आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपविरोधाचा फायदाच, मात्र स्वबळावर सत्तेपासून सेना दूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केंद्र व राज्यात सत्तेत भागीदारी असूनही नरेंद्र माेदी, देेवेंद्र फडणवीस या भाजपच्या मातब्बर नेत्यांशी पंगा घेत शिवसेनेने अापले बळ वाढवले.
विधानसभा निवडणुकीत व निकालानंतरही कायम दुय्यम वागणूक देणाऱ्या भाजपशी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेने चांगलाच पंगा घेतला हाेता. माेदी-फडणवीसांच्या ‘अच्छे दिन’ची घोषणा फसवी असल्याचे मतदारांना दाखवून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. आणि केवळ याच भूमिकेमुळे शिवसेनेला गेल्या वेळच्या ३१ जागांच्या तुलनेत यंदा ५२ जागांवर यश मिळाले. सर्वात माेठा पक्ष हाेण्याचा मान यंदाही शिवसेनेने कायम राखला असला तरी बहुमताच्या जादुई अाकड्यापासून मात्र दूरच राहावे लागल्याने एकहाती सत्ता काबीज करण्याचे उद्धव ठाकरे यांचे स्वप्न दूर राहिले. प्रचारादरम्यान एकमेकांवर प्रचंड टीका केली असली तरी विधानसभेप्रमाणेच इथेही निकालानंतर भाजपशी संग करण्याची किंवा मनसेसह अन्य पक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याबाबत हालचाली शिवसेनेने सुरू केलेल्या आहेत.

शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी मुंबई महापालिका वगळता अन्य ठिकाणी निवडणुकीत युतीबाबत स्थानिक नेत्यांनाच अधिकार दिले होते. कल्याण-डोंबिवलीत प्रथम युती होईल असे म्हटले जात होते; परंतु नंतर दोघांनीही विधानसभेप्रमाणेच युती तोडून वेगळे लढण्याचे ठरवले आणि दोघांनाही त्याचा चांगलाच फायदा झाला. काँग्रेस-राष्ट्रवादीची संपूर्ण सद्दी मोडून काढण्यासाठी शिवसेना आणि भाजपनेच एकमेकांवर प्रचंड टीका करीत मतदारांसमोर फक्त त्यांचेच दोन पक्ष आक्रमकपणे नेले. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीसह मनसेच्याही जागा कमी झाल्या आणि त्याचा फायदा शिवसेनेला झाला. एकहाती सत्ता मिळवण्याचा चंग शिवसेनेने बांधला हाेता. यातूनच शिवसैनिकांना मारहाण झाल्याच्या तक्रारीपासून ते थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरकारचा नाकर्तेपणा दाखवत आमचे मंत्री मात्र चांगले काम करीत असल्याचे मतदारांच्या मनावर बिंबवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. भाजपवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी ‘२५ वर्षांची दोस्ती पाहिली, वाघाचा पंजा नाही पाहिला’ अशी टीका केली. लगेचच मुख्यमंत्र्यांनी वाघाच्या जबड्यात हात घालून दात मोजणारे असल्याचे सांगत जशास तसे उत्तर दिले. एकनाथ शिंदे यांनी तर भाजपवर टीका करीत भरसभेत राजीनामानाट्य केले होते. शिवसेनेवर कुणी टीका केली की शिवसैनिक चवताळतो आणि शिवसेनेच्या पारड्यात भरघोस मते मिळतात, त्याचाच प्रत्यय या वेळी आला. मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘शिवसेना संपेल’ असे म्हटले आणि मुंबईकरांनी शिवसेना-भाजपच्याच हाती सत्ता दिली.

सोमवारी जसजसे निकाल येऊ लागले तसतसा शिवसैनिकांचा उत्साह वाढू लागला. एका क्षणी जेव्हा शिवसेनेने ६० चा आकडा पार केल्याचे वृत्त आले तेव्हा हा एकहाती विजय साजरा करण्यासाठी उद्धव ठाकरे कल्याणला जाण्याची तयारी करू लागले. मात्र थोड्याच वेळात वास्तव समाेर अाले अाणि त्यांनी कल्याणचा दौरा रद्द केला. एक-दोन दिवसांत उद्धव ठाकरे कल्याण-डोंबिवलीला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. शिवसेना-भाजपमधील निवडणुक युद्ध संपले असले तरी एकमेकांवर झालेल्या टीका दोन्ही पक्षांचे कट्टर कार्यकर्ते विसरलेले नाहीत. शिवसेनेचे अनेक आमदार सत्तेतून बाहेर पडून स्वतःचे अस्तित्व कायम ठेवावे या मताचे आहेत, तर काही वरिष्ठ नेते सत्तेत राहूनच पक्ष वाढवण्याच्या मताचे आहेत.
बातम्या आणखी आहेत...