
- युवराज माळी, अथर्व पब्लिकेशन्स, जळगाव
धार्मिक-बालसाहित्याला चांगली मागणी, आणखी चांगले नियोजन हवे
सासवडचे मराठी साहित्य संमेलन आणि पंढरपूरचे नाट्यसंमेलन येथे दोन्हीकडे आमचे स्टॉल्स लावण्यात आलेले होते. साहित्य संमेलनात वाचकांना आम्ही बरेच काही देऊ शकलो असतो, पण स्टॉल्सची रचना आणखी चांगली हवी होती. आमच्या धार्मिक आणि बालसाहित्याच्या पुस्तकांना चांगली मागणी होती. पंढरपूर नाट्यसंमेलनात पुस्तकांचे स्टॉल कमी होते तरी दर्दी वाचकांची गर्दी चांगली होती. संयोजकांनी आणखी चांगले नियोजन केले असते तर बरे झाले असते.
- बाबूराव मैंदर्गीकर, सुविद्या प्रकाशन, सोलापूर.