आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Analysis : रहाणेचे नाणे दाैऱ्यात खणखणीत सिद्ध होईल काय?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झिम्बाब्वे दौऱ्यात मुंबईचा रणजीपटू अजिंक्य रहाणे भारतीय कर्णधारपद भूषवणार आहे. हे नाव आश्चर्यचकित करणारे होते. घोषणा होताच सारेच अवाक् झाले. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या आणि तिसऱ्या वनडेत ज्याची अंतिम अकरात निवड झाली नाही त्यालाच कर्णधार बनवले गेले.
मुख्य निवडकर्ते संदीप पाटील म्हणाले की, रहाणेत चांगला कर्णधार बनण्याची क्षमता आहे. निवड समितीने झिम्बाब्वे दौऱ्यात कर्णधार धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, रैना व अश्विनला विश्रांती दिली. निवडकर्त्यांकडे कमी पर्याय होते. यात रहाणे श्रेष्ठ वाटला असावा. त्याच्याकडे नेतृत्व सोपवणे खुद्द रहाणे आणि निवडकर्त्यांसमोरही मोठे आव्हान आहे. रहाणेकडे भविष्यात वनडेचा कर्णधार म्हणून पाहिले जात आहे?

धोनीच्या नेतृत्वात टीमने अनेक वनडे मालिका गमावल्या वा त्याने निवृत्ती पत्करली तर कोहली अथवा रहाणे कर्णधार होऊ शकतो. आताच असा विचार करणे घाईचे ठरेल. कोहलीने मोजक्याच वनडेत कर्णधारपद भूषवले. नेतृत्व करताना तो आक्रमक आणि विजयासाठी आसुसलेला दिसतो. कोहलीप्रति काहीही धारणा बनवणे घाईचे ठरावे. कसोटीनंतर वनडेतूनही धोनीने निवृत्ती घेतली तर कोहलीशी रहाणेची जुगलबंदी रंगू शकते. काही कारणामुळे कोहली उपलब्ध नसल्यास रहाणेच पर्याय असू शकतो. शेवटी निवडकर्त्यांना रहाणेत कर्णधाराचे गुण िदसले असल्यास ते संघाच्या हिताचेच ठरेल. झिम्बाब्वे दौऱ्यातील बहुतांश खेळाडू २५ वर्षे वयोगटातील आहेत. वरिष्ठ खेळाडूंच्या रूपात हरभजन आणि मुरली विजयची निवड झाली आहे. मात्र दोघेही बऱ्याच काळानंतर पुनरागमन करत आहेत. त्यामुळे त्यांना नेतृत्त्व दिले गेले नाही. शिखर धवन, रोहित शर्मा, आर.अश्विन आणि सुरेश रैनाचाही कर्णधारासाठी विचार होऊ शकतो. मात्र त्यांना स्थानिक क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून स्वत:ला सिद्ध करावे लागेल. पण कोहलीचा सहकारी तर निवडावाच लागेल. अश्विनचा विचार केल्यास कसोटी आणि वनडेतही त्याने स्वत:ला सिद्ध केले आहे. एकदिवसीयमध्ये तो क्रमांक १ चा फिरकीपटू आहे. गरज पडल्यास तो चांगली फलंदाजीही करू शकतो. त्याला क्रिकेटचा जिज्ञासू विद्यार्थीही म्हणता येईल. रहाणे व अश्विन संघात तिन्ही प्रकारांत खेळतात. बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांत रहाणेला बाहेर बसवणे दु:खदायी आहे. चांगली कामगिरी करणाऱ्यात कर्णधारपदाचे गुण असतीलच असे मानणे चुकीचे आहे, हेही सत्य. गोलंदाजाच्या तुलनेत फलंदाजच चांगला कर्णधार सिद्ध होईल, हेही गरजेचे नाही. अश्विन झिम्बाब्वे दौऱ्यावर गेला असता तर त्यालाच कर्णधार बनवणे उत्तम ठरले असते असे मला वाटते. तरीही रहाणेला कर्णधारपद मिळणे भाग्याचीच गोष्ट आहे. २००७ मध्ये वरिष्ठांनी टी-२० विश्वचषकासाठी नकार देताच धोनीकडे नेतृत्व जाईल हे कोणाच्या ध्यानीमनीही नव्हते. त्याने विश्वचषक जिंकून विश्वास सार्थ केला. रहाणे धोनीची पुनरावृत्ती करेल काय? मिळालेल्या संधीचे तो सोने करेल काय? काळच याचे उत्तर देईल. वरिष्ठांच्या गैरहजेरीमुळे आपल्याला कर्णधार बनवले, असा रहाणेने विचार केल्यास ती त्याची गंभीर चूक ठरेल. विरोधी संघ झिम्बाब्वेला दुबळे मानून चालायचे नाही. वनडेत कोणत्याही संघाला दुबळे मानायचे नसते. बांगलादेशला गृहीत धरून चालणे आपण सोसले आहेच. आपल्या खेळाडूंचे कार्टून बनवून खिल्ली उडवण्यात आली. झिम्बाब्वे दौऱ्यातही आपण पराभूत झालो तर रहाणेच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकेल, जे त्याच्यासाठी खडतर ठरेल.