आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anant Yeolekar Article About Marathi Bhasha Din, Divya Marathi

अगतिक नव्हे, जागतिकच...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

27 फेब्रुवारीला महाराष्ट्रात ‘मराठी भाषा दिन’ साजरा केला जातो. तसा सरकारी ठराव आहे. कवी कु सुमाग्रजांचा हा जन्मदिन. ते होते तेव्हा, यादिवशी नाशकातून गायब व्हायचे आणि एखाद्या सरकारी डाक बंगल्यावर मित्रांबरोबर डेरा टाकायचे. त्यांनी जागतिक मराठी परिषदेच्या अध्यक्षपदावरून बोलताना मराठीच्या स्थिती-गतीचा नेमका लेखाजोखा मांडला होता. त्यातले एक वाक्य सर्वांच्या लक्षात राहिले ते म्हणजे ‘डोक्यावर सोनेरी मुकुट आणि अंगावर लक्तरे, अशा वेशात मराठी मंत्रालयाच्या दारात उभी आहे.’ त्या भाषणाला आता 20 वर्षे झाली. हे विधान वापरून गुळगुळीत झाले. अजून ती तशीच उभी आहे. तांत्रिकदृष्ट्या डोईवर सोनेरी मुकुट आहे आणि लज्जा रक्षणापुरती लक्तरेही आहेत. याचा अर्थ मधल्या काळात तिच्या संवर्धनासाठी काहीही झालेले नाही. उलट तिला आणखी गरीब करावयाचे उद्योग जरूर झाले आहेत, ते नेमके ज्यांनी संवर्धन करावे अशी अपेक्षा होती त्यांनीच केले. मराठीवर पोट भरणारे पत्रकार आणि बुद्रुक लेखकांनीही इंग्रजीमिश्रित मराठीचा आश्रय केला.

मराठी जगवली ती गावाकडच्यांनी, ज्यांना हे एलिट क्लासवाले घाटी म्हणतात त्यांनी. या 20 वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या शाळा काढल्या. मराठी कोपर्‍यात ढकलली गेली. मराठीचे तारणहार म्हणवणारे अगम्य मराठीत लेख पाडत बसले. यांनी अगदी नामवंत मानल्या जाणार्‍या महाविद्यालयात जाऊन एम. ए.च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधावा म्हणजे त्यांना मराठीची काय स्थिती आहे ते कळेल. तसेच एकदा वर्गात शिकवणार्‍या प्राध्यापकांशी बोलावे म्हणजे त्यांना खूप काही समजेल. त्यांनी नामवंत मराठी वृत्तपत्रेही चाळावीत, थोडा वेळ काढून मराठी वृत्त वाहिन्यांवरचे मराठी ऐकावे म्हणजे त्यांना आणखी पुष्कळ कळेल. आपले नेते जे बोलतात त्यातील लकबीवर मध्यंतरी प्रा. जयदेव डोळे यांनी लिहिलेय. त्यात ‘या ठिकाणी’, ‘त्या ठिकाणी’ कडे लक्ष वेधले आहे. ग्रामीण नेतेच असे बोलतात असे नव्हे, तर मराठीचे प्राध्यापकही असेच बोलतात. एक नेते प्रत्येक वाक्यात ‘हे जे आहे, त्याचे जे आहे’(ओळखा पाहू) असे बोलतात. परवा एका वृत्तवाहिनीवर बातमी देणारा असेच बोलत होता. हा काही त्या भाषेचा लहेजा नव्हे. भाषा वापरणार्‍याची ती बेफिकिरी म्हणा किंवा व्यक्तिगत दोष म्हणा, ऐकणार्‍याला त्याचा त्रास होतो. बोलण्यातील अशी खोट काढली पाहिजे, ते शक्यही असते हे क ोणी लक्षात घेत नाही. भाषेची काळजी ती हीच. आपण ती नाही घ्यायची तर कोण घेईल? मॉलमध्ये मराठी बोलले जाईलच कसे, हा प्रश्न मराठी माणसालाच पडतो. मराठीच्या नावे जागतिक दिन साजरे करणार्‍यांनीच तिला अगतिक केले आहे.

मराठीसाठी तसे पाहता प्रारंभी धडपड केली ती साहेबाने. मोल्सवर्थ हा पहिला शब्दकोशकर्ता हे आपण लक्षात ठेवले पाहिजे. अव्वल इंग्रजी काळ व त्यानंतर मराठी घडविली ती वृत्तपत्रांनी. उदाहरण द्यावयाचे तर पां. वा. गाडगीळ यांनी कार्ल मार्क्सचे विचार सोप्या, अगदी ग्यानबाला समजेल अशा भाषेत लिहिले. त्यातूनच महाराष्ट्रात सहकारी चळवळ उभी राहायला मदत झाली. एक काळ असा होता की, इंग्रजीतील ज्ञान मराठीत यावे असे प्रयत्न ठरवून केले जात. मराठी राज्य स्थापनेनंतर मराठी सरकारी कामकाजात यावी असे प्रयत्न झाले. पदनाम कोश तयार केला गेला, त्यालाच आचार्य अत्रे यांनी बदनाम कोश म्हटले. त्यातील मराठी ही मोरोपंतांची आर्या आणि इंग्रजांची भार्या अशा प्रकारची होती. मराठीवरचा संस्कृतचा प्रभाव कमी व्हावा असे प्रयत्न झाले, तसे इंंग्रजीच्या बाबतीत होताना दिसत नाही. उलट गेल्या काही वर्षांत वर्तमानपत्रांनी सर्रास इंग्रजी शब्द देवनागरीतून द्यायला सुरुवात केली. हा प्रकार इतका वाढला, इतका वाढला की, ही पत्रे मराठीतून कधी निघणार, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. मराठी वृत्तपत्रे निघाली तेव्हा दोन भाषांत निघत. साहेबाला मजकूर कळावा हा त्यामागे हेतू होता. कालगती कशी न्यारी असते पाहा. स्वातंत्र्यानंतर आता मराठी लिपीत इंग्रजीतून वृत्तपत्रे निघत आहेत! ती तशी निघतात याचे कारण दिले जाते की तरुण वाचक असेच मराठी बोलतात. या मंडळींना असा प्रश्न करता येईल की, वृत्तपत्रांचे एक काम शिक्षकाचेही आहे, त्याचे काय करायचे? वृत्तपत्रे साबण किंवा फ्रीजसारखी उत्पादने बनली, त्याचा फटका हा अशाप्रकारे मराठी भाषेला बसला आहे.

भाषा शिक्षक ही भूमिका मराठी वृत्तपत्रांनी सोडून दिली असे दिसते. त्यानंतर मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया या गोष्टी आल्या. मराठी त्यात कोठे उभी राहते हे पाहिले जाऊ लागले. एसएमएसची भाषा मोडतोड केलेली इंग्रजी होती. फेसबुकवर मराठी लिहिता येऊ लागताच भराभर ती वापरणार्‍या नेटकर्‍यांची संख्या वाढली. आज मराठीत मूलभूत चिंतनाच्या खुणा सर्वप्रथम ब्लॉग विश्वात उमटत आहेत, हे फार कोणाच्या गावी नाही. हजारोंनी ब्लॉग अस्तित्वात आहेत, त्यात भरताड खूप असली तरी काही खूप चांगले आहेत. सातशे वर्षांपूर्वी नेवाशाला ‘पैसाच्या खांबापाशी’ विश्वाचे आर्त प्रकटले. गुगल हा आजचा ‘पैसाचा खांब’ झाला असे का म्हणू नये. चांगले मराठी फेसबुकवर वाचायला मिळते तसे व्हॉट्सअ‍ॅपवर मिळू लागले. इ-बुक्स, किंडल वाचनसंस्कृती वाढवणारच आहे. आधीच्या पिढीने केलेले नुकसान नवी पिढी भरून काढील असे दिसतेय. भाषा लोकजीवनात संकटात असली तर ते खरे संकट असते.

मराठी निदान शहरी लोकजीवनात संकटग्रस्त झाली आहे. पुण्यात एसपी, बीएमसीसी किंवा नाशकातील बीवायके, के. के. वाघ यासारख्या महाविद्यालयांतून डोकावून पाहा कोणती भाषा कानावर पडते ते. ही भाषा मराठी नक्की नसेल. सार्वजनिक वाचनालयात पुस्तक देवघेव विभागातील विशीतील मुलगी तुम्हाला विचारते, ‘सर कोणते बुक आणलेत किंवा सर ते बुक तुम्हाला नाही भेटणार’तर बुकला पाय असतात काय, असा प्रश्न तुम्हाला पडू शकेल, हीच मराठीची आजची अवस्था आहे. तंत्रज्ञान ही अवस्था बदलू शक ते. पुन्हा ती संधी समोर उभीय. आता ती नाही उचलली तर मात्र तो करंटेपणा ठरेल. ग्राम जीवनाला शहराची आस असते. भाषेच्या बाबतीतही शहराची भाषाच खेडे बोलू पाहणार. अशा स्थितीत ज्यांच्या हातात हे तंत्रज्ञान आधी आले त्यांची जबाबदारी वाढते. तात्यासाहेब आज असते तर ते हेच म्हणाले असते.

प्रा. अनंत येवलेकर, नाशिक
मराठी भाषा चिकित्सक
संपर्क : ९४२२९४३३६६